भरतगड
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : २१० फुट
श्रेणी : सोपी
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भैरवगडाजवळ उगम पावणारी गड नदी म्हणजे सिंधुसागराला मिळणारी कालावल खाडी. या नदीच्या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत अनेक लहानमोठे किल्ले बांधलेले आहेत. यात उगमाजवळ भैरवगड-सोनगड, पुढे रामगड, त्यानंतर कालावल खाडीच्या दोन्ही बाजुस लहान टेकडीवर भरतगड-भगवंतगड हि दुर्गजोडी तर संगमावर सर्जेकोट बांधलेला आहे. निसर्गाचे भरभरून वरदान या परिसराला लाभलेले असुन मंत्रमुग्ध करणारा हा परीसर कोकण भटकंतीत आवर्जुन पहायलाच हवा !!! कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरवात केल्यास सर्जेकोट, भरतगड-भगवंतगड,रामगड हे चार किल्ले एका दिवसात सहजपणे पाहुन होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसुरे हे पायथ्याचे गाव असुन मालवण हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन मालवण शहर ४६० कि.मी. अंतरावर असुन मालवणच्या २० कि.मी.अलीकडे मसुरे गाव आहे.
...
कणकवलीहुन आंगणेवाडी मार्गे मसुरे गाव ३५ कि.मी.अंतरावर आहे. कालावल खाडीच्या दक्षिण काठावर असलेल्या मसुरे गावामागे पुर्वपश्चिम पसरलेल्या २१५ फुट उंचीच्या लहानशा टेकडीवर भरतगड वसलेला आहे. गावात आल्यावर गावामागील टेकडीवर असलेल्या भरतगडची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. गावातील पावणाई मंदिराजवळ गडावर जाणारी वाट असुन या वाटेवर जांभ्या दगडात पायऱ्या बांधल्या आहेत. या वाटेने १० मिनिटात आपण गडाच्या नष्ट झालेल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. याशिवाय एक कच्चा गाडी रस्ता डोंगराला वळसा घालत या दरवाजापर्यंत येतो. सोबत वाहन असल्यास वाहनाने थेट दरवाजापर्यंत जाता येते. गडाचा दरवाजा नष्ट झाला असला तरी त्याशेजारी असलेले बुरुज व तटबंदी मात्र शिल्लक आहे. गडाच्या तटबंदी बाहेर २० फुट खोल व १० फुट रुंद खंदक खोदलेला असुन या खंदकातील दगड गडाच्या बांधकामात वापरलेले आहेत. सध्या या खंदकात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. या दरवाजातुन काही पायऱ्या चढुन आल्यावर वाट उजवीकडे वळते. गडाच्या तटबंदी खालुन जाणारी हि वाट बाहेरील बाजुस तटबंदी बांधुन बंदीस्त करण्यात आली आहे. बाहेरील बाजुस असलेल्या या तटबंदीत एक बुरुज बांधलेला असुन त्याखाली खंदक खोदलेला आहे. गडाच्या उत्तरेकडील दरवाजात जाणारी हि वाट तटावरून पुर्णपणे माराच्या टप्प्यात आहे. या वाटेने केवळ चौकट शिल्लक असलेल्या उत्तराभिमुख दरवाजाने आपण गडाचा उत्तर टोकावरील मोठया बुरुजाजवळ प्रवेश करतो. मध्यभागी गोलाकार असलेला हा गड उत्तर व दक्षिण टोकावर निमुळता होत गेलेला असुन संपुर्ण गडाचा परीसर साधारण ७ एकरवर सामावलेला आहे. गडाची हि दोन्ही टोके मोठया बुरुजांनी बंदीस्त केलेली आहेत. गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असून मध्यभागी ३ बुरुज असलेला बालेकिल्ला व उर्वरीत बाजुस माची अशी याची रचना आहे. पुरातत्व खात्याने अलीकडेच या किल्ल्याची दुरुस्ती केली असुन त्याला मुळ स्वरुपात आणण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. यामुळे आपल्याला किल्ल्याच्या तटावर असलेल्या फांजीवरून संपुर्ण किल्ल्यास फेरी मारता येते. गडात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डावीकडे फांजीवर चढून पुर्व बाजुने तटावरून फेरी मारून घ्यावी. तटावरून दक्षिणेकडे निघाल्यावर दुसऱ्या बुरुजाच्या पुढील भागात एक वास्तु चौथरा पहायला मिळतो. येथुन उजवीकडे बालेकिल्ल्याची तटबंदी त्यात असलेला लहान दरवाजा व त्या शेजारील बुरुज पहायला मिळतो. येथुन पुढे जाताना तिसऱ्या बुरुजाशेजारी खडकात कोरलेला कोरडा साचपाण्याचा तलाव दिसतो. हा बुरुज पार करून आपण गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या सोंडा बुरुजावर येतो. येथुन दुरवर वाहत जाणारी कालावल खाडी व खाडी पलिकडे गर्द झाडीत लपलेला भंगवतगड दिसतो. येथुन गडाच्या पश्चिमेकडील तटबंदी वरून उत्तरेकडे जाताना अजुन ४ बुरुज पहायला मिळतात. या तटबंदीत आपल्याला गोलाकार अर्धगोलाकार आकाराचे लहानमोठे असे एकुण ९ बुरुज पहायला मिळतात. या सर्व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन तोफा डागण्यासाठी झरोके आहेत. काही बुरुजांच्या मध्यभागी दगडी खांब असुन पावसाळ्यात यावर वासे ठेऊन बुरुजांची शाकारणी करण्यासाठी हि रचना केलेली आहे. दोन बुरुजावर असलेली कौले पहाता या ठिकाणी कायम स्वरूपी बंदीस्त चौकी असावी. शेवटच्या बुरुजावरून समोरच दुसऱ्या बाजुस असलेली बालेकिल्ल्याची तटबंदी त्यातील मुख्य दरवाजा व शेजारील बुरुज पहायला मिळतो. या बुरुजाच्या माथ्यावर छप्पर असलेल्या खुणा दिसुन येतात. बालेकिल्ल्याची तटबंदी साधारण १०-१२ फुट उंच असुन ३५०X१८० फुट लांबीरुंदीचा बालेकिल्ला १.५ एकरवर पसरलेला आहे. दरवाजाने आत प्रवेश केल्यावर उजवीकडे पहाऱ्याची देवडी असुन त्याशेजारी तटावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या डावीकडे चौथऱ्यावर महापुरुषाचे जिर्णोद्धार केलेले मंदीर असुन मंदिराच्या आवारात तुळशी वृंदावन आहे. कोकणात पिंपळाची महापुरुष म्हणुन पुजा केली जाते पण येथे पिंपळाचे झाड दिसत नाही. मंदिरामागे डावीकडील भागात कातळात खोदलेली पायऱ्यांची विहीर असुन काळाच्या ओघात या विहिरीच्या काही पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. हि विहीर २०० फुट खोल असल्याचे सांगीतले जाते. विहिरीकडे असलेल्या बालेकिल्ल्याच्या टोकाला बुरुज बांधलेला नसुन या ठिकाणी कोठारासारखी बंदीस्त वास्तु आहे. विहिरीच्या उजवीकडे ५-६ फुट उंचीचा एक चौथरा असुन हा चौथरा आपल्याला भगवंतगड वर असलेल्या मंदिराच्या चौथऱ्याची आठवण करून देतो. चौथऱ्याच्या उजवीकडे तटाला लागुन एक वास्तु आहे पण या वास्तुचे बांधकाम अगदी अलीकडील काळातील वाटते. हे पाहुन झाल्यावर बालेकिल्ल्याच्या मागील बाजुस जावे. बालेकिल्ल्याच्या मागील बाजुस उजवीकडील असलेला बुरुज पुर्णपणे ढासळला आहे तर डावीकडे अर्धवट ढासळलेला बुरुज नव्याने बांधुन काढलेला आहे. हा बुरुज तटावर बांधलेला नसुन तळातून बांधुन काढलेला आहे. तीन मजली असलेल्या या बुरुजात रहाण्याची सोय आहे. या बुरूजा शेजारील तटात बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या तटालगत असलेले बांधीव दगडी खांब पहाता पुर्वी तटाला लागुन मोठया प्रमाणात रहाण्याची सोय असावी. या शिवाय तटबंदीत दोन शौचकुप देखील पहायला मिळतात. बालेकिल्ला पाहुन उत्तर बुरुजावर आल्यावर आपली तासाभराची गडफेरी पुर्ण होते. मसुरे गावात कालावल खाडीकाठी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपतींचा इतिहास वाचताना त्यांच्यात सतत चालत असलेली कुरबुर ठळकपणे ध्यानात येते. इ.स. १७०१ मध्ये फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी प्रथम विहिर खोदली व या विहीरीला पाणी लागल्यावर भरतगडची बांधणी केली. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसल्यावर सावंतानी पेशव्यांची बाजु घेतली त्यामुळे इ.स. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच सावंतांनी गड परत ताब्यात घेतला. सन १७८७ मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला पण नंतर त्याचा ताबा सावंतांकडेच दिला. इ.स.१८१८ मध्ये कॅप्टन हचीन्सनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळी गडावर झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे विहीरीच्या तळाला तडे जाऊन विहीरीतील झरे बंद झाल्याने गडावर पाण्याचा तुटवडा भासत होता. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या. इ.स.१८१८ मध्ये झालेल्या एका पहाणीत गडावर अठरा तोफा असल्याची नोंद आढळते.
© Suresh Nimbalkar