भामेरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : धुळे

उंची : २२८० फुट

श्रेणी : मध्यम

धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते. असा हा सुंदर किल्ला आणि गाव दुर्गप्रेमीने एकदा तरी पहायलाच हवा. प्राचीन काळी सुरत-बुऱ्हाणणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे. अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला असताना किल्ल्यावरील पन्नासपेक्षा अधिक गुंफा याच काळात खोदल्या गेल्या. ... आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात. धुळे -सुरत रस्त्यावरुन भामेरकडे येताना किल्ल्याच्या मधल्या डोंगरावर कोरलेली लेणी सहजपणे नजरेस पडतात. लांबून दिसणारा कातळमाथा व अर्धवर्तुळाकार पसरलेली डोंगररांग ह्यामुळे दुरुनच हा किल्ला चटकन लक्षात येतो. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो. भामेर गावालाही कधीकाळी उत्तम तटबंदी होती पण आजमितीला तटबंदी पुर्णपणे ढासळली आहे. भामेर गांवात प्रवेश करताना या तटबंदीत शिल्लक असलेली दरवाजाची कमान व त्यावर केलेले नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. या कमानीच्या बाजूला प्राचीन बारव असुन त्याशेजारी भल्या मोठया दगडी डोणी आहेत. या विहीरीचे पाणी पंपाने काढून चरांमधून हौदात खेळवलेले असुन हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात. डाव्या बाजूला भली-मोठी प्राचीन विहीर साऱ्या गावाला पाणी पुरवते. उन्हाळ्याचे चार पाच महिने भामेर गावात पाण्याचे हाल असतात त्यात सरतेशेवटी या एकाच विहीरीत पाणी शिल्लक असते. दरवाजातुन आत आल्यावर डाव्या बाजुस जोत्यावर अखंड दगडात घडवलेले ८-९ फूट उंचीचे १२ नक्षीदार गोल खांब पहायला मिळतात. पेशवेकाळात या ठिकाणी न्यायदानाचे काम चालत असल्याची माहिती गावकरी देतात. कमानी समोर एका चौथऱ्यावर दोन विरगळ ठेवलेल्या असुन जवळच एका जुन्या मशिदीचेही अवशेष दिसतात. गावातील घरे पुरातन धाटणीची असुन या घरांच्या पायात , भिंतीत पुरातन कलाकुसर केलेले दगडी खांब, यक्ष व गंधर्वमुर्ती दृष्टीस पडतात. किल्ल्याकडे जाताना एका गल्लीत २.५ फुट उंच दगडी नंदी व त्याशेजारी दोन ६ फूटी कोरीव खांब व काही मुर्त्या अर्धवट गाडलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. हे अवशेष पहाता पुर्वी इथे मंदिर असावं. गाव पार केल्यावर आपण शंकराच्या मंदिरापाशी येतो. येथून समोरच एकूण तीन डोंगरांवर वसलेला भामेरगड उर्फ भामगिरी किल्ला नजरेस पडतो. यातील उजव्या बाजुच्या डोंगरावर एक छोटा दर्गा असुन समोरील डोंगरावर कोरीव लेणी आहेत तर डाव्या बाजुच्या डोंगरावर भामेरगडचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मोठी खाच मारून बालेकिल्ला व मधला डोंगर एकमेकापासुन वेगळे केलेले आहेत. बालेकिल्ल्याचा डोंगर ते दर्ग्याचा डोंगर यांना समांतर अशी तटबंदी पायथ्याशी बांधलेली असुन आजही ही तटबंदी व त्यातील पाच बुरुज बऱ्यापैकी शिल्लक आहेत. यातील एका बुरुजाच्या बाहेरील बाजुस मोठा बांधीव हौद आहे तर एका बुरुजावर भग्न झालेली विष्णुमुर्ती आहे. ह्या तटाचा बराचसा भाग झाडांनी लपलेला आहे पण बुरुज मोठे असल्याने लांबूनही चटकन दिसतात. ह्या तटाची व बुरुजाची मांडणी गडमाथ्यावरुन उठून दिसते. गावामागून उजव्या हाताला असलेल्या एका मळलेल्या पायवाटेने सुरूवातीच्या वाटेवर नाक दाबून १० मिनीटात आपण खिंडीतील उध्वस्त दरवाजात येतो. दरवाजाकडे येताना डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या गुफा आपले लक्ष वेधतात तर काही ठिकाणी घसारा लागतो. खिंडीत एका बुरुजाच्या आधारे काटकोनात बांधलेले दोन दरवाजे असुन यातील बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. दरवाजा ढासळला असला तरी कमानीत उभे असलेले दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला दर्ग्याचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू मधल्या डोंगरावरून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहजपणे माराच्या टप्प्यात येइल. उजव्या हाताच्या डोंगरावरचा कातळटप्पा व त्यातील पायऱ्या चढून आपण दर्ग्यापाशी पोहचतो. या पीराला पांढऱ्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन छोटेसा माळ पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन जवळपास चाळीस लेणी खोदलेली असुन यातील २४ लेणी आपल्याला पाहता येतात. १० x १० फूट ते २५ x १० फूट अशी लांबी रुंदी असलेली ही लेणी म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत. काही टाकी कोरडी तर काही स्वच्छ पाण्याने भरलेली आहेत. प्रत्येक टाके हे पहिल्या टाक्याच्या खालच्या पातळीत कोरलेले असुन टाक्याच्या तळाशी असलेल्या छीद्रातुन एका टाक्यातील पाणी दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय