बाळापुर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : अकोला

उंची : 0

श्रेणी : सोपी

अकोला जिल्ह्यात किल्ले तसे फारच कमी अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत. पण जे आहेत ते अतिशय सुंदर आणि प्रशस्त यात प्रामुख्याने नरनाळा व बाळापुरच्या किल्ल्याचे नाव घेता येईल. बाळापुरचा किल्ला भौगोलिक दृष्ट्या जरी अकोला जिल्ह्यात असला तरी बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या गजानन महाराजांचे शेगाव येथुन किल्ला पहायला जाणे सोयीचे आहे. शेगाव पासून बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण १९ कि.मी.वर असुन शेगाव येथुन बाळापुरला जाण्यासाठी एस.टी.व रिक्षा यांची चांगली सोय आहे. मुळचे बाळापुर शहर व किल्ला मान व महिष नदीच्या बेचक्यात वसलेले असुन बाळापुर किल्ल्याच्या अलीकडील टेकडीवर असलेल्या बाळादेवीच्या मंदिरामुळे या शहराला बाळापूर नाव पडल्याचे सांगण्यात येते. बाळापूर शहरात शिरताना दुरुनच किल्लादर्शन होते. बस स्थानकात उतरुन मान नदीच्या काठाने चालत किल्ल्याची दुहेरी तटबंदी डाव्या हाताला व नदी उजव्या हाताला ठेवत १० मिनिटात आपण किल्ल्याच्या नदीच्या दिशेला असलेल्या नगरदुर्गाच्या गुलजार दरवाजापाशी पोहोचतो. ... मान व महिष नदीचे पात्र हे शहर व किल्ला यासाठी लाभलेला नैसर्गीक खंदक असुन अतिशय चिंचोळ्या अशा वाटेने किल्ला व जुने बाळापुर शहर बाहेरील भुभागाशी जोडलेले आहे. मुळ शहराभोवती असलेली तटबंदी व त्यातील दरवाजे, शहराच्या टोकावरील उंचवट्यावर असलेला बालेकिल्ला व त्याभोवती परकोट अशी या किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याचे बांधकाम आजही सुस्थितीत असुन गावातुन फेरी मारताना अनेक ठिकाणी नगरकोटाची उध्वस्त तटबंदी व त्यातील वेशीत असलेले गुलजार, जावळी व कसाई हे तीन दरवाजे आजही पहायला मिळतात. नगरकोटाचा गुलजार दरवाजा पाहुन थोडासा चढ चढत पुढे जातांना डाव्या बाजुस परकोटाची तटबंदी व बुरुजांचे अवशेष पहायला मिळतात. चढ चढून आपण किल्ल्याच्या परकोटात असलेल्या भव्य उत्तराभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. दरवाजाच्या कमानीवर दोन ओळीचा पर्शियन शिलालेख असुन त्यात हा दरवाजा १७५७ साली इलिचपूरचा नबाब इस्माइलखान यानें बांधल्याचा उल्लेख आहे. दरवाजाचा खालील भाग घडीव दगडांनी तर वरील भाग विटांनी बांधलेला असुन त्यावर नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजा शेजारील तटबंदी पाडून किल्ल्यात रस्ता नेल्याने या तटबंदीत असलेल्या पायऱ्या नष्ट झाल्या आहेत त्यामुळे दरवाजाच्या वरील भागात जाता येत नाही. दरवाजातून आत आल्यावर समोरच डाव्या बाजुला एक मशीद असुन उजव्या बाजुला विटांनी बांधलेली एक चौकोनी कोरडी विहीर आहे. या विहिरीतील पाणी काढण्यासाठी जमीनीच्या पातळीत तसेच समोरील भिंतीवर रहाट रोवण्यासाठी दगडी तळखडे दिसुन येतात. परकोटाच्या या परिसरात काही सरकारी कार्यालये आहेत. किल्ला पाहताना सर्वप्रथम बालेकिल्ला व बाहेरील तटबंदी यातील परीसर पाहुन नंतर बालेकिल्ल्यात प्रवेश करावा. बालेकिल्ल्याचे तळातील बांधकाम दगडात केलेले असून वरील बांधकाम वीटांनी केलेले आहे. तळातील दगडी बांधकामात किर्तीमुख, फुले तोरणे कोरलेले मंदिराचे काही कोरीव दगड पहायला मिळतात. बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालताना आपल्याला किल्ल्याच्या एका बाजुस मान नदीचे पात्र तर दुसऱ्या बाजूस महिष नदीचे पात्र पहायला मिळते. किल्ल्याच्या बाहेरील परकोटाच्या तटबंदीत १० तर आतील बालेकिल्ल्याच्या तटबंदीत ५ असे एकुण १५ बुरुज आहेत. बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा करताना वाटेत चार ठिकाणी पाणी साठवण्यासाठी हौद पहायला मिळतात. प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर