बीड
प्रकार : नगरदुर्ग
जिल्हा : बीड
उंची : 0
श्रेणी : सोपी
बीड जिल्ह्यात धारूर व धर्मापुरी असे दोनच किल्ले असल्याचे सांगितले जाते पण हे सांगणारे हे मात्र विसरतात कि कधीकाळी खुद्द बीड शहरच एका किल्ल्यात वसले होते. बिंदुसार नदीकाठी असलेल्या या संपुर्ण शहराला तटबंदी होती इतकेच नव्हे तर या शहराच्या रक्षणासाठी काही भागात खंदक देखील खोदलेला होता. आज हा खंदक बुजवून त्यावर रस्ता बांधला असला तरी हा रस्ताच खंदक रोड म्हणुन ओळखला जातो. वाढत्या वस्तीने संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर आक्रमण केले असुन काळाच्या ओघात बहुतांशी तटबंदी व इतर संरक्षक वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे किल्ला आपल्याला सलगपणे पहाता येत नाही. किल्ला पहाण्यासाठी आपल्याला ठराविक भागात जाऊन तेथील अवशेषरुपात उभ्या असलेल्या वास्तु पहाव्या लागतात. बिंदुसार नदीकाठी असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत एकुण सहा दरवाजे होते. यातील चार दरवाजे किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत तर उरलेल्या दोन दरवाजापैकी एक दरवाजा किल्ल्याच्या अंतर्गत भागात (काझी दरवाजा) तर दुसरा दरवाजा नदीपलीकडे हिरालाल चौक (गंज दरवाजा) भागात आहे. आज हिरालाल चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात किल्ल्याची पेठ असल्याने या बाजारपेठे भोवती तटबंदी उभारून त्यात हा दरवाजा उभारण्यात आला.
...
शेख दाऊद महेबूबद्दौल्ला या सरदाराने (इ.स. १८८२) ही वस्ती वसवली व त्यास स्वतःचे नाव दिले. आज गंज दरवाजा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या दरवाजाचे व वस्तीचे नाव महेबूबगंज असल्याचा शिलालेख या दरवाजावर आहे. आता किल्ल्याच्या मुख्य तटबंदीतील दरवाजाकडे वळुया. किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत अनुक्रमे माळीवेस दरवाजा,राजुरी दरवाजा,धोंडीपुरा दरवाजा व कोतवाली दरवाजा हे चार प्रमुख दरवाजे होते. यातील माळीवेस दरवाजा आज पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. या भागात बारादरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वास्तुत सु्लतानजी निंबाळकर यांचे निवासस्थान होते. नंतरच्या काळात या वास्तुचे न्यायालयात रुपांतर झाले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावली. याच माळीवेस परिसरात शिंदेंच्या मळ्यात बीडची ग्रामदेवता सटवाई देवीचे मंदिर आहे. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात या वेशीवरील शिलालेखाचा उल्लेख व वाचन आले आहे. यानंतरचा दुसरा दरवाजा म्हणजे राजुरी दरवाजा. शिवाजी महाराज चौकातुन कारंजा रोडने शहराकडे वळल्यास याच दरवाजाने आपला शहरात प्रवेश होतो. हा दरवाजा व त्याशेजारील दोन्ही बुरुज आजही सुस्थितीत असुन डावीकडील १०० फुट तटबंदी वगळता उर्वरित तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन्ही बुरुजावर तोफ ठेवण्यासाठी चौथरा असुन एका बुरुजावरील चौथरा पीराचे थडगे बनलेला आहे. राजुर दरवाजातुन सरळ जाणारा कारंजा रोड शहराच्या दुसऱ्या टोकाला, बिंदुसार नदीकाठी असलेल्या कोतवाल दरवाजातुन बाहेर पडतो. हा दरवाजा, त्याच्या आसपास असणारी नदीकाठची तटबंदी व त्यातील बुरुज आजही शिल्लक आहे. या दरवाजाच्या उजवीकडील बुरुजात तीन कमानी असलेला सुंदर सज्जा असुन तटबंदीला लागुन पिराची स्थापना झालेली आहे. दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी येथुन वाट आहे. मुख्य दरवाजासमोर परकोटाची आडवी भिंत बांधुन तिच्या टोकाला बुरुज बांधलेला