बोरीसावरगाव
प्रकार : गढी
जिल्हा : बीड
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे अशीच एक जुनी उध्वस्त गढी पहायला मिळते. या गावात बोरीची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने गावाला बोरी सावरगाव नाव पडल्याचे सांगीतले जाते. अंबेजोगाई- बोरीसावरगाव हे अंतर १८ कि.मी.असुन केज या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी २३ कि.मी.अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. गावात प्रवेश करताना हनुमान मंदिराजवळील बुरुजाचे अवशेष पहाता कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी असल्याचे लक्षात येते.
...
बोरीसावरगाव गढीची रचना भुईकोट किल्ल्याप्रमाणे असुन कधीकाळी या संपुर्ण गढीला परकोट होता. आज हा परकोट पुर्णपणे नष्ट झाला असुन या परकोटातील केवळ मुख्य दरवाजा व काही प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. मुख्य दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन प्रशस्त आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजावरून गढीचे वैभव लक्षात येते. परकोटाच्या जागी नव्याने बांधलेली घरे असुन हि घरे बांधण्यासाठी परकोटाच्या व गढीच्या दगडांचा वापर केलेला आहे. संपुर्ण गढीचे बांधकाम जरी दगडात केलेले असले तरी आता मात्र ते ढासळलेले आहे. तटाची उंची साधारण ३५ फुट असुन तटावरील फांजी पांढऱ्या चिकणमातीने बांधलेली आहे. फांजीचा भाग मोठ्या प्रमाणात ढासळलेला असल्याने त्यातील बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या दिसत नाहीत. मुख्य गढी हि पाच बुरुजांची असुन तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या एका बुरुजात दरवाजा आहे. संपुर्ण कोटाचा परीसर दोन एकर तर आतील मुख्य गढीचा परीसर साधारण १२ गुंठे आहे. गढीचा दरवाजा काहीसा उंचावर असुन परकोटाप्रमाणे हा देखील उत्तराभिमुख आहे. गढीचा दरवाजा काहीसा उंचावर असल्याने त्यासमोर पायऱ्या बांधलेल्या असाव्यात पण आता मात्र आपल्याला मातीच्या ढिगाऱ्याहुन चढावे लागते. दरवाजाने आत शिरल्यावर आपण गढीची आतील तटबंदी व बाहेरची दुसरी तटबंदी याच्या चिलखतात येतो. या चिलखतातुन वर चढल्यावर उजव्या बाजुच्या तटबंदीत गढीचा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झालेली असुन याच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. गढीतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले असुन मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. गढीच्या मध्यभागी ३० x ३० फुट आकाराचा चौथरा असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या चौथऱ्याच्या उजवीकडे अर्धवट बुजलेली विहीर असुन त्याशेजारी ३x३ फुट आकाराचा हौद आहे. गढीच्या आत एक भुयार असुन ते गावाबाहेरील दत्तमंदीरात बाहेर पडत असल्याचे स्थानिक सांगतात. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढी व परकोट पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.गावात हि गढी देशमुखांची गढी म्हणुन ओळखली जाते. गावात देशमुखांची घरे असुन मनोहरराव देशमुख हे या घराण्याचे मूळ पुरुष होते. त्यांना ममदापूर,माळेगाव,पाटोदा,अंजनपुर,कोपरा,लोखंडी सावरगाव व बोरी सावरगाव अशा सात गावांच्या जहागिरी होत्या.
© Suresh Nimbalkar