भंडारगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : २६८० फुट

श्रेणी : कठीण

मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेल्या शहापुर तालुक्यात एक दिवसाच्या भटकंतीसाठी माहुली किल्ला हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रसिद्ध या अर्थाने कि येथे सतत हौशी पर्यटकांची मौजमजा (?) करण्यासाठी वर्दळ सुरु असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा हा किल्ला म्हणजे एक दुर्गत्रिकुट असुन माहुली, भंडारगड, आणि पळसगड असे तीन किल्ले मिळून हे दुर्गत्रिकुट झाले आहे. हे तीन किल्ले त्यातील खिंडीमुळे एकमेकापासुन वेगळे झाले असुन मध्यभागी माहुली उत्तरेस पळसगड तर दक्षिणेस भंडारगड अशी याची रचना आहे. या सर्व किल्ल्यांना स्वतंत्र दरवाजे असुन वर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. यातील मधला माहुली किल्ला आकाराने सर्वात मोठा असुन त्यावरून भंडारगड तसेच पळसगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुरवात केल्यास एका दिवसात तीनही किल्ले व्यवस्थित पाहुन संध्याकाळी पायथ्याशी परतता येते. ... माहुली, भंडारगड, आणि पळसगड हे तीनही स्वतंत्र किल्ले असल्याने त्यांचे एकत्र वर्णन न देता या तीनही किल्ल्यांचे वेगवेगळे वर्णन केलेले आहे. गडावर येणारे बहुतांशी दुर्गप्रेमी माहुली किल्ल्याचा महादरवाजा व त्याच्या आसपासच्या परिसराला भेट देतात व तेथुन मागे फिरतात. यातील फारच कमी दुर्गप्रेमी भंडारगडावर जातात म्हणुनच या लेखात मी भंडारगडाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई -ठाण्यावरून पळसगडला भेट देण्यासाठी आपल्याला ठाणे-नाशीक महामार्गावरील आसनगाव येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले माहुली गाव गाठावे लागते. मुंबईहुन हे अंतर ७७ कि.मी तर ठाण्याहून हे अंतर ५५ कि.मी.आहे. पर्यटकांना येथे रहाण्यासाठी पर्यटक निवास बांधलेला असुन गावातील गणपती मंदीर व शंकराचे मंदीर यात देखील राहण्याची सोय होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत एकुण तीन जुनी मंदीरे असुन यातील एक मंदीर गणपतीचे दुसरे शंकराचे तर तिसरे ग्रामदेवतेचे आहे. या मंदिराच्या आवारात काही कोरीव शिल्प विखुरलेली आहेत. याशिवाय गावात एक मध्ययुगीन काळातील तलाव पहायला मिळतो. शिवमंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या मागील बाजुने उजवीकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावर काही मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून मंदीरासमोर असलेल्या हातपंपावर पिण्याच्या पाण्याची सोय होते. गणेश मंदीराच्या आवारात एक दगडी घुमट व अर्धवट तुटलेली विरगळ पहायला मिळते. या पायवाटेने नव्याने बांधलेली कमान पार करत आपण वनखात्याने नव्याने बांधलेल्या पर्यटन केंद्रात पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी येथे प्रती व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. किल्ल्यावर जाणारी वाट या पर्यटन केंद्रातुन जाते. किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने वाट मळलेली असली तरी तुरळक जंगलातुन जाणाऱ्या या वाटेवर बऱ्यापैकी चढण आहे. पर्यटन केंद्रासमोर असलेली टेकडी व ओढा पार केल्यावर आपण एका लहानशा सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. पेशवेकाळात माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी व वाडे असल्याचे उल्लेख येतात हे बहुदा त्यांचेच अवशेष असावेत. या वाटेने वाटेत २-३ ठिकाणी सोपे प्रस्तरारोहण करत साधारण दोन तासात आपण आपण माहुलीच्या कड्याखाली येतो. कडयाच्या या भागात असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन हा कडा व तटबंदी चढून जाण्यासाठी सुमारे १५-२० फुट उंचीची लोखंडी शिडी बसवली आहे. हि शिडी चढून तटबंदी पार केल्यावर आपला माहुली किल्ल्यात