आहे. मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागात डावीकडील बुरुजावर (विजेच्या खांबाजवळ) अरेबिक शिलालेख असुन परकोटाच्या दरवाजाच्या उजवीकडील बुरुजावर दुसरा शिलालेख आहे. बिंदुसार नदीच्या पलीकडील भागात गेल्यास दूरवरून या दरवाजाची रचना, तटबंदी व त्यात असलेले सहा-सात बुरुज व्यवस्थित पहाता येतात. आतील भागातुन हि तटबंदी पूर्णपणे अतिक्रमित झाली असुन हि तटबंदी पहाणे म्हणजे दिव्य वाटावे इतका गलिच्छपणा या भागात आहे. कोतवाल दरवाजाच्या आतील भागात जुन्या बाजाराजवळ किल्ला (काझी) दरवाजा आहे. या दरवाजाचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या दरवाजाच्या कमानीवर पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. या दरवाजा जवळील रोड खंदक रोड म्हणुन ओळखला जातो. या ठिकाणी बहुदा बीड शहराचा मूळ किल्ला असावा. शहराभोवती दिसणारी काही तटबंदी शहर वाढल्याने निजामाच्या काळात नंतर बांधली असावी. या नंतरचा दरवाजा म्हणजे धोंडीपुरा दरवाजा. हा दरवाजा सराफ रोडने बिंदुसार नदीच्या काठावर आहे. बाजाराचा दिवस असल्याने आम्हाला या दरवाजाच्या फारसे जवळ जाता न आल्याने दुरूनच छायाचित्रे घ्यावी लागली. या भागात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली हि महत्वाची ठिकाणे आहेत. याशिवाय कोतवाल दरवाजाच्या विरुद्ध बाजुस नदीकाठी काही मध्ययुगीन काळातील अवशेष पहायला मिळतात. येथे रस्त्यालगत काही समाधी चौथरे असुन प्राकाराच्या आत काही समाधी वास्तु आहेत. यात एक तीन मजली मनोरा असुन त्याचा एक मजला जमिनीखाली आहे. जमिनीखालील मजला चांगलाच मोठा असुन त्यात अनेक दालने आहेत. मनोऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या असुन त्यावर ध्वजस्तंभ व लहान हौद आहे. मनोऱ्याजवळ एका मोठ्या वाड्याचे अवशेष असुन तेथे मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढलेली आहेत. किल्ला व आसपासचे अवशेष पहाण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणून ओळखले जाणारे हे शहर चालुक्यकाळात चंपावतीनगर म्हणुन ओळखले जाऊ लागले. बीड शहराचा इतिहास मात्र इ.स. चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. हाच परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली आला. अल्लाउद्दीन खिलजीने (१२९६-१३१६) देवगिरीच्या यादवांकडून जिंकलेला हा प्रांत कालांतराने मुहम्मद बिन तुघलक (१३२५-५१)याने जिंकून घेतला. बहामनी साम्राज्य उदयास आल्यावर या प्रांतावर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली. बहामनी साम्राज्य विभागल्यावर हा प्रदेश निजामशाहीचा भाग बनला. बीडचा किल्ला हैद्राबादच्या निजामाने बांधल्याचे सांगीतले जात असले तरी बीड हा निजामशाही अंमलातील एक सुभा असल्याचे दिसुन येते. मुर्तजा निजामशहा याच्या कारकिर्दीत त्याचा सरदार सलाबत खान याने बीड शहराला तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी खजिना विहीर बांधल्याचे दिसुन येते. या शिवाय हा किल्ला बहामनी काळात बांधल्याचे ग्याझेटीयरमध्ये नमूद केले आहे. पेशवाईच्या काळात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे मोठ्या लढाया झाल्या. यावेळी झालेल्या तहानुसार हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला पण मराठेशाहीच्या अस्तानंतर तो पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत हा भाग निजामाच्या राजवटीत होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग असणारा हा प्रांत भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात सामील झाला.
© Suresh Nimbalkar