भगवंतगड

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : १८० फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भैरवगडाजवळ उगम पावणारी गड नदी म्हणजे सिंधुसागराला मिळणारी कालावल खाडी. या नदीच्या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत लहानमोठे अनेक किल्ले बांधलेले आहेत. यात उगमाजवळ भैरवगड-सोनगड, पुढे रामगड, त्यानंतर दोन्ही काठावर भरतगड-भगवंतगड हि दुर्गजोडी तर संगमावर सर्जेकोट बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला वगळल्यास या भागातील इतर किल्ल्यास सहसा कोणीही भेट देत नसल्याने हे किल्ले ओस पडले आहेत. या कालावल खाडीच्या म्हणजेच गड नदीकिनारी दोन्ही बाजुस लहान टेकडीवर भरतगड-भगवंतगड हि दुर्गजोडी वसलेली आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला अगदी चित्रमय असलेला हा परीसर आपल्या कोकण भटकंतीत आवर्जून पाहण्यासारखा आहे. यातील भरतगडावर सध्या पुरातत्व खात्याचे काम चालु असुन त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे पण भगवंतगडला मात्र पुर्णपणे निसर्गाच्या हवाली केलेले आहे. ... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या भगवंतगडावर जाण्यासाठी आचरा मसुरे हि जवळची गावे असुन मालवण हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन मालवण शहर ४६० कि.मी.अंतरावर असुन मालवणच्या २० कि.मी.अलीकडे आचरा-मसुरे हि गावे आहेत. आचरे येथुन ५ कि.मी. अंतरावर भगवंतगडवाडी हे गडपायथ्याचे गाव असुन मसुरे येथुन गेल्यास नव्याने बांधलेल्या एका लहान पुलावरून आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. या पुलावरून केवळ दुचाकी अथवा लहान चारचाकी जाऊ शकते. कोकणातील खाडीकाठी असलेल्या बहुतांशी किल्ल्यांची रचना एकसमान दिसुन येते ती म्हणजे टेकडीवर असलेला मुख्य किल्ला व तेथुन थेट खाडीच्या काठापर्यंत आलेली तटबंदी. गोपाळगड,जयगड-विजयगड,यशवंतगड, रामगड, देवगड या किल्ल्यात हि रचना दिसुन येते. अर्थात पुर्णगड,आंबोळगड सारखे काही किल्ले याला अपवाद देखील आहेत. भगवंतगड हा किल्ला असाच दोन भागात विभागलेला असुन टेकडीवर बालेकिल्ला व खाडीकाठी परकोट अशी याची रचना आहे. भगवंतगड गावातील शाळेमागुन मळलेली वाट १० मिनीटात आपल्याला गडावर घेऊन जाते. या वाटेने जाताना डाव्या बाजुस झाडीत लपलेली तटबंदी दिसुन येते. या वाटेवर असलेला गडाचा पाश्चिमाभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याशेजारी असलेला बुरुज व तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. हा गडात प्रवेश करणारा मुख्य दरवाजा नसुन परकोटातुन गडात शिरणारा दरवाजा आहे. गडावर शिल्लक असलेली एकमेव वास्तु म्हणजे येथे उंच चौथऱ्यावर असलेले भगवंतेश्वरचे कौलारू मंदीर. साधारण ६ फुट उंच चौथऱ्यावर घडीव दगडात बांधलेल्या या मंदिरात एका मोठया खडकाचीच तांदळा स्वरूपात पुजा केली जाते. मंदीराच्या डाव्या बाजुला घडीव दगडात बांधलेले ८ फुट उंच तुळशी वृंदावन आहे. हि बहुदा समाधी असावी. या समाधी शेजारी एक लहान चौथरा आहे. मंदिरापुढे नव्याने पत्र्याचा मंडप बांधलेला आहे. गडावर लोकांची वर्दळ नसल्याने काटेरी झुडपांचे रान माजले आहे. या झाडीमुळे गडाचे अवशेष ठळकपणे दिसुन येत नाही. झाडीतुन वाट काढत या सर्व अवशेषांची शोधाशोध करावी लागते. मंदिरामागे या झाडीतुन वाट काढत थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजुच्या तटबंदीत गडाचा पुर्वाभिमुख महादरवाजा आहे. दरवाजाची चौकट व आतील दोन्ही बाजुस असलेल्या देवड्या आजही शिल्लक असुन कमान मात्र नष्ट झाली आहे. दरवाजा बाहेर पडुन काही अंतरावर गेल्यावर दरवाजा शेजारी असलेले दोन्ही बुरुज पाहता येतात. हा गडाचा मुख्य म्हणजे महादरवाजा आहे. गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन झाडीतुन वाट काढत या तटावर फिरताना अजूनही तग धरून असलेले ३ बुरुज पहायला मिळतात. गडावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे गडाचे उत्तर टोक. