बेडकीहळ

प्रकार : गढी

जिल्हा : बेळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोल्हापुरपासून ३७ कि.मी. तर कागलहुन २२ कि.मी.अंतरावर बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात बेडकीहाळ गाव वसलेले आहे. हे गाव येथे होणारा सिद्धेश्वर मंदिरातील नवरात्र व दसरा महोत्सव यासाठी बेळगाव-सांगली व कोल्हापुर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दसरा महोत्सवा निमित्ताने येथे होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन दूरदूरचे पैलवान येथे हजेरी लावतात. आपल्याला मात्र बेडकीहाळची ओळख होते ते येथे असलेल्या सरदार मानोजी जगदाळे यांच्या गढीमुळे. बेडकीहाळ गावातील रामनगर मार्गावर असलेली हि गढी गावात इनामदारांचा वाडा म्हणुन ओळखली जाते. गढीच्या उत्तर भागात बांधीव तलाव असुन या तलावाकडून गढीत जाण्याचा मार्ग आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण १.५ एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकाला चार मोठे बुरुज आहेत. या बुरुजात व तटबंदीत संरक्षणाची कोणतीही सोय दिसुन येत नाही. तटाची उंची साधारण १५ फुट असुन बुरुजाची उंची २५ फुट आहे. ... गढीत जाण्याचा मार्ग म्हणजे सध्या अरुण बोल असुन या बोळात कोठेही दरवाजा दिसुन येत नाही. गढीच्या मध्यभागी इनामदारांचा सुस्थितीतील चौसोपी वाडा असुन हा वाडा आजही वापरात आहे. गढीच्या इतर भागात त्यांच्या वंशजांची घरे असुन मोकळी जागा नाही. घरे वाढल्याने पुर्व बाजुस असलेला तट फोडुन त्याबाहेर देखील घरे बांधलेली आहेत. याशिवाय गढीच्या पश्चिम तटबंदीत देखील एक दरवाजा आहे. तटबंदीच्या आतील भिंतीत कोनाडे असलेल्या कमानी असुन एका ठिकाणी तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीत फिरण्यासाठी फारशी जागा नसल्याने ५-१० मिनिटात आपली फेरी पुर्ण होते. गढीला बाहेरील बाजुने फेरी मारताना उत्तर पुर्व बुरुजाच्या भिंतीत साधारण ४ फुट उंचीचे मारुती शिल्प आहे. बाहेरून फेरी मारताना गढीची तटबंदी आजही सुस्थितीत दिसुन येते. गढीचे एकुण बांधकाम फार जुने असल्याचे जाणवत नाही. करवीर संस्थानाच्या उत्तरार्धात बांधलेल्या या गढीची इतिहासात कोठेही नोंद दिसुन येत नाही. गढीबरोबर गावातील सिद्धेश्वर मंदिराला देखील भेट देता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!