भुषणगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : २९०५ फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीत पडणाऱ्या धोधो पावसामुळे बहुतेक दुर्गप्रेमींची भटकंती या काळात बंद असते पण याला अपवाद असते ती सातारा जिल्ह्यातील माणदेशीची भटकंती. इतरत्र कितीही जोरदार पाउस पडत असला तरी या काळात माणदेशात मात्र पावसाची रिमझिम चालु असल्याने बहुतांशी दुर्गप्रेमीची पाउले या भागाकडे वळतात. दोन दिवसाची सवड काढल्यास व सोबत खाजगी वाहन असल्यास या भागात असलेले वर्धनगड, भूषणगड, महीमानगड,संतोषगड, वारुगड,यमाई मंदिर,शिखर शिंगणापुर हि ठिकाणे सहजपणे पाहुन होतात. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. या वडूज गावाच्या दक्षिणेकडे साधारण पंचविस तीस कि. मी. वर भूषणगड हा किल्ला आहे. दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात कातळमाथा आणि तटबंदीचे पागोटे बांधलेला भूषणगडचा डोंगर दुरुनच आपले लक्ष वेधून घेतो. भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव असुन या गावातुन एक कच्चा रस्ता आपल्याला थेट गडावर जाणाऱ्या पायऱ्यापाशी घेऊन जातो. ... गडावर जाणाऱ्या या पायऱ्या गावकऱ्यांनी अलीकडील काळात बांधलेल्या असुन गडावर असलेली हरणाईदेवी पंचक्रोशीतील गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे. येथील अख्यायिकेनुसार औंधची यमाई आणि हरणाई देवी या बहिणी असुन त्यांच्यातील भांडणामुळे त्या वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाताना तटबंदीवरून सतत माराच्या टप्प्यात रहाणारी हि वाट हे शिवकालीन दुर्गरचनेचे वैशिष्ट्य या किल्ल्यावर देखील पहायला मिळते. पायऱ्यांच्या या वाटेने साधारण २० मिनिटात आपण आपण दरवाजाच्या खालील भागात असलेल्या लहानशा सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी म्हसोबाचे टपरीवजा मंदीर असुन यातील मुर्तीला चक्क गांधीटोपी घातलेली आहे. येथून सरळ वर चढणारी पायऱ्याची वाट गडाच्या दरवाजात जाते तर उजवीकडे एक पायवाट तटबंदी व बुरुजाखालुन गडाला वळसा मारुन भुयारी देवीच्या मंदिराकडे जाते. येथे नव्याने बांधलेल्या लहानशा घुमटीमधे देवीची मूर्ती असून घुमटीमागे असलेल्या भुयारामुळे या मुर्तीला भुयारीदेवी नाव पडले आहे. प्रत्यक्षात येथे भुयार नसून लहानशी कपार आहे. हे पाहुन झाल्यावर गडावर जाण्यासाठी परत फिरुन म्हसोबा मंदिराकडे यावे लागते. म्हसोबा मंदिराकडून गडाचा दरवाजा सहजपणे नजरेस पडतो. दरवाजाच्या समोरील भागात सहजपणे वावर करता येऊ नये यासाठी पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना बुरुज बांधून त्याच्या आतील बाजुस दरवाजा बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असलेला हा दरवाजा आजही शिल्लक असला तरी त्याची वरील भागात असलेली कमान मात्र ढासळलेली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. तटबंदीत असलेले दोन दरवाजे पार करून आपला गडावर प्रवेश होतो. येथून दोन वाटा फुटतात, एक वाट गडाच्या पश्चिम टोकाकडील बुरुजाकडे जाते तर डावीकडील रुळलेली पायवाट गडमाथ्याकडे जाते. पश्चिमेकडील बुरुजाकडे जाताना एक मोठी विहीर पहायला मिळते. बांधकामासाठी दगड व पाण्याची सोय असा दुहेरी उद्देश या विहीरीमुळे साध्य झाला आहे. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असुन त्यात जागोजागी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला मिळतात. पश्चिम टोकाच्या बुरुजावर पोहचल्यावर खाली लांबवर पसरलेली डोंगरसोंड दिसते. या बुरुजाला तोफेसाठी झरोके बांधलेले आहेत. आपण सुरवातीस पाहिलेले भुयारी देवीचे मंदीर याच बुरुजाखाली असलेल्या कड्यात आहे. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना उजव्या हाताला २० x २० फुट चौकोनी आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर दिसते. या विहीरीजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची गडदेवता असलेल्या हरणाई देवीचे मंदिर दिसते. या मंदिरात मूर्तीवर पितळी मुखवटा बसवलेली हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. गडावर मुक्काम करायचा असल्यास मंदिरासमोर धर्मशाळा असून यात ५-६ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज असुन या बुरुजावरील ध्वजस्तंभावार भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकताना दिसतो. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते. तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा करुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते ती करण्यास साधारणपणे १ तास लागतो. भूषणगडाचा माथा समुद्रसपाटीपासुन २९७० फुट उंचावर असुन चारही बाजूने तटबंदीने सुरक्षीत केलेला आहे. गडाचा आकार साधारण त्रिकोणी असुन या तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असुन तटबंदीत जागोजागी पहाऱ्यासाठी बुरुज बांधले आहेत. या तटबंदीत दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज आहेत. भूषणगडच्या आसपास एकही मोठा डोंगर नसल्याने गडावरून दूरपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. गडावरून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही ठिकाणे सहजपणे दृष्टीस पडतात.सातारा गॅझेटियरमध्ये देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला असा उल्लेख असला तरी किल्ल्याचे एकूण बांधकाम पहाता तो तितकासा खरा वाटत नाही. हा गड शिवाजी महाराजांनी वर्धनगडाबरोबरच इ.स.१६७६ मधे बांधला असावा. सभासदाच्या बखरीत इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली असा उल्लेख येतो. शिवकाळात मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा गड नंतरच्या काळात औरंगजेबाने जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १८०५ मधे रहिमतपुरच्या फत्तेसिंह मानेंनी या गडावर हल्ला केला. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!