भडगाव

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0

महाराष्ट्रातील भटकंती करताना नजर शोधक ठेवली तर प्रत्येक महत्वाच्या शहरात त्याची जुनी ओळख सांगणाऱ्या काही ना काही ऐतिहासिक वास्तु पहायला मिळतात. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेले भडगाव हे असेच एक महत्वाचे शहर. भडगावची ओळख अत्यंत प्राचीन असुन भृगू ऋषीच्या वास्तव्य मुळे ह्या शहराला भडगाव नाव मिळाले असे येथील जुने जाणकार सांगतात. आताच्या भडगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर चाळीसगांव, पारोळा, एरंडोल या शहरांच्या मध्यवर्ती भागात असुन जळगाव येथुन ६४ कि.मी अंतरावर आहे. मध्ययुगीन काळात भरभराटीस आलेल्या या शहराच्या रक्षणासाठी संपुर्ण शहराभोवती कोट उभारला गेला व या कोटाचे अवशेष आजही आपल्याला पहायला मिळतात. वाढत्या शहरीकरणाने या कोटाच्या तटबंदीचा घेतला असुन हे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आहेत. भडगाव शहराला तीन बाजुंनी गिरणा नदी पात्राने वेढलेले असुन या कोटाचा शिल्लक असलेला एक दरवाजा या नदीपात्राच्या दिशेलाच आहे. या दरवाजा जवळ महादेव व शंकराचे मंदिर असुन नव्याने बांधलेले गणपतीचे मंदिर आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या दरवाजा शेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन या तटबंदीमध्ये एक उध्वस्त बुरुज पहायला मिळतो. ... या दरवाजाने आत शिरल्यावर दुसऱ्या डावीकडील रस्त्याने सरळ गेल्यावर या रस्त्याच्या टोकाला दगडी बांधकाम असलेला गोलाकार आकाराचा सुस्थितीत असणारा बुरुज पहायला मिळतो. २५ फुट उंच असणाऱ्या या बुरुजाचे वरील बांधकाम विटांनी केलेले असुन त्याला लागुनच एका नवीन घराचे बांधकाम केलेले आहे. ओळखीची खुण म्हणजे या बुरुजाजवळ आबासाहेब दत्ता पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या शिवाय बडी मोहल्ला कब्रस्थान जवळ अर्धवट शिल्लक असलेला अजून एक बुरुज पहायला मिळतो. येथुन निघाल्यावर लाडकुबाई विद्या मंदिर शाळेजवळ यावे. या शाळेच्या आवारात पुर्णपणे विटांनी बांधलेला ५० फुट उंचीचा मोठा बुरुज पहायला मिळतो. हा बुरुज आतुन पोकळ असुन त्याच्या वरील बाजुस मजले व गवाक्ष बांधून त्यात राहण्याची सोय असल्याचे दिसुन येते. बुरुजाची एका बाजूने पडझड झाली असल्याने बुरुजाच्या वरील भागात जाता येत नाही. हा बुरुज नगरकोटाच्या तटबंदी मधील नसुन निरीक्षणासाठी पुर्णपणे वेगळा बांधला असावा. या बुरूजाजवळच लाडकुबाई देशपांडे यांची गढी होती. या गढीच्या जागेवरच आज लाडकुबाई विद्या मंदिर शाळा उभी आहे. या शाळेजवळ गढीचा एक बुरुज आजही शिल्लक असुन त्यावर सिमेंट थापल्याने तो ओळखता येत नाही. या बुरुजाजवळ गढीतील एक वास्तु शिल्लक असुन तिचे नूतनीकरण सुरु झाले आहे. या शिवाय नगरकोटचा अजून एक प्रशस्त बुरुज आपल्याला भडगाव कासोदा मार्गावर रस्त्यालगत पहायला मिळतो. हा बुरुज २५ फुट उंच असुन बुरुजाचा खालील भाग दगडांनी तर वरील भाग विटांनी बांधलेला आहे. बुरुजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुन येतात. भडगाव पेठेच्या महादेव गल्लीतुन बाहेर पडताना गल्लीच्या टोकावार हनुमान मंदिर आहे. या मंदीराच्या मागील बाजुस सुबक दगडी बांधणीतील वृंदावन पहायला मिळते. येथे आपली भडगाव नगरकोटाची फेरी पुर्ण होते. गिरणा नदीच्या काठावर दुसऱ्या बाजुस महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर असुन त्यांनी या ठिकाणी एका झाडाखाली १५ दिवस मुक्काम केल्याचे सांगितले जाते. लाडकुबाई देशपांडे यांचा वाडा आज जरी थोड्याफार प्रमाणात शिल्लक असला तरी येथील बुरुज पहाता हा वाडा म्हणजे एक प्रकारची गढीच होती. हि गढी सतराव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात बांधली गेली. इ.स १६०१ मध्ये खानदेश मुघल साम्राज्याचा भाग बनल्यावर भडगावचे रामजीपंत देशपांडे यांनी मुघलांच्या वतीने अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांना नशिराबादचे राजे या किताबा सोबत नशिराबाद.एरंडोल,जामनेर,बहाळ, आणि भडगाव या ठाण्यांची जहागिरी मिळाली. रामजीपंत देशपांडे यांनी जहागिरीचे मुख्यालय नशिराबाद येथुन भडगाव येथे आणल्याने भडगावची भरभराट झाली. रामजीपंत यांनी भडगाव येथे गढी बांधली. रामजीपंत यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी लाडकुबाई देशपांडे या भागाची व्यवस्था पाहू लागली. तिने गिरणेच्या काठावर सुमारे ३०० भिल्ल लुटारू ठार मारले व या भागावर आपली पकड बसवली. तिच्यामुळे भडगावला लोक लाडकुबाईचे भडगाव म्हणुन ओळखू लागले. माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठेशाहीवर कोसळलेल्या संकटात ज्या मराठा सरदारांनी मोगलांशी झुंज दिली त्यात पवार बंधुंचे नाव दिसुन येते. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला. त्यामुळे त्यांना खानदेशातील जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा, बहाळ परगणा व भडगाव परगणा जहागीर म्हणून मिळाला. सरदार पवार यांनी आपले जहागिरीचे ठिकाण नगरदेवळे येथे करून तेथे गढीवजा राजवाडा बांधला आणि भडगावचे महत्व कमी होऊन नगरदेवळ्याला महत्त्व प्राप्त झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!