प्रवेश होतो. गडावर जाण्यासाठी महादरवाजा, हनुमान दरवाजा, कल्याण दरवाजा, वांद्रे खिंड, पळसगड व माहुली यामधील खिंड असे वेगवेगळे मार्ग आहेत. माहुली गावातुन आपण आलो ती शिडीची वाट हि जरी किल्ल्यावर येणारी अधीकृत वाट नसली तरी सध्या किल्ल्यावर येण्यासाठी हाच सोपा व रुळलेला मार्ग आहे. येथे भंडारगड आपले उद्दीष्ट असल्याने माहुलीगडाचे वर्णन न देता केवळ वाटेत दिसणाऱ्या वास्तुंचे थोडक्यात वर्णन केले आहे. तटबंदी पार केल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला माहुली गडाच्या महादरवाजाकडे नेते. या वाटेने जाताना सर्वप्रथम खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके पहायला मिळते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने ५ मिनिटे चालत पुढे आल्यावर या वाटेला डावीकडे जाणारा फाटा फुटतो. येथे झाडावर लटकवलेल्या पाटीवर भंडारगडाकडे जाणारा बाण रंगवला आहे. हि भंडारगडावर जाणारी वाट आहे. या वाटेने डावीकडे वळल्यावर काही अंतरावर उघडयावर भग्न समाधीचे तीन दगड रचलेले दिसतात. समाधी पाहुन पुढे गेल्यावर वाटेच्या डावीकडे कारवीच्या रानात पायऱ्या असलेला सहा फुट उंचीचा घडीव दगडात बांधलेला एक मोठा चौथरा पहायला मिळतो. कधीकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचा आज हा भग्नावशेष शिल्लक आहे. या चौथऱ्याच्या आसपास असलेले वास्तु अवशेष कारवीच्या रानात लपले आहेत. चौथरा पाहुन पुढे जाताना वाटेवर झाडीत अनेक अवशेष पहायला मिळतात. पुढे वाटेवर उभी केलेली एक आयताकृती कोरीवकाम केलेली शिळा पहायला मिळते पण हि शिळा नेमकी कशाची वा कशाबद्दल असावी याचा बोध होत नाही. या शिळेच्या पुढील भागात शिवमंदिर आहे. एका चौथऱ्यावर असलेल्या या मंदिराच्या तीन बाजुच्या भिंती आजही शिल्लक असुन या भिंतीत कोनाडे आहेत. मंदिराच्या ओट्यावर दगडावर कोरलेले शिवलिंग तसेच एक विरगळ असुन काही भग्न झालेली शिल्प ठेवलेली आहेत. मंदिराच्या समोरील भागात कोरडा पडलेला पाण्याचा मोठा तलाव आहे. तलाव पाहुन पुढे आल्यावर वाटेत कबरीवर ठेवला जाणारा कोरीव दगड दिसतो. या दगडाच्या पुढील भागात असलेला डावीकडे जाणारा फाटा माहुलीच्या हनुमान दरवाजाकडे जातो तर सरळ जाणारी वाट जांभळाच्या रानातुन भंडारगडाकडे जाते. ही वाट माहुलीच्या दक्षिण टोकावर असलेल्या माहुली आणि भंडारगड दरम्यानच्या खिंडीजवळ पोहोचते. या टोकावरून भंडारगडाची तटबंदी, त्यात वर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या व दोन डोंगरामधील खिडीचे सुंदर दर्शन होते. भंडारगडावर पोहोचण्यासाठी या खिडीत १०० फुट खाली उतरुन भंडारगडाचा डोंगर चढावा लागतो. या खिंडीत भंडारगडावर जाण्यासाठी दोन शिड्या लावलेल्या असुन या शिड्या डगमगत असल्याने थोडी कसरत करतच वर चढावे लागते. शिड्यांच्या वरील बाजुस गडावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन या ठिकाणी कधीकाळी लहानसा दरवाजा असावा.या पायऱ्यांनी आपण भंडारगडाच्या माथ्यावर पोहोचतो. भंडारगडाचा माथा दक्षिणोत्तर साधारण २१ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासून २६४० फुट उंचावर आहे. गडावर फारसा वावर नसल्याने मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन बहुतांशी अवशेष या झाडीत लपले आहेत किंवा मातीत गाडले गेले आहेत. येथुन गडाच्या दक्षिण टोकाकडे चालायला सुरवात केल्यावर वाटेच्या आजुबाजुला मातीत गाडलेले घरांचे चौथरे पहायला मिळतात. वाटेत एका ठिकाणी शिळेवर कोरलेल्या पादुका व गाडलेले तुळशी वृंदावन दिसते. गडाच्या पश्चिम भागात असलेल्या या वाटेने जाताना या वाटेला लागुन एक ओझरती पायवाट कडयाच्या पश्चिम दिशेने खाली उतरताना दिसते. हि वाट सहजपणे दिसत नसल्याने जातेवेळी वाटेच्या उजव्या बाजुस नीट लक्ष ठेवूनच चालावे. येथे कडयाच्या खालील बाजुस घळीच्या तोंडाशी बांधलेला भंडारगडावर येणारा मुख्य दरवाजा असुन हा