भिवागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नागपुर

उंची : १४२७ फुट

श्रेणी : मध्यम

नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील उत्तर भागात असलेल्या घनदाट जंगलामधून पेंच नदी वाहते. घनदाट जंगलामुळे आधीच दुर्गम असलेला हा परिसर पेंच नदीवर बांधलेल्या धरणामुळे अधीकच दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या धरणाच्या काठावर असलेल्या उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. पण टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भिवसेन कुआरा या देवस्थानामुळे हा किल्ला भिवगडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून या भागात जास्त प्रसिद्ध आहे. या देवस्थानामुळे तसेच हा भाग पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध असल्याने येथे लोकांची सतत वर्दळ असते पण या ठिकाणी येण्यासाठी सार्वजनीक वाहनांची सोय नसल्याने खाजगी वाहन सोयीचे पडते. नागपूरहुन भिवगडला जाण्यासाठी नागपूर-पारशिवनी-आमगाव-नव्हेगाव-चारगाव- भिवसेन हा एक मार्ग असून दुसरा मार्ग नागपूर-टाकळी-खापा-कोथुळाना-चारगावमार्गे भिवसेन गाठता येते. भिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या भिवसेन कुआरा या मंदिराकडून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. ... किल्ल्याच्या पुर्व बाजूला पाणी तर पश्चिमेला घनदाट जंगल आहे. मंदिराजवळुन टेकडीच्या पायथ्याशी पाण्यात असलेली एक दुमजली वास्तु पहायला मिळते. स्थानिक लोक या वास्तुला राणीचा महाल म्हणुन ओळखतात. किल्ल्याच्या पायथ्याशी एक लहान उंचवट्यावर असलेला हा महाल धरणामुळे पाण्याने वेढला आहे. तेथे जाण्यासाठी होडीची सोय असुन पावसाळ्यात त्याचा पहिला मजला पाण्याखाली असतो तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर चालत तेथपर्यंत जाता येते. या महालाला दोन मजले असुन तळामजल्यात तीन खोल्या आहेत. यातील एका खोलीत वर जाण्यासाठी जिना आहे. येथुन गडावर जाण्यासाठी खडी चढाई असल्याने मंदिराकडून मळलेल्या वाटेने गडावर जाणे जास्त योग्य आहे. वाटेच्या सुरवातीला असलेले वनखात्यानी बांधलेले निवारे पार करत मळलेल्या पायवाटेने अर्ध्या तासात आपण गडावर प्रवेश करतो. गडाचा उत्तराभिमुख असलेला लहान दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे केवळ अवशेष व दरवाजा शेजारी असलेला बुरुज पहायला मिळतो. गडाची तटबंदी रचीव दगडांची असुन हा दगड सह्याद्रीतील काळ्या खडकापेक्षा वेगळाच आहे. गडाचा माथा दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन १३४० फुट उंचावर आहे. गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन मध्यभागी असलेल्या लहान टेकाडाला तटबंदी घालुन बालेकिल्ला बनवलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत उत्तर व दक्षिण टोकाला रचीव दगडाचे दोन बुरुज असुन मध्यभागी पत्र्याच्या निवाऱ्याखाली भिवसेनाची तांदळा रूपातील शेंदुर फासलेली मुर्ती आहे. मंदीराबाहेर शेंदुर फासलेली एक सुंदर कोरीव मुर्ती असुन काही अंतरावर बुजत चाललेले एक पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या उत्तर बुरुजावरून दूरवर पसरलेले पेंच धरणाचे पाणी तर दक्षिण बुरुजावरून घनदाट जंगलाने वेढलेला परीसर नजरेस पडतो. गडाच्या माचीवरून फेरी मारताना माचीच्या पुर्व भागात असलेला गडाचा पुर्णपणे उध्वस्त झालेला गडाचा मुख्य दरवाजा असुन या दरवाजाशेजारी आजही सुस्थितीत असलेले दोन बुरुज पहायला मिळतात. यातील एका बुरुजावर पहाऱ्याची चौकी असुन माचीच्या तटबंदीत एकुण ७ लहान बुरुज पहायला मिळतात. गडाचा माथा लहान असल्याने २० मिनीटात आपली गडफेरी पुर्ण होते. आज गडाचा इतिहास अज्ञात असला तरी गडाच्या पायथ्याशी असलेले कुवारा भिवसेन हे गोंड देवस्थान पहाता किल्ल्याची निर्मीती गोंड राजांच्या काळातच झाली असावी हे निश्चित. या शिवाय किल्ल्याचा कोणताही इतिहास कागदोपत्री दिसुन येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!