बैलहोंगल

प्रकार : भुईकोट

जिल्हा : बेळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

बैलहोंगल म्हटले कि आपल्याला आठवते ती कित्तुरची राणी चेनम्मा व तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रमाणे इंग्रजांशी दिलेली झुंज. कित्तुरचा पाडाव झाल्यावर या राणीला बैलहोंगल येथील किल्ल्यात कैदेत ठेवण्यात व तेथेच तिचा मृत्यु झाला. राणी चेन्नम्माचा इतिहास व त्यातील बैलहोंगल किल्ल्याची नोंद पाहुन आम्ही आमच्या बेळगाव दुर्ग भटकंतीत बैलहोंगल किल्ल्यास भेट दिली. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात या तालुक्याच्या ठिकाणीच कधीकाळी बैलहोंगल भुईकोट होता. बेळगावपासुन ५० कि.मी. अंतरावर बैलहोंगल शहर असुन आज तेथे एक फुटका बुरुज व थोडीशी भिंत वगळता काहीही शिल्लक नाही. गुगलवर बैलहोंगल किल्ल्याची तटबंदी असे दर्शविणारे ठिकाण आपल्याला थेट या फुटक्या बुरुजाजवळ आणुन सोडते पण येथे आल्यावर मात्र आपली निराशाच होते. आज किल्ल्यासारखे असे येथे काहीच शिल्लक नाही. या फुटक्या बुरुजापासून साधारण १५० फुट अंतरावर कमान असलेली पायऱ्यांची विहीर आहे. ... कधीकाळी हि विहीर किल्ल्याच्या आत होती पण शहरीकरणामुळे किल्ल्याचे सर्व अवशेष भुइसपाट झाले आहेत. किल्ल्यापासून काही अंतरावर राणी चेनम्मा यांचे समाधीस्थळ असुन सरकारने तेथे त्यांचा पुतळा व शेजारी उद्यान उभारले आहे. आपण राणी चेनम्माच्या या समाधीस्थळास भेट देऊन आपली गडफेरी उरकती घ्यावी. बैलहोंगल किल्ला नेमका कोणत्या काळात बांधला हे माहीत नसले तरी कित्तुर संस्थानातील हा एक महत्वाचा किल्ला होता. राणी चेनम्मा यांनी या किल्ल्यातुन दिलेल्या लढ्यामुळे तो जास्त प्रसिद्धीस आला. आदिलशाही काळात हा भाग हिरमल्लप्पा व चिक्कमल्लप्पा या लिंगायत बंधुच्या देशमुखी वतनात सामील होता. या घराण्याला सर्जा अशी पदवी होती. आदिलशाही ते मराठा राज्याच्या अस्तापर्यंत साधारण २३९ वर्षे या घराण्यात बारा देसाई झाले. इ.स.१७५६ मध्ये सावनूरच्या नबाबाचा हा प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला पण त्यांनी कित्तूर व गोकाक ही वतने येथील मुळ देसायांच्याच ताब्यात ठेवली. १७८५ मध्ये टिपूने कित्तूर जिंकले पण इ.स. १७९२ मध्ये मराठयांकडून पराभव झाल्याने श्रीरंगपट्टणच्या तहानुसार हा भाग पुन्हा मराठ्यांकडे आला. कित्तुरची राणी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या राणी चेन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील काकती गावात झाला. वयाच्या १५ व्या वर्षी तिचे देसाई कुटुंबातील राजा मल्लसर्जाशी लग्न झाले. इ.स. १८२४ मध्ये राजा मल्लसर्जा मरण पावला व काही अंतराने तिच्या मुलाचाही मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर राणी चेन्नम्मा यांनी कित्तुरच्या गादीवर इ.स. १८२४ मध्ये शिवलिंगप्पा यांना दत्तक घेतले पण इंग्रजांचा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा धारवाडचा कलेक्टर थॅकरेने हे दत्तकविधान नामंजुर करत कित्तूर संस्थान खालसा घोषीत केले व किट्टूरचा खजिना आणि दागिने जप्त करण्याचा प्रयत्न केला. यावर राणी चेन्नम्माने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारत सेनापती सांगोळी रायन्नाच्या मदतीने सशस्त्र लढा दिला. हे बंड कित्तुरचे युद्ध म्हणुन प्रसिध्द आहे. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यासाठी तिने बैलहोंगल किल्ल्याचा आश्रय घेतला. १ ऑक्टोबर १८२४ रोजी झालेल्या युद्धाच्या पहिल्या फेरीत ब्रिटीश सैन्याचा पराभव झाला. या लढाईत थॅकरे मारला गेला व वॉल्टर इलियट आणि मिस्टर स्टीव्हनसन या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ब्रिटीशांनी पूर्ण ताकदीनीशी हल्ला केला व बैलहोंगल किल्ला ताब्यात घेतला. राणी चेन्नम्मा यांना ब्रिटिशांनी अटक केली व बैलहोंगल किल्ल्यात तुरुंगात टाकले. २१ फेब्रुवारी १८२९ रोजी ही शुर राणी येथे मरण पावली व तिला बैलहोंगल येथेच सन्मानाने पुरण्यात आले. तिच्या समाधीस्थळाचे जतन करण्यात आले असुन तिथे तिचा लहान पुतळा व उद्यान उभारण्यात आले आहे. बेळगावच्या भटकंतीत या ठिकाणाला धावती भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!