बीबी

प्रकार : गढी

जिल्हा : बुलढाणा

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रात बिबी या नावाची दोन गावे आहेत. एक आहे सातारा जिल्ह्यात तर दुसरे आहे बुलढाणा जिल्ह्यात. महत्वाचे म्हणजे या दोन्ही गावात खाजगी मालकीच्या गढ्या आहेत फरक इतकाच कि सातारा येथील गढी पुर्णपणे बांधलेली आहे तर बुलढाणा येथील गढीचे काम अर्धवट झाले आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी व काही व्यापार करणाऱ्यानी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. बुलढाणा येथे बिबी गावात असणारी अर्धवट बांधलेली गढी याच प्रकारातील असावी. सरदार मल्हारराव आटोळे यांच्या या गढीमध्ये सध्या आटोळे यांचे वंशज रहातात. या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. बुलढाणा जिल्ह्यातील हे गाव जालना शहरापासुन ६० कि.मी. तर सिंदखेडराजा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २८ कि.मी. अंतरावर आहे. ... गावाच्या मध्यभागी असलेल्या या गढीला बाजुने स्थानिकांच्या घराचा गराडा असुन गढीचे पश्चिमेकडील ३ बुरुज वगळता इतर बाजुस कोणतेही बांधकाम केल्याचे दिसुन येत नाही. या बुरुजाचे खालील बांधकाम घडीव दगडांनी तर वरील बांधकाम विटांमध्ये केलेले आहे. गढीचा परीसर साधारण अर्धा एकर असुन गढीच्या आतील उंचवट्यावर एका मोठया वाड्याचा घडीव दगडात बांधलेला चौथरा व उध्वस्त भिंती पहायला मिळतात. या चौथऱ्यावर उध्वस्त वास्तुला लागुन आटोळे यांच्या वंशजांनी नव्याने दोन घरे बांधली आहेत. गढीच्या उत्तरपश्चिम बुरुजावर नव्याने पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. वाडयाची उध्वस्त वास्तु दुमजली असुन या वास्तुत एक तळघर तसेच देवघर व त्यातील मुर्ती पहायला मिळतात. गढीची फेरी मारण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीतील वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार इ.स.१३९६साली मल्हारराव आटोळे यांच्याकडे बिबी गावासह तांबोळा, धायफळ, अंजनी , सुरा, सरंबा, दिग्रस अशी ग्वाल्हेर घराण्याची सात गावांची जहागीरी होती. मल्हारराव आटोळ्यांचा बिबी , फलटण , ग्वाल्हेर असा सोने- चांदी- मोती याचा व्यापार होता. मल्हारराव आटोळे हे भ्रमंतीवर असल्याने जहागीरीचे काम त्यांच्या पत्नी शिवाईदेवी पाहत असत. शिवाईदेवी या अतिशय धुरंधर व पराक्रमी होत्या. त्यांच्यामुळे या गावाला बिबी हे नाव प्राप्त झाले. बिबी हा पर्शियन शब्द असुन त्याचा अर्थ पराक्रमी शुर स्त्री असा होतो. पण हि माहीती काहीशी अपुर्ण वाटते. इ.स.१३४७ ते १५१८ या काळात या भागावर बहमनी सत्ता होती. हे ग्वाल्हेर घराणे कोणते ? शिवाय बुरुजाच्या बांधकामातील दगडांचा आकार व घडण तसेच वाडयाच्या भिंती पहाता या गढीचे बांधकाम शिवकाळानंतर झाल्याचे स्पष्ट जाणवते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!