भिलई

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३३८० फुट

श्रेणी : कठीण

नाशिक जिल्ह्यातील सटाणा-कळवण तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. सटाण्याकडे सालबारी-डोलबारी म्हणून एक पर्वतरांग सुटावलेली आहे. अगदी सपाट अशा या भागात एकदम उठावलेले गगनचुंबी पर्वत दिसतात. याच सटाणा तालुक्यातील भिलाई हा एक अपरिचित किल्ला. कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारा हा किल्ला १९८५ साली इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची ३४७८ फुट तर पायथ्यापासुन साधारण १८०० फुट आहे. सटाणा गाव मध्यवर्ती ठेवून विविध आगळ्यावेगळ्या किल्ल्यांची भटकंती करता येते. साल्हेर- सालोटा, मुल्हेर- मोरा- हरगड हे दुर्ग असलेली सेलबारी डोलबारी रांग एका बाजूला आणि सातमाळा रांग दुसऱ्या बाजूला. तर मध्यभागी असलेल्या बागलाणात भिलाई, कऱ्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा, मोहनदर,पिंपळा, पेमगिरी असे अनेक किल्ले उभे आहेत. ... सटाणा शहर मध्यवर्ती ठेउन या सर्व किल्ल्यांची भटकंती करता येते. सटाणापासून २५ कि.मी.वरील दगडी साकोडे हे भिलई किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. सटाणा- निकवेलवरून दगडी साकोडे या गावी गेले की आपण भिलाई दुर्गाच्या पायथ्याशी येतो. दगडी साकोडे गावातून रस्ता आवळबारी खिंडीमध्ये येउन पोहोचतो. हे अंतर ४ किमी आहे. आवळबारी खिंडीतून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. गडावर पाण्याची सोय नसल्याने गावातुन पाणी घेऊनच गडाकडे निघावे. शक्य झाल्यास भिलईगड वाटाडया घेऊनच पहावा कारण गडावर जाण्यास ठळक अशी वाट असली तरी ढोरवाटामुळे तिला अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यामुळे वाट बऱ्याच ठिकाणी भरकटण्याची शक्यता आहे. आवळबारी खिंडीला लागुन असलेल्या उजव्या बाजुच्या डोंगर सोंडेवरून किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. या वाटेवर बऱ्याच ठिकाणी मुरुमाचा घसारा आहे त्यामुळे जपून जावे. या वाटेने पाउण तासात आपण माचीसारख्या टप्प्यावर पोहोचतो. येथुन समोरच्या डोंगरात सर्वोच्च भागात झेंडा फडकताना दिसतो तोच भिलई किल्ला. पण थेट किल्ल्याच्या दिशेने न जाता किल्ल्याच्या डोंगराआधी असलेल्या डोंगराच्या दिशेने चढाईला सुरुवात करावी. हा डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डावीकडे ठेवत भिलाईच्या कातळ टोपीच्या दिशेने केलेल्या खड्या चढाईनंतर आपण भिलाई किल्ल्याच्या सुळक्या खाली असलेल्या कड्यापाशी पोहोचतो. येथे कडा उजवीकडे ठेउन आडवे गेल्यावर काही मिनिटात एक छोटासा १५ फुटाचा कातळ टप्पा लागतो. हा कातळ टप्पा चढुन आल्यावर हि वाट पुढे वरवर जाताना दिसते. या वाटेच्या डोंगराच्या उजव्या तसेच डाव्या बाजुस देखील एक पायवाट दिसतात. येथे प्रथम डाव्या वाटेकडे वळावे. डावीकडे २ मिनिट चालल्यावर आपण पाण्याच्या चार टाक्याकडे पोहोचतो. यातील दोन टाक्यांमध्ये पाणी आहे पण ते पिण्यालायक नाही. उरलेल्या दोन टाक्यामध्ये खुप मोठया प्रमाणात झुडुपे उगवली आहेत. टाके पाहुन मागे मुळ वाटेवर परत यावे व उजव्या वाटेकडे वळावे. हि वाट डाव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला नजर फिरवणारी खोल दरी यातुन पुढे सरकत एका खोबणीवजा गुहेकडे येउन पोहोचते. या गुहेच्या वाटेत काही ठिकाणी डोंगराला शेंदूर फासला आहे तर छोटयाशा गुहेत अलीकडीच्या काळातील सप्तशृंगी देवीची मुर्ती ठेवण्यात आली आहे. देवीचे दर्शन घेऊन परत मुळ वाटेवर यावे. वरवर जाणाऱ्या या मधल्या पायवाटने दहा मिनिटात आपण गडावर ध्वजापाशी पोहोचतो पण वाटेत खुपच घसारा असल्याने जपून जावे लागते. या वाटेने गडाचा दरवाजा आज अस्तित्वात नसुन गडावर इतर काहीही अवशेष पाहायला मिळत नाहीत. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. भिलई गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी पंधरा मिनिटे पुरतात पण पायथ्यापासुन गडावर येण्यास दोन तास लागतात. माथ्यावरुन साल्हेर-सालोटा, मुल्हेर, व संपुर्ण सेलबारी डोलबारी पर्वतरांग तर दक्षिणेला सगळी सातमाळा रांग अप्रतिम दिसते. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. हा किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी करण्यात आला असावा. दुर्दैवाने किल्ल्याचा इतिहास धुंडाळला असता फारशी माहिती मिळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!