आहे. या किल्ल्यातील हे पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. २४ लेण्यांपुढे जाण्याचा मार्ग धोकादायक असुन दोरीशिवाय पुढील लेणी पाहता येत नाही. लेण्या पाहून झाल्यावर परत मागे येऊन खडकात खोदलेल्या पायऱ्यानी डाव्या हाताच्या बालेकिल्ल्याकडे निघायचे. एकूण ६० पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा खरा आवाका लक्षात येतो. जाताना वाटेत भग्न झालेल्या दगडी कमानीत कोरलेला एक पर्शियन शिलालेख दिसतो. या चढाई दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार सतत आपल्या नजरेच्या टप्प्यात असते. पायऱ्या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर पुन्हा सहा गुंफा आहेत. तिथून थोडे वर आल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दारावर गणेशपट्टी कोरलेली असुन शेजारी भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व पक्षांच्या जोडी कोरलेल्या आहेत. प्रत्येक गुफां साधारण ३० x ३० फुट असून बारा दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे २० × २० फुट व साधारण ३० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बालेकिल्ल्याचा बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते तर उजव्या हाताला दगडात खोदलेली खाच दिसते. या खाचेने बालेकिल्ला व शेजारील टेकडी एकमेकापासुन वेगळी करण्यात आली आहे. ही खाच बनविण्याचे काम अर्धवट राहिलेले दिसते. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला व मागील बाजुस खोल दरी आहे. ह्या खाचेतुन थोडासा कातळटप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून संपुर्ण भामेर किल्ला व आसपासचा खूप मोठा प्रदेश नजरेस पडतो. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे जाताना १०-१२ पायऱ्यांनंतर दुसरा उध्वस्त दरवाजा लागतो. या वाटेवर कोरडे पडलेले एक पाण्याचे टाके पहायला मिळते. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी पुन्हा कातळटप्पा पार करावा लागतो. किल्ल्याचा माथा म्हणजे ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर गावकऱ्यांनी अलीकडे सती मातेचं छोटे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराशेजारी २० × २० फुट आकाराचे पाण्याचे टाके व इतर काही अवशेष नजरेस पडतात. थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाचा बुरुज नजरेस पडतो. येथुन खाली उतरल्यावर डोंगर उतारावर असणारी पाण्याची तीन टाकी व समोर देऊरचा डोंगर व त्यावरील लेणी दिसतात. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. तेथुन ढासळलेला तट चढुन परत बालेकिल्ल्यावर यावे लागते. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर गडावरुन दक्षिणेकडे गाळणा किल्ला तर पूर्वेकडे राव्या-जाव्या नावाची दोन जोड शिखरे दिसतात. गड चढण्यासाठी एक तास तर फिरण्यासाठी तीन तास लागतात. गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी १ पुरेसा होतो. भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रावती नगर होते. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय अशी दंतकथा आहे. तर दुसऱ्या दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारत कालीन राजा युवनाश्न हा त्याची उपराजधानी भामेर येथे पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. भामेर (भंभगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. गडावरील लेणीवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. खानदेश-बऱ्हाणपूर-सुरत मार्गाच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी भामेरसारखा मजबूत किल्ला ताब्यात असणं त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं समजलं जाई. नाशिक-धुळे-सुरत या तीनही शहरांकडे जाणारे मार्ग याच भामेरच्या परिसरातून जातात. प्राचीन काळात लेण्या या व्यापारी मार्गावरच कोरल्या गेल्यात. येथील जैन लेण्या आजही प्राचीन कलेचा वारसा टिकवून आहेत. १२व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. तसा शिलालेख आजही येथे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण (१२१०-४६) गादीवर आला. याने खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरीच्या (भामेर) लक्ष्मीदेवाला जिंकले अशी नोंद आढळते. सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. खानदेशात यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनीं काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होते. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढाऱ्याच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ.ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!