भवानीगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रत्नागीरी

उंची : ८१० फुट

श्रेणी : सोपी

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात भवानीगड हा डोंगरी किल्ला एका लहानशा डोंगरावर उभा आहे. या किल्ल्याची उभारणी नक्की केव्हा झाली हे ठाऊक नसले तरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तुरळ गावातील गरम पाण्याच्या कुंडाशेजारी असलेले प्राचीन शिवमंदीर व किल्ल्यावरील पाण्याची खोदीव टाकी व कोठारे पहाता हा किल्ला ११-१२ व्या शतकातील असावा असे वाटते. तुरळ येथील गरम पाण्याच्या कुंडाशेजारी मोठया प्रमाणात असणाऱ्या सतीशिळा व विरगळ पहाता येथे एखादे मोठे युद्ध घडले असावे असे दिसते पण इतिहास मात्र याबाबत अबोल आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ गावापासुन किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिर्केवाडी पर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता असुन हे अंतर ७ कि.मी.आहे. हा रस्ता तुरळ -कडवई- गोसावीवाडी -शिर्केवाडी असे टप्पे घेत किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पायऱ्यापर्यंत जातो. गडावरील भवानी मंदिरात गावकऱ्यांचा वावर असल्याने मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. ... या पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचण्यास १५ मिनिटे लागतात. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी थोडेसे अलीकडे डावीकडे खडकात खोदलेल्या पाण्याच्या तीन टाक्या व एक कोठार दिसुन येते. यातील एका टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य असुन पाणी काढण्यासाठी मार्चनंतर दोरी आवश्यक आहे. टाक्या पाहुन उर्वरित पायऱ्या चढुन किल्ल्याच्या उध्वस्त पुर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्याचा आकार आयताकृती असुन किल्ल्याच्या तटबंदीत अर्धवट ढासळलेले सहा बुरुज पहायला मिळतात. बालेकिल्ल्याची तटबंदी केवळ दगड एकमेकांवर रचून करण्यात आलेली असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ अर्धा एकरपेक्षा कमी आहे. प्रवेश केल्यावर समोरच भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर दिसते. या कौलारू मंदिराच्या आत दोन दगडी मंदिरे असुन एका मंदिरात भवानी मातेची मुर्ती तर दुसऱ्या मंदिरात शिवलिंग व एक समाधी दिसुन येते. या दोन मंदिराच्या मधील भागात शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा ठेवलेला असुन त्यामागील भागात दुसरी समाधी दिसुन येते. मंदिरात एक रंग लावलेली छोटी तोफ उघड्यावरच ठेवलेली आहे. भवानी मंदिराच्या डाव्या बाजुला उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसुन येतात तर मागील बाजूस बालेकिल्ल्याचा दुसरा उत्तराभिमुख उध्वस्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच किल्ल्याचे दक्षिण टोक आहे. येथुन उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यावर खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. या तीनही टाक्यात पाणी असुन त्यांचा वापर नसल्याने त्यात दगडमाती पडुन ती बुजण्याच्या मार्गावर आहेत. गडावरून लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. केवळ टेहळणीचा किल्ला असे या किल्ल्याचे स्वरूप असल्याने किल्ल्याचा फारसा इतिहास आढळत नाही पण इ.स. १६६१ मध्ये कोकण प्रांत शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडूजी करुन गडावर भवानी मातेचे मंदिर बांधले. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतल्याची नोंद आढळते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!