भुईंज
प्रकार : वाडा
जिल्हा : सातारा
उंची : 0
श्रेणी : सोपी
सिंदखेडराजा हे राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान व माहेर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ. लखोजी जाधवरावांची त्यांच्या मुला-नातवांसह निजामशहाकडून हत्या झाल्यानंतर जाधवराव परीवाराच्या शाखा निरनिराळ्या ठिकाणी विखुरल्या गेल्या व त्यातील एक शाखा साताऱ्यातील भुईंज येथे वास्तव्यास आली. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे आजही नांदत आहे. पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी लखोजी जाधव यांच्या घराण्याचे वंशज रायजीराव जाधव यांचा रहाता वाडा आहे. गावात हा वाडा छत्रपतींची कन्या राणु अक्कासाहेबांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. पुर्वी जाधव घराण्याचे भुईंज गावात दोन वाडे होते यातील एक वाडा पडला आहे तर दुसरा वाडा आजही सुस्थितीत असुन वापरात आहे. आज या वाडयात जाधवांची तीन कुटुंबे वास्तव्यास आहे. भुईंज गावात गेले असता आधी हा वाडा व नंतर त्याच्या टोकाला असलेला रचीव दगडात बांधलेला गोलाकार बुरुज नजरेस पडतो.
...
वाडयाचा चौथरा घडीव दगडात बांधलेला असुन वरील काम विटांनी केलेले आहे. वाडयाभोवती सुरक्षेसाठी कोणतीही तटबंदी दिसुन येत नाही. वाडयात प्रवेश करण्यासाठी दरवाजासमोर दोन्ही बाजुस पायऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजुस देवड्या व वाडयाचे चौसोपी बांधकाम नजरेस पडते. वाडयाच्या दिवाणखान्यात मोठे देवघर असून त्यात काही देवतांच्या मुर्ती आहेत. दिवाणखान्याच्या दुसऱ्या बाजुस राममंदिर असून त्यात प्रभु रामचंद्राची मुर्ती आहे.जाधवरावांचे वंशज हि मुर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून मिळाल्याचे सांगतात. वाडयाचा इतर भाग वापरात असल्याने पहाता येत नाही. वाडा पहाण्यास १० मिनीटे पुरेशी होतात. छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या कन्या राणूबाई यांचा विवाह भुईंजच्या जाधव घराण्यात अचलोजी जाधवराव यांच्याबरोबर झाला होता. राणुआक्का यांचे याच वाडयात वास्तव्य होते. महाराजांच्या रायगडावरील राजाभिषेकाला राणूबाईसाहेब हजर होत्या. वृद्धापकाळाने भुईंज येथे त्यांचे निधन झाल्यावर घराण्याला साजेसे त्यांचे वृंदावन भुईंज येथेच बांधले गेले पण काळाच्या ओघात अतिक्रमणात ते नष्ट केले गेले व त्याचे दगड इतरत्र वापरले गेले. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या घराण्यातील रायजीराव जाधवराव सरदार म्हणुन प्रसिद्धीस आले. २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. इंग्रजांच्या काळात या जाधवराव घराण्याला पंधरा लाखांपर्यंत जहागिरी असल्याचा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रातून येतो. वाडयापासून काही अंतरावर रायजीराव जाधव व कमळाबाई यांची समाधी वास्तु आहे. हि समाधी आपल्याला सिंदखेडराजा येथील लखुजी जाधवराव यांच्या समाधीची आठवण करून देते. समाधीच्या चौथऱ्यावर चार बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प कोरलेले आहे. घडीव दगडात बांधलेल्या या वास्तूवर गोलाकार घुमट बांधलेला असुन भिंतीवर शरभ, कमळ, हत्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत. सध्या ही वास्तु देखरेखी अभावी ओस पडलेली असून घुमटावर झाडे उगवली आहेत. त्याशेजारील जागेतच राणूबाईसाहेबांचे वृंदावन होते. भुईंज गावचा आपला फेरफटका तासाभरात पूर्ण होतो.
© Suresh Nimbalkar