बेलापुर बुरुज

प्रकार : एकांडा बुरुज

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वहातुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी १६व्या शतकात बेलापूरचा किल्ला बांधला. या किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी त्याचवेळी खाडी किनारी एका बुरुजाची निर्मिती केली. कधीकाळी खाडीकिनारी असणारा हा बुरूज भौगोलिक बदलामुळे पुर्णपणे जमिनीवर आलेला आहे. या बुरूजाविषयी माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना किल्ला चौक यापेक्षा जास्त माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे ठरवावे. बेलापुरहुन उरणला जाताना पाम बीच रोड चौकातच नवी मुंबई महानगर पालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधलेला हा बुरुज उभा आहे. ... बेलापुरहुन उरणला जाताना पाम बीच रोडवर रस्त्याला लागुन उजव्या बाजूला तर उरणवरून येताना डाव्या बाजूला बेलापुर बुरुजाची इमारत नजरेस पडते. हा बुरूज म्हणजे चौकोनी आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढवय्या बुरुज आहे. या बुरुजाचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि बेलापुर किल्ल्यावर आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. चौकोनी आकाराच्या या बुरुजाच्या बांधणीसाठी घडीव काळ्या दगडांचा वापर केला आहे. हा बुरुज एका चौथऱ्यावर उभा असुन याची बांधणी चर्चच्या मनोऱ्याप्रमाणे आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे. ठाणे परिसरात पोर्तुगीजांनी बांधलेल्या इतर बुरुजापेक्षा या बुरुजाची बांधणी पुर्णपणे वेगळी आहे. साधारण ३० X ३० फुट आकाराचा व ४० फुट उंचीचा हा बुरुज आतील बाजुस पोकळ असुन त्यात सैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. संपुर्ण बुरुज ३ मजली असुन बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार लोखंडी जिना होता पण आज मात्र या गोलाकार जिन्याचा केवळ मधला खांब उभा आहे. इ.स.१७३७च्या वसई मोहिमेत नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी या परिसराला वेढा घातला व १८ एप्रिल १७३७ रोजी हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी हा भुभाग जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना या भागाचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूर जिंकले पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा भाग मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला. बुरूजाची सध्याची अवस्था दयनीय झाली असुन भिंतीवर झाडे उगवली आहेत. बुरुज पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!