बितनगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नगर
उंची : ३७१५ फुट
श्रेणी : कठीण
अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगर रांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. बितनगड हा किल्ला कळसूबाई व पट्टागड यांच्या मधील पट्टयात आहे. घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे एकदरा फाटा ९ किमी अंतरावर तर एकदरा फाट्यापासून बितंगगडाच्या पायथ्याचे बितंगवाडी गाव ५ किमीवर आहे. बितंगवाडी या गावाजवळ असणारा हा किल्ला तसा स्थानिकांच्या दृष्टीने वंचित आहे. गावात या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही पण गड दाखविण्यासाठी वाटाडे मात्र मिळतात. गावातून किल्ल्याकडे जाणारी प्रशस्त वाट आहे पण वाटेच्या अखेरच्या टप्प्यात शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फुट तर पायथ्यापासुन साधारण १२०० फुट आहे. गडाचा आकार त्रिकोणी असुन गडाचे एकुण क्षेत्रफळ ३ एकरपेक्षा कमी आहे.
...
गड माथ्यावर जाण्यासाठी १००पेक्षा जास्त कातळात कोरलेल्या पाय-या चढाव्या लागतात. गडाच्या पाय-या सुरु होतात तिथे जवळच उजव्या हाताला कातळात एक भुयार आहे. या भुयारात रांगत जावे लागते. आत जाताना सोबत विजेरी असणे आवश्यक आहे. अर्धवट खोदलेल्या या भुयाराच्या शेवटी पाण्याचे टाके आहे. असेच एक भुयार किल्ल्याच्या विरुद्ध टोकाला किल्ल्याबाहेर आहे. या भुयाराचे तोंड मोठे असुन आतील भागात मात्र रांगत जावे लागते. या भुयाराच्या आत टोकाशी जमिनीलगत खोदलेली २०x२०x १५ आकाराची खोली आहे. या खोलीच्या तळातील भागात अजुन एका भुयाराचे तोंड दिसते. किल्ल्यावर दोन भुयाराशिवाय सातवाहनकालीन दोन खांबी मोठी गुहा आणि सहा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण एकाही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. यातील दोन टाक्याकडे जाता येत नाही त्या केवळ माथ्यावरून पहाता येतात. या टाक्याकडे जाणारी वाट सुरुंग लावून उध्वस्त केली आहे. गावकऱ्यांनी एका कपारीत झऱ्याचे पाणी अडवुन पाण्याची तात्पुरती सोय केली आहे पण पण ती फक्त जानेवारीपर्यंत. गडावरील दोन खांबी गुहेत ८-१० माणसे सहज राहु शकतात पण हि गुहा वापरात नाही शिवाय जानेवारी नंतर गडावर पाण्याची सोय नाही. गडाच्या माथ्यावर जाताना काही उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. गडाची बरीच पडझड झाली असुन एका ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. किल्ल्याचा माथा तसा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा. बितंगवाडीतून गडाच्या माथ्यावर येण्यास दीड तास लागतो. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग, औंढा, पट्टा, आड, म्हसोबाचा डोंगर आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. गड उतरताना सरळ खाली न जाता गडाच्या टोकावरील खिंडीच्या दिशेला जाऊन तेथे असलेले भुयार तसेच खिंडीतील लाकडावरील व्याघ्रशिल्प पहाता येते. किल्ला चढायला कठीण नाही पण खडकात खोदलेल्या पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होत असल्याने व गडावर मोठया प्रमाणात गवत वाढत असल्याने पावसाळ्यात गडावर जाणे टाळावे. बितंगवाडीतील हनुमानाच्या देवळात ३० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गावात विनंती केल्यास घरगुती जेवणाची सोय होते. इतिहासाचा मागोवा घेतला असता या गडाबाबत फारशा नोंदी आढळत नाहीत पण डिसेंबर १६८२च्या एका पत्रात याची नोंद आढळते. रहुल्लाखानाने औरंगझेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो शत्रूच्या प्रदेशात बितंगगडाच्या वाडीस आग लाऊन ती जाळली यावरून १६८२ च्या सुमारास हा किल्ला मराठयांच्या ताब्यात असावा.
© Suresh Nimbalkar