दरवाजा कल्याण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. येथुन चिंचोळ्या वाटेने ५० ते ६० फुट खाली उतरल्यावर हा दरवाजा नजरेस पडतो. दरवाजाच्या आतील बाजुस झिजलेला व अर्थबोध न होणारा देवनागरी लिपीतील शिलालेख आहे. दरवाजाची अवस्था अत्यंत बिकट असुन त्याला लोखंडी खांबाचा आधार देण्यात आला आहे. दरवाजाच्या सुरवातीच्या पायऱ्या तुटल्याने कल्याण दरवाजातून खाली जाणारी वाट अत्यंत अवघड बनली आहे. येथे खाली उतरण्यासाठी एक बांबू बांधलेला असुन आधारासाठी वायर बांधली आहे. याच्या खालील बाजुस असलेली संपुर्ण वाट कातळात कोरून काढलेली आहे. घळीतील या वाटेवर पुर्णपणे झीज झालेला दुसरा शिलालेख आहे. दरवाजा पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर परत यावे. वर चढत जाणाऱ्या या वाटेने पुढे आल्यावर झाडीमध्ये मातीने बुजलेला तलाव असुन या तलावाच्या कोपऱ्यात लेण्यासारखे कातळात कोरलेले पाण्याचे मोठे खांबटाके आहे. यात बारमाही पिण्यायोग्य पाणी असते. टाक्याकडून पुढे आल्यावर डावीकडील बाजुस एका वास्तुचे अवशेष येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके तर उजवीकडे वजीरचा सुळका दिसतो. गडावरून उत्तरेला अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग तसेच तुंगारेश्वर आणि गुमतारा किल्ला दिसतो तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा व दक्षिणेला माथेरान रांग आणि इतर प्रदेश नजरेस पडतो. पायथ्यापासुन भंडारगडवर येण्यासाठी तीन तास तर संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. भंडारगडाची रचना व आकार पहाता याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी व माहुलीचा सरंक्षक दुर्ग म्हणुन केला जात असावा. हा किल्ला कोणी बांधला हे माहित नसले तरी बहामनी राज्याच्या अस्तानंतर १४८५ च्या सुमारास हे ठिकाण निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदच्या ताब्यात आले. मध्ययुगीन कालखंडात कल्याण सुभ्याजवळ असलेला हा किल्ला नाशिक, सुरत,जुन्नर व अहमदनगर अशा महत्वाच्या ठिकाणाशी जोडलेला होता. माहुलीवरून जव्हार मार्गे सुरत व मुरबाडमार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगरला जाणारा मार्ग अशा भौगोलिक रचनेमुळे माहुलीला महत्व प्राप्त झाले होते. पळसगडचा इतिहास हा माहुलीगडाशी संबंधीत आहे. मुघल व आदिलशाही यांच्या एकत्रीत सेना निजामशाही बुडवण्यासाठी आल्या असता १६३५-३६ च्या सुमारास शहाजीराजे यांनी निजामशाही वाचवण्यासाठी बळकट अशा माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला व शहाजीं राजानी शरणागती पत्करली. पुढे ८ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी हा किल्ला मोगलांकडून मिळवला. १६६५ च्या पुरंदर तहात मोगलांना २३ किल्ले देताना शिवाजी महाराजांनी चातुर्याने हे एकत्रित असलेले दुर्गत्रिकुट तीन किल्ले म्हणून मोगलांना दिले. त्यानंतर मनोहरदास गौड हा मोगलांचा कर्तबदार सरदार माहुलीवर किल्लेदार म्हणुन कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरीच बांधकाम केली. इ.स.१६७०च्या फेब्रुवारी महिन्यात हा किल्ला जिंकण्यासाठी खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर केलेल्या हल्ल्यात किल्लेदार मनोहरदास गौड याच्या सावधानतेने दीड हजार मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. पण मनोहरदास गौड याने मराठयांच्या दहशतीने माहुलीची किल्लेदारी सोडली व त्याच्या जागी अलावर्दी बेग हा नवा किल्लेदार आला. त्यांनतर १६ जून १६७० रोजी मोरोपंत पिंगळे यांनी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्याने भेदनीतीचा वापर करत मराठ्यांनी इ.स.१७३५ मध्ये गड ताब्यात घेतला. पुढे दुसऱ्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला त्यांच्या हवाली केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!