बिबी
प्रकार : गढी
जिल्हा : सातारा
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात बिबी या नावाची दोन गावे आहेत. एक आहे बुलढाणा जिल्ह्यात तर दुसरे आहे सातारा जिल्ह्यात. महत्वाचे म्हणजे या दोन्ही गावात चौबुर्जी कोट आहेत फरक इतकाच कि बुलढाणा येथील गढीच्या वंशजांना त्यांचा इतिहास माहित आहे तर सातारा येथील गढीत रहाणाऱ्या वंशजांना त्यांच्या पुर्वजांच्या पराक्रमाचा गंधही नाही. मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व इंग्रज सत्ता भारतावर आल्याने या कोटांवर फारसा इतिहास घडला नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व गढ्या आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक आजही आपले अस्तित्व टिकवुन असणारी गढी म्हणजे बिबी येथील गढी.
...
वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत आहेत. स्थानिकांची उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमच्या सातारा दुर्गभ्रमंतीत माझे दुर्गभटके मित्र बलराज मुदलीयार यांनी आम्हाला बिबी येथील गढीबाबत सांगितले व आमचा मोर्चा बिबी येथील गढीकडे वळला. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेले हे गाव फलटण,लोणंद व वाठार या तीनही ठिकाणापासुन २० कि.मी.वर आहे. गावात प्रवेश करताना वाटेतील मंदीराच्या आवारात मोठया प्रमाणात विरगळ व धेनुगळ दिसुन येतात पण गावात दाढी-मिशी वाढवुन फिरणाऱ्या शिवभक्तांना याविषयी एक शब्दही सांगता येत नाही. गढीची कर्मकथा यापेक्षा वेगळी नाही. गावाच्या मध्यभागी असलेल्या या गढीला एका बाजुने स्थानिकांच्या घराचा गराडा असल्याने त्यातुन वाट काढताच गढीकडे जावे लागते. गढीचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार त्याची लाकडी कमान व दरवाजासह आजही सुस्थितीत असुन दरवाजावरील भाग मात्र पुर्णपणे ढासळला आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस भलामोठा चौथरा दिसुन येतो. चौकोनी आकाराच्या या गढीचा आतील परीसर अर्धा एकर असुन गढीच्या चार टोकाला चार गोलाकार बुरुज आहेत. गढीच्या तटबंदीचा आतील फांजीपर्यंतचा भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील भाग विटांनी बांधुन त्यात बंदुकीच्या मारगीरी साठी जंग्या ठेवल्या आहेत. तटबंदीच्या आतील भागात मोठया प्रमाणात देवड्या व ओवऱ्या दिसुन येतात. तटबंदीवर जाण्यासाठी तीन ठिकाणी जिने असुन दोन ठिकाणची तटबंदी ढासळल्याने तसेच तटावर झाडी वाढल्याने संपुर्ण तटाला फेरी मारता येत नाही. गढीची दक्षिण बाजुची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळली आहे. गढीच्या आतील आवाराचे मोठया प्रमाणात सपाटीकरण केल्याने कोणतेही वास्तु अवशेष शिल्लक नाहीत. गढीच्या एका कोपऱ्यात गढीचे वंशज बोबडे पाटील यांचे नव्याने बांधलेले घर असुन त्यांना त्यांच्या पुर्वजांचा व गढीचा इतिहास फारसा अवगत नाही. गढीचा परीसर व तटबंदी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीचा इतर कोणताही इतिहास ज्ञात होत नसला तरी गढीचे बांधकाम शिवकाळानंतर झाल्याचे जाणवते.
© Suresh Nimbalkar