भांगशीगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : औरंगाबाद

उंची : २२१५ फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये पर्यटक सगळ्यात जास्त भेट देणारे किल्ले म्हणजे रायगड आणि देवगिरी होय. पण याच देवगिरीपासून काही अंतरावर असणारा भांगशीगड मात्र कुणाला फारसा परीचीत नाही. औरंगाबाद देवगिरी मार्गावर असलेला हा गड व देवगिरी वगळता या परिसरात विशेष असा कोणताही डोंगर नाही. गडाच्या चारीबाजूंनी असणाऱ्या कातळकड्यांमुळे दुरूनही हा गड आपले लक्ष वेधून घेतो. गडावरील बहुतांशी वास्तू कातळात कोरून तयार करण्यात आल्या आहेत. गडावरील कातळात कोरून काढलेल्या भूयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला भांगसाईगड या नावाने ओळखतात. भांगशीमाता किंवा भांगसाईगड औरंगाबादपासून १४ कि.मी. अंतरावर आहे. औरंगाबाद-देवगिरी रस्त्याने जाताना घाटाच्या अलीकडे उजवीकडे शरणपूर फाटा आहे. तेथून खाजगी वहानाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. भांगशीगड पायथ्यास एक आश्रम असुन सध्या तेथे नवीन मंदीर उभारण्याचे काम चालू अ्राहे. ... गडावर असलेल्या मंदिरामुळे वर जाण्यासाठी पायर्याश बांधल्या असुन या पायऱ्यांनी अर्ध्या तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. पायऱ्यांनी गडचढाई सुरू केल्यानंतर २० मिनिटात आपण उजव्या बाजूला कातळात खोदलेल्या गुहेजवळ येऊन पोहोचतो. ही गुहा पाहून पुढे आल्यावर गडाच्या मुळ बांधकामातील कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आणि खरा गड सुरू होतो. कातळ फोडून तयार केलेला जिना पार करत कातळात कोरलेल्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडाचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे अस्तीत्व दर्शविणारी शेजारील तटबंदीचे काही प्रमाणात शिल्लक आहे. पूर्व-पश्चिम निमुळता होत गेलेला गडाचा माथा समुद्रसपाटीपासून २२१५ फूट उंचावर असुन साधारण अडीच एकरवर पसरलेला आहे. गडावर प्रवेश केल्यावर समोरच भांगसाई देवीच्या मुळ भुयारी मंदिरावर बांधलेले नविन मंदिर दिसते. मंदिराकडे जाताना मंदिरासमोर एक अर्धवट बुजलेल खांबटाक पहायला मिळते. भांगसाईदेवी मंदिराच्या भुयारात कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने गेल्यावर शेंदूर फासलेली देवीची मूर्ती दिसते. देवीची ही गुहा दगडी खांबांनी तोललेली असून तिच्या कोपऱ्यात कोरलेल्या एका लहान वाटेने रांगत दुसऱ्या गुहेत जाता येते. ही गुहा म्हणजे प्रचंड मोठे खांबटाके असून कातळात कोरुन काढलेल्या या गुहेला २५ खांब आहेत. ही गुहा दोन थरात खोदलेली असुन या गुहेत उतरण्यासाठी बाहेरील दक्षिण बाजूनेही पायऱ्यांचा मार्ग आहे. या गुहेच्या एका कोपऱ्यात गणपतीची मुर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत. हे पाहुन मागे न फिरता गुहेच्या दक्षिणेकडील पायऱ्यांनी बाहेर पडावे. भांगसाई देवीच्या मंदिरामागे कातळात कोरलेले मध्यम आकाराचे टाके आहे. गडावर कडयाच्या बाजूने कातळात कोरलेल्या काही गुहा असुन त्यांत पाण्याचे साठे आहेत. कातळ तासून कोरलेले खांब हे या टाक्यांचे आकर्षण आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला वळून खाली उतरावे. या ठिकाणी गडाच्या दुसऱ्या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजा समोरच कातळात खोदलेल्या काही गुहा असुन त्या मोठ्या प्रमाणात बुजलेल्या आहेत. हा दरवाजा पाहून परत गडमाथ्यावर यावे. हे पाहून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले एक टाके लागते. या टाक्याच्या आतील बाजूच्या कातळाच्या पोटात चार झरोके खोदण्यात आले असून त्याच्या आतमध्ये पाण्याचा साठा आहे. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेल शिवलिंग व नंदी आहे. या मूर्तींच्या पुढच्या बाजूस आणखी दोन मोठी पाण्याची टाकी व त्यांना लागूनच एक बैठ घर बांधलेल आहे. यातील एका टाक्यात मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते. येथून गडाच्या उत्तर बाजूच्या काठाने पुढे जाताना गडावरून खाली उतरणाऱ्या पायऱ्या लागतात. त्या उतरून खाली गेल्यावर कातळाच्या पोटात तीन दालन असलेल खांबटाक कोरलेल आहे. या टाक्यासमोरील भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. ही कोठारे पाहून वर यायचे व किल्ल्याचे पश्चिम टोक पाहून प्रवेशव्दाराकडे परत फिरायचे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीसाठी साधारण तासभर लागतो. गडावरून औरंगाबाद टेकड्या व पश्चिमेला देवगिरीचा मुलुख दिसतो. गडाचा इतिहास आज उपलब्ध नसला तरी गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा हा गड प्राचीन काळापासुनच अस्तित्वात असल्याची साक्ष देतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!