भिवंडी
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : ठाणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
मध्ययुगीन काळात भिवंडी हे मोठे बंदर असुन सागरी मार्गाने थेट समुद्राशी जोडले होते. उल्हास नदीची उपनदी असलेली कामवारी नदीतुन जहाजांची वाहतुक भिवंडी ते थेट वसईपर्यंत होत असे. बंदरामुळे भरभराटीस आलेल्या या शहराच्या रक्षणासाठी किल्ला असणे साहजिकच होते. पण काळाच्या ओघात हा किल्ला पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याचे वाचनात येत होते, त्यामुळे या कोटाची स्थान निश्चिती करणे तसे कठीणच होते. पण श्री सदाशिव टेटवीलकर यांचे दुर्गसंपदा ठाण्याची हे पुस्तक वाचनात आले व भिवंडी कोटाचे स्थान समजले. भिवंडी कोटाची साक्ष देणारा एकमेव बुरुज आजही शिल्लक आहे. हा बुरुज घोडेबाबा शहा दर्गा या नावाने ओळखला जातो. टिळक मंदिर रोडवरील वाणी आळीत हा बुरुज असुन या बुरुजावर घोडेबाबा यांचा दर्गा आहे. या बुरुजासमोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस भिवंडी वाचन मंदीर आहे.
...
गोलाकार आकाराच्या या बुरुजाची सध्याची उंची साधारण १५ फुट आहे. बुरुजावरील दर्ग्यावर जाण्यासाठी या बुरुजाला रस्त्याच्या बाजूने नव्याने सिमेंटच्या पायरया बांधल्या आहेत. घडीव दगडात केलेले बुरुजाचे बांधकाम पहाता किल्ल्याची तटबंदी देखील घडीव दगडात असावी. बुरुजापासून जवळच काळभैरवाचे मंदिर आहे. हे किल्ल्यातील मंदिर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरीत अवशेषांचा वाढलेल्या शहराने घास घेतला आहे. किल्ल्यापासून ६०० फुट अंतरावर कामवारी खाडीचे पात्र आहे जे कधीकाळी या कोटाजवळ असावे. बुरुज व मंदिर पाहुन आपली १५ मिनिटांची गडफेरी पूर्ण होते. ऐतिहासिक दस्तावेज पाहता इ. स. आठव्या शतकापासून भिवंडीच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो.राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेल्या भिमडी या ऐतिहासिक नगराचे नाव पुढे भिवंडी झाले. मुस्लिम राजवटीत काही फारशी पत्रांतून या शहराचा इस्लामपूर असाही उल्लेख येतो. उत्तरेकडून आलेल्या बिंब राजांनी प्रथम भिवंडी जिंकून मग ठाणे जिंकले. प्रथम बिंबाने भिवंडी जिंकले म्हणून ‘बिंबस्थान’. पुढे बिंबस्थानावरून भिवंडी नाव तयार झाले. १५ व्या शतकात काही काळ पोर्तुगीजांची या शहरावर सत्ता होती. मध्ययुगीन काळात कल्याण-भिवंडी हा एकत्र परगणा असल्याने भिवंडीचा वेगळा असा इतिहास दिसुन येत नाही. इ.स.१६५७ मध्ये आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा लोहकरे यांनी भिवंडी किल्ला जिंकला व शिवरायांचा पदस्पर्श या किल्ल्याला झाला. इ.स.१६८९ मध्ये भिवंडी शहर व किल्ला मुघलांच्या ताब्यात गेले. त्यानंतर इ. स. १७२० मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात हा भाग पुन्हा स्वराज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar