भद्रावती
प्रकार : भुईकोट
जिल्हा : चंद्रपुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्गभटकंती करताना आपल्याला गोंड राज्याची समृद्धी व कलाप्रेम दर्शविणारा भद्रावती किल्ला पहायला मिळतो. भद्रावती किंवा भांदक हे चंद्रपुर जिल्हयातील तालुक्याचे ठिकाण चंद्रपूर येथून २८ कि.मी. अंतरावर आहे. प्राचीनतेशी नाते सांगणाऱ्या या शहराचा इतिहास दोन हजार वर्षापेक्षाही जुना आहे. येथे असणारा भद्रावती किल्ला केवळ दुर्ग अवशेष अंगावर लेवुन परीपुंर्ण नाही तर अनेक शिल्पांनी देखील संपन्न आहे. भद्रावती शहरात सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती पुरातत्व खात्याने या किल्ल्यात मांडुन ठेवलेल्या आहेत. भद्रावती शहर नागपुर-चंद्रपुर महामार्गावर वसलेले असुन महामार्गापासुन किल्ला साधारण १.५ कि.मी.आत शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला २.५ एकरवर पसरलेला असुन त्याच्या तटबंदीत चौकोनी आकाराचे लहानमोठे आठ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडील तटबंदीत मुख्य दरवाजा तर दक्षिणेकडील तटबंदीत पुर्वाभिमुख दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन चौकोनी बुरुजात लपवलेला असुन हे दोन्ही बुरुज व दरवाजा घडीव दगडात बांधलेला आहे. यात तोफांचा तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवलेल्या आहेत.
...
या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करताना दर्शनी भागात दोन बाजुना गोंड राजवटीचे राजचिन्ह असलेली सिंहशिल्प पहायला मिळतात. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस तटबंदीला लागुन उंच चौथऱ्यावर दोन मोठी दालने आहेत. हि दोन्ही दालने नक्षीकामाने व शिल्पांनी सजवलेली असुन सध्या या दोन्ही दालनात किल्ल्यात व शहरात इतरत्र सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती ओळीने मांडुन ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मस्तक विरहीत कुबेराची मोठी मूर्ती असुन त्यात हंड्यावर बसलेल्या कुबेराच्या हातात मुंगुसाची शेपटी व पायाखाली धनाचे हंडे कोरलेले आहेत, याशिवाय गणेश, शिवपार्वती, महिषासुरमर्दिनी, भगवान महावीर, भगवान बुध्द, भद्रनाथ, विष्णू लक्ष्मी, नरसिंह व वराह अवतारातील विष्णु, नर्तकी, व्याल, सिह ,विरगळ अशा अनेक प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. या शिवाय उजवीकडील दालनातील भिंतीवर नक्षीदार कोनाडे असुन काही शिल्प कोरलेली आहेत. यात मस्यभेद करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प पहायला मिळते. दोन्ही दालनाच्या शेजारी बुरुजावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजांवर तोफ बसवण्यासाठी तसेच ध्वज रोवण्यासाठी गोलाकार दगडी कट्टा आहे. येथुन किल्ल्याचा आतील संपुर्ण परीसर नजरेस पडतो. किल्ल्याचा आतील भाग म्हणजे एक प्रशस्त पटांगण असुन यात एकुण सात वास्तुंचे चौथरे व एक चुन्याचा घाणा नजरेस पडतो. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात एक पायऱ्यांची विहीर दिसुन येते. दरवाजाकडील भाग फिरून झाल्यावर या विहिरीजवळ यावे. हि विहीर म्हणजे एक प्रकारचा पाणीमहाल असुन आत उतरण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या आहेत. या पायऱ्या आपल्याला विहिरीत तीन वेगवेगळ्या पातळीवर नेतात. चौकोनी आकाराच्या या विहिरीच्या तीन बाजू घडीव दगडात बांधलेल्या असुन त्यात नक्षीदार कमानी बांधलेल्या आहेत. विहिरीची केवळ एक बाजु विटांनी बांधलेली असुन तळाशी एक भलामोठा दगड बसवलेला आहे. तेथुन किल्ल्याबाहेर जाण्यासाठी भुयार असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्यास पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस मोट बांधलेली असुन खांब रोवण्यासाठी तसेच जास्तीचे पाणी पुन्हा विहिरीत सोडण्यासाठी दोन गजशिल्पे बसवलेली आहेत. विहिरीपासुन जवळच चुन्याचा घाणा पहायला मिळतो. किल्याच्या आत असलेल्या वास्तुचे केवळ चौथरे शिल्लक असल्याने तेथे नेमके काय असावे याच बोध होत नाही. यातील एक चौथरा तटबंदीला लागुन दुसऱ्या दरवाजाजवळ असल्याने तेथे सैनिकांच्या राहण्याची सोय असावी. किल्ल्याचा दुसरा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन हे दोन्ही बुरुज मुख्य दरवाजाच्या बुरुजापेक्षा लहान आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात एक मानवी शीर शिल्प कोरलेले आहे. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी समोर आडवी भिंत घालण्यात आली असुन तिच्या टोकाला तटबंदीलगत गोलाकार बुरुज बांधलेला आहे. हे काम बहुदा नंतरच्या काळात करण्यात आले असावे. हा दरवाजा पाहुन मुख्य दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. याशिवाय किल्ल्याजवळ असलेल्या मंदीरात आपल्याला एक मोठी गणपतीची मुर्ती पहायला मिळते. भद्रापूर किल्ल्यासोबत आपल्याला येथुन जवळच एका लहानशा टेकडीवर असलेली विजासन हि बौद्धकालीन लेणी पहाता येतात. प्राचीन काळापासुन विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या व त्यांनी काळानुरूप किल्ल्यांची बांधणी केली. भद्रावती गावाच्या पश्चिमेस असलेल्या विजासन टेकडीवर बौद्ध लेणी कोरलेली पहायला मिळतात. हि लेणी हीनयान पंथाच्या काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत बुद्धांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यामुळे भद्रावती शहराचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. सातवाहन काळानंतर १२ व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, माणीकगड, सुरजागड या सारख्या किल्ल्यांची बांधणी केली. यातील भांकासिंह नावाच्या नागवंशीय राजाने भद्रावती नगरीची स्थापना केल्याचे मानले जाते. या किल्ल्यांच्या दरवाजावर असलेली नागशिल्पे पहाता या गोष्टीस पृष्टी मिळते. यानंतर १३ व्या शतकात विदर्भात गोंड राजवटीचा उदय झाला व त्यांनी या भागात आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप या किल्ल्याच्या बांधकामात दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे गोंड राजांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात त्यांनी मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवले नाहीत. यानंतर १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड या सारख्या महत्वाच्या किल्ल्यांची पुनर्बांधणी केली पण राज्याच्या अंतर्गत भागात असलेले दुय्यम किल्ले दुर्लक्षिले गेले.
© Suresh Nimbalkar