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची १९२ फुट आहे. या टोकावर १५ फुट व्यासाचा एक मोठा बुरुज बांधलेला असुन बाहेरील बाजुने या बुरुजाची उंची २५ फुटापेक्षा जास्त आहे. या बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. या बुरुजावरून खुप दूरवरचा परीसर दिसत असावा पण आज वाढलेल्या जंगलामुळे ५ फुटावर असलेला माणुस दिसत नाही. झाडीतुन वाट काढत फिरल्यास तुरळक चौथरे पहायला मिळतात. गडावरुन आसपासचा परिसर पहायचा असल्यास मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडामागे जावे. येथुन कालावल खाडी व भरतगडाचे विहंगम दृश्य दिसते. गडाचा एकुण परिसर साधारण ३.५ एकर असुन गडमाथा दिड एकरवर तर खाडीकडील भाग २ एकरवर पसरलेला आहे. गडमाथा फिरून झाल्यावर गडाचा उर्वरीत भाग पहाण्यासाठी शाळेकडे यावे व सरळ जाणाऱ्या रस्त्याने खाडीकडे जावे. काही अंतरावर कच्चा रस्ता सुरु होतो. हा रस्ता खाडीपात्राला लागुन जातो. या वाटेने गेल्यावर खाडीच्या काठावर असलेले गडाचे दोन बुरुज पहायला मिळतात. भगवंतगडची तटबंदी टेकडीवरून या बुरुजापर्यंत उतरत आली आहे. या तटबंदीत असलेला गडाचा पहिला दरवाजा पुर्णपणे नामशेष झाला असुन त्याच्या केवळ पायऱ्या शिल्लक आहेत तर दुसऱ्या तटबंदीत बुरुजाशेजारी असलेल्या दरवाजाचे केवळ अवशेष शिल्लक आहेर. दोन बाजूनी उतरत आलेल्या या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन मध्यभागी एक विहीर आहे. गडावर या विहिरीतुनच पाणी पुरवठा केला जात असावा. येथे आपली दुर्गफेरी पूर्ण होते. गडाच्या माथ्यावरील अवशेष शोधण्यासाठी व खाडीकिनारी असलेला भाग फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. गडाच्या खाडीकिनारी असलेल्या भागाचा कोठेही उल्लेख येत नसल्याने येथे आलेले दुर्गप्रेमी केवळ टेकडीवरील भाग पाहुन आपली दुर्गफेरी पुर्ण करतात पण खाडी किनारी असलेला हा भाग पाहील्याशिवाय आपली दुर्गफेरी पूर्ण होत नाही. कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरवात केल्यास सर्जेकोट, भरतगड-भगवंतगड,रामगड हे चारही किल्ले एका दिवसात सहजपणे पाहुन होतात. सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांचा इतिहास वाचताना त्यांच्यात सतत चालत असलेली कुरबुर ठळकपणे ध्यानात येते. इ.स. १७०१ मध्ये फोंड सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला प्रत्युत्तर म्हणुन कोल्हापूरचे बावडेकर पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील टेकडीवर भगवंतगडची निर्मिती केली. पुढे इ.स.१७४७ मध्ये हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसल्यावर सावंतानी पेशव्यांची बाजु घेतली त्यामुळे इ.स. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर अनेक हल्ले केले पण त्याला भगवंतगड जिंकता आला नाही. पण या हल्ल्यांना वैतागून खेम सावंत पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात कळवतात कि भगवंतगड आज १६ महीने शिबंदी ठेऊन राखला आहे त्याची शिबंदी दयावी. कर्जाखाली आलो आहोत. गड सरकारात घ्यावा अथवा मोडून पाडावा. या पत्रावरून तुळाजीच्या हल्ल्याची तीव्रता व सावंतांची हलाखीची स्थिती दिसुन येते. या नंतरच्या काळात भगवंतगड करवीरकरांच्या ताब्यात आला पण नेमका केव्हा ते कळत नाही. भरतगडकडून केलेला तोफांचा मारा भगवंतगडावर काहीही परिणाम करत नाही हे पाहुन कर्नल इम्लाकने सैन्याच्या दोन तुकडया केल्या. कॅप्टन ग्रे व कॅप्टन पिअरसन यांच्या नेतृत्वाखाली या दोन तुकडया ३० मार्च १८१८ रोजी भगवंतगडावर रवाना केल्या. पण मराठे गड सोडुन गेल्याने कोणतीही लढाई न करता किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!