भवानगड
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : १५० फुट
श्रेणी : सोपी
मुंबई बेटामुळे कोकणचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. दक्षिण कोकणात रायगडपासुन कारवारपर्यंतचा समुद्रीपट्टा सामील आहे तर उत्तर कोकणात ठाणे-पालघर पासुन दमणपर्यंतचा प्रदेश सामील होतो. वैतरणा नदी आणि अरबी समुद्रामुळे निसर्गरम्य झालेल्या या भागात असणारी मंदीरे, गड किल्ले, सागरकिनारे मुंबईहुन एका दिवसात सहजपणे भटकता येतात. पालघर व केळवे स्थानकापासुन जवळच असलेला केळवेचा समुद्रकिनारा यात चांगलाच प्रसिध्द आहे. या केळवे किनाऱ्यापासुन साधारण ३ किमी अंतरावर १५० फुट उंचीच्या छोट्या झाडीभरल्या टेकडीवर भवानगड किल्ला आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेल्या या टेकडीवर आंबा काजू यासारख्या फळझाडांची लागवड केलेली आहे. मुख्य रस्त्यापासुन कच्च्या रस्त्याने चालत ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या माचीवरील भग्न दरवाजात पोहोचतो. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा आज पूर्णपणे नष्ट झाला असुन दोन्ही बाजुस असणारे बुरुज मात्र शिल्लक आहेत.
...
किल्ल्याचे बांधकाम लढाईच्या धामधुमीत केले गेले असल्याने चुन्याचा वापर न करता केवळ मोठमोठे दगड एकमेकांवर रचुन तटबंदी उभारलेली पहायला मिळते. दरवाजातुन आत शिरल्यावर माचीच्या या भागात उजवीकडे भवानगडेश्वराचे जिर्णोध्दार केलेले मंदिर आहे. येथुन डावीकडे खाली उतरत जाणारी माचीची तटबंदी दिसते तर सरळ जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यात घेऊन जाते. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा वळणदार मार्गाने दोन बुरुजात लपवलेला असल्याने सहजपणे नजरेस येत नाही. दरवाजाची कमान नष्ट झाली असली तरी त्याचे अस्तित्व दर्शविणारे शेजारील बुरुज व आसपासचे बांधकाम आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या या भागातील बांधकामात काही ठिकाणी चुन्याचा वापर केलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. येथुन पुढे आल्यावर दुसऱ्या पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. येथे समोरच कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे पाण्याचे टाके असुन या टाक्यातील पाणी मंदीरात व पिण्यासाठी वापरले जात असल्याने त्याला अलीकडे सिमेंटचा गिलावा केलेला आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्यांच्या परीसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडांच्या मुळांनी बहुतांशी तटबंदी नष्ट केलेली आहे. टाकीजवळ तटबंदीवर उभे राहील्यास संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. किल्ल्यावर इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाहीत. या तटबंदीवरून सरळ चालत गेल्यास एक पायवाट खाली तटाबाहेर उतरते. या वाटेने काही अंतर खाली उतरल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेली एक गुहा दिसते. या गुहेच्या आतील बाजुस अजून एक दालन कोरलेले आहे. ही पायवाट पूढे दांडपाडयात उतरते. गुहा पाहुन तटबंदीवर परतल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ल्याचा परीसर साधारण एक एकरात पसरलेला असुन गडाच्या तटबंदीत आपल्याला लहानमोठे आठ बुरुज पहायला मिळतात. इ.स.१५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ला उभारताना या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी परिसरात शिरगाव, माहीम, केळवे या भागात किल्ल्यांची साखळीच उभारली. पालघरचा हा प्रदेश इ.स.१५३४ ते १७३७ या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी मराठ्यांकडे आल्यावर इ.स.१७३७ मध्ये चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाखाली वसई मोहीमेची ठरवण्यात आली. या मोहिमेत गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर यासारखे मातब्बर सरदार सामील होते. पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी जुलै १७३७ च्या सुरवातीला येन पावसाळ्यात दोन हजार मराठयांनी दंडाकातालच्या खताली परगण्यात केळव्यापासून दीड मैलावर भवानगडची बांधणी सुरु केली. कागदपत्रात ६०० जंजिरे अर्नाळापैकी २०० बराबर स्वारी मोरजी शिंदे देखील ४०० भवानगडपैकी १००० बराबर मल्हारी असाम्या अलीकडे आहेत असा संदर्भ मिळतो. वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली. माहीम केळवे,दातिवरे या दळणवळणाच्या वाटेवर वचक ठेवण्यासाठी हि एकच टेकडी आहे. येथुन दांडा खाडी व आसपासचा बराच मोठा परिसर नजरेस येत असल्याने दांडाखाडीची नाकेबंदी करून एडवन, कोरे, माथाणे, उसरणी या चौकीमार्फत पोर्तुगीजांना मिळणारी रसद तोडण्यासाठी भवानगड व धारावी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. वसई मोहिमेनंतर हा भाग मराठ्यांच्या अंमलाखाली आला. त्यानंतर १८१८मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सध्या भवानगडावर असणारे शिवमंदिर शके १८३८ अनलनाम सवन्तसरे माहे चैत्र शुद्ध १ म्हणजे इ.स.१९१७ मध्ये बांधण्यात आले असुन दरवर्षी महाशिवरात्रीला गडावर मोठी यात्रा भरते.
© Suresh Nimbalkar