भैरवगड-कोथळे
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नगर
उंची : ३२५५ फुट
श्रेणी : मध्यम
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून हरीश्चंद्रगडावर जाणाऱ्या टोलारखिंड या मुख्य मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरोबागड उर्फ भैरवगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. गडाची एकुण रचना पहाता हा किल्ला हरिश्चंद्रगडाला समकालीन असावा. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासूनसुरू होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला भैरोबागड उर्फ भैरवगड किल्ला आहे. मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ- विहीर किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर फाटा या मार्गाने कोथळे गावात जाता येते.
...
कोथळे गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगररांगेत पाच डोंगर असुन यातील पहिला उंच डोंगर कोळथा, दुसरा व तिसरा डोंगर नाव नसलेले, चौथा डोंगर भैरोबागड व पाचवा उंच डोंगर गाढवाचा डोंगर म्हणुन ओळखला जातो. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी स्थानिक लोकाची कल्पना आहे. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत असुन येथे हा गड भैरोबागड म्हणूनच ओळखला जातो. दरवर्षी चैत्र महीन्यात या भैरोबाची यात्रा असते. भैरोबागड कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या कक्षेत असल्याने व भाविक गडावर येत असल्याने वनखात्याने गडावर आवश्यक त्या सोयी केल्या आहेत. धोक्याच्या ठिकाणी लोखंडी शिडी व कठडे बसविलेले आहेत. कोथळे गावातुन वनखात्याने बांधलेला एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे गडाच्या पायथ्याला टोलारखिंडीची दिशा दाखवणारी गंजलेली पाटी असुन त्याच्या शेजारी वनखात्याने हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक बसवला आहे. या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजुला वनखात्याने बांधलेला सिमेंटचा निवारा आहे. या निवाऱ्या समोर झाडाखाली एक स्थानिक देवतेची मुर्ती आहे. येथुन एक ठळक पायवाट शेतांमधुन पुढे डोंगराकडील जंगलात जाते. या वाटेने जंगलात शिरल्यावर उध्वस्त पायऱ्याचा चढ चालु होतो. पायवाटेच्या सुरुवातीपासून ते अगदी गडमाथ्यापर्यंत दाट जंगल आहे. साधारण अर्ध्या तासात आपण घळीत असलेल्या गडाच्या कातळकोरीव पायऱ्यापाशी पोहोचतो. वनखात्याने या पायऱ्यावर एक लहानशी साधारण दहा पायऱ्या असणारी शिडी बसविली आहे. हि शिडी चढुन वर गेल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजुला कातळकड्याखाली एक पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. ते पाहुन पायऱ्याच्या वाटेने ५ मिनिट चढुन गेल्यावर कातळात खोदलेल दुसरे टाके दिसते. त्याच्या बाजुला एक तुटलेले टाके असुन वनखात्याने त्यात बसण्यासाठी दोन लोखंडी बाक ठेवलेली आहेत. या टाक्याच्या पुढे काही बांधीव पायऱ्या असुन पुढे दुसरी मोठी शिडी आहे. साधारण चाळीस फुट उंच असणाऱ्या या शिडीखाली असणाऱ्या कड्यात खोदीव पायऱ्या पहायला मिळतात. हि शिडी चढून थोड वर गेल्यावर एक आडवी छोटी शिडी पार करून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडाचा माथा चिंचोळा असुन दक्षिणोत्तर साधारण ३ एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला उघड्यावरचं भैरोबाचं चौथरावजा ठाण आहे. त्याच्या बाजुला काही मुर्ती आणि वीरगळ ठेवलेल्या असुन समोर कातळात कोरलेली २ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या मागे दोन दगडी दिपमाळा आहेत. वनखात्याने कड्यावर धोकादायक ठिकाणी लोखंडी कठडे लावलेले आहेत. येथुन हरिश्चंद्रगड व त्यावरील तारामती शिखर स्पष्टपणे दिसते. गडाच्या डाव्या बाजुला कातळात खोदलेली पाच जोडटाकी असुन समोरच भैरवगडापेक्षा उंच गाढवाचा डोंगर दिसतो. या दोन डोंगरामधील भैरवगडाच्या टोकावर तटबंदीचे काही अवशेष अजुनही पहायला मिळतात. येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड पहायला साधारण अर्धा तास लागतो. भैरवगडावरून कुंजरगड उर्फ कोंबडकिल्ला,बाळूबाई डोंगर,कारकाई पर्वत, हरिश्चंद्रगड व टोलारखिंड, शिरपुंज्याचा भैरवगड, घनचक्कर डोंगर आणि पाबरगड इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडावर रहाण्याची सोय नाही पण कोथळे गावातील मंदिरात रहाण्याची सोय होऊ शकते. भैरवगडचा इतिहासात उल्लेख असला तरी भैरवगड हे नाव सहा ते सात किल्ल्यांना असल्याने त्याचा इतिहासात नेमका संदर्भ लावणे कठीण जाते.
© Suresh Nimbalkar