बिरवाडी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ५८० फुट

श्रेणी : सोपी

रायगड किल्ल्याच्या सरंक्षण फळीत तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी यासारखे लहानमोठे किल्ले आहेत. यातील एक किल्ला म्हणजे रोहा तालुक्यातील चणेरा गावाजवळ बिरवाडी गावात असलेला बिरवाडी किल्ला. कदाचित गावावरून ह्या किल्ल्याला बिरवाडी हे नाव पडले असावे. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला हा किल्ला रोहा या तालुक्याच्या ठिकाणापासुन १८ किमी तर चणेरा गावापासून २ कि.मी. अंतरावर आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भवानीमाता मंदीर गाठावे लागते. गावाबाहेर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता असुन शेवटच्या टप्प्यात ५०-६० पायऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात एक फुटकी तोफ ठेवलेली आहे. किल्ल्यावर रहायचे असल्यास या मंदीरात मुक्काम करता येईल. मंदिराच्या मागील बाजुस एका चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा असुन या पुतळ्याकडून किल्ल्याकडे जाणारी वाट सुरु होते. या वाटेने साधारण १० मिनीटे वर चढल्यावर आपण एका बुरूजापाशी येऊन पोहचतो. ... हा केवळ सुटा बुरुज असुन याच्या आसपास कोणत्याही प्रकारची तटबंदी दिसून येत नाही. या बुरूजाखालुन डावीकडे जाणारी वाट आपल्याला १० मिनिटात किल्ल्याच्या दरवाजात नेऊन सोडते. या वाटेवर असलेल्या जंगलामुळे हि वाट पालापाचोळ्याने झाकलेली असल्याने वाटेचा मागोवा घेत सावधपणे पुढे निघावे. वाटेत एका ठिकाणी डाव्या बाजुस कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याला गावकरी घोड्याचे टाके म्हणतात. दोन बुरुजाच्या आडोशाने बांधलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर डाव्या बाजुस काही अंतरावर कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी असुन त्यापुढे काही अंतरावर पाणी साठविण्यासाठी दगडी ढोणी आहे. या ढोणीच्या पुढील भागात अजून एक टाके असुन त्यापुढील भागात तटबंदीशिवाय बांधलेले दोन बुरुज आहेत. बुरुज पाहुन मागे फिरून पुन्हा दरवाजाजवळ आल्यावर सरळ वर चढत जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. या ठिकाणी तटबंदीमध्ये गाडलेला एक लहान दरवाजा पहायला मिळतो. बालेकिल्ल्यात फारच कमी सपाटी असुन एका मोठ्या वास्तूचा चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाही. समुद्रसपाटीपासून ५८० फुट उंचावर असलेला हा किल्ला अर्ध्या एकरपेक्षा कमी जागेत सामावलेला आहे. गड फारच छोटा असल्याने अर्धा तास फिरण्यासाठी पुरेसा होतो. संपुर्ण किल्ल्याची भटकंती केली असता दरवाजाकडील दोन बुरुज वगळता तटबंदी नसलेले पाच बुरुज पहायला मिळतात. हि एखादी वेगळी रचना असावी कि किल्ला बांधताना अर्धवट राहिला असावा याचा बोध होत नाही. इ.स.१६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर शिवाजीराजांनी १६५८च्या सुमारास बिरवाडीचा किल्ला बांधल्याचे उल्लेख कागद पत्रात येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!