विहीरीसमोर असलेल्या पूर्वाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो. साधारण चौकोनी आकार असलेला बालेकिल्ला तीन एकर परिसरात सामावलेला आहे. बालेकिल्ल्याला एका मागे एक असे काटकोनात दोन दरवाजे असुन या दोन दरवाजामध्ये रणमंडळाची रचना आहे. या दोन्ही दरवाजाची लाकडी दारे, त्यावरील खिळे आणि दिंडी दरवाजा आजही शिल्लक आहेत. या दोन्ही दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. पहिल्या दरवाजातून आत गेल्यावर तटबंदी व दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या उत्तराभिमुख दरवाजावर घोडा, हत्ती, कमळ अशी वेगवेगळी दगडी शिल्प कोरलेली असुन वरील भागात चर्यांवर चुन्यामध्ये नक्षीकाम केलेले आहे. या दरवाजातुन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच ब्रिटीश काळातील इमारत दिसते. सध्या या इमारतीत सरकारी कार्यालये आहेत. या इमारतीच्या डाव्या बाजूला तटबंदीसमोर विटांनी बांधलेली एक मोठी विहिर आहे. या विहिरीला लागुनच १५ फुट उंच विटांनी बांधलेला नक्षीदार हमामखाना असुन त्या शेजारी पडक्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. हमामखान्यासाठी असलेली पाणीपुरवठा योजना तसेच पाणी गरम करण्यासाठी असलेले चुल्हाणे व त्याचीं वायुविजन योजना या सर्व गोष्टी अभ्यासनीय आहेत. येथुन समोरच असलेल्या पायऱ्यानी आपल्याला तटावर जाता येते. किल्ल्याची फांजी साधारण चार फुट रुंद असुन फांजीवरील तटबंदी व त्यावरील पाकळ्यांच्या आकाराच्या चर्या सहा फुट उंच आहेत. पुर्णपणे विटांनी बांधलेल्या या तटबंदी व बुरुजावर बंदुक व तोफा यांच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. तटावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. या गडफेरीत तटबंदीवर चढण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या दिसतात. बाहेरील बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते. या गडफेरीत एका बुरुजावर नव्याने बांधलेला ध्वजस्तंभ तर दुसऱ्या बुरुजावर एक कबर दिसुन येते. कबर असलेल्या बुरुजासमोर गोलाकार बांधकाम असलेले कोठार पहायला मिळते. किल्ल्याच्या आवारात एका चौथऱ्यावर दगडात बांधलेले एक लहानसे बंदिस्त मंदिर आहे. किल्ला टेकडावर असल्याने किल्ल्यावरून दुरवरचा सपाट प्रदेश नजरेस पडतो. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नदीच्या पाण्याचा विळखा पडत असल्याने परकोटातील तटबंदीचा काही भाग ढासळला आहे. किल्ल्याच्या दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला पहाण्यास दोन तास पुरेसे होतात. बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर २५ फूट चौरस चबुतऱ्यावर ३३ फूट उंचीची व २० खांबांची मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली पाच घुमटांची छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भटकंतीत ही छत्री पाहण्यासारखी आहे. येन-ई-अकबरीमध्यें व-हाडच्या सुभ्यामध्यें बाळापुर हा श्रीमंत परगणा असल्याचा उल्लेख येतो. मोगलांच्या काळात दिल्लीहून हैदराबादकडे जाण्याच्या मार्गावर एलीचपुर नंतर बाळापुर हे एक महत्वाचे लश्करी ठाणे होते. मोगलांच्या काळात अकबर पुत्र मुराद याने १५९६ साली बेरारचे मुख्यालय असलेल्या बाळापुरजवळ शहापुर येथे स्वतःसाठी राजवाडा बांधला. जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे गादीवर येण्यापूर्वी दक्षिणेचे सुभेदार म्हणून बाळापूरपासून १५ कि.मी.वर असलेल्या शहापूर येथे काही काळ वास्तव्यास होते. इ.स.१६६८ मध्ये पुरंदरच्या तहाप्रमाणे औरंगजेबाकडून संभाजी राजांना मुघलांचे पंचहजारी सरदार म्हणुन बाळापूर व आवंढे या परगण्यांची जहागीर व पाच हजारांची मनसब मिळाली. औरंगजेबाचा मुलगा मिर्झा आझम याने १७१७ मध्ये हा किल्ला बांधायला घेतला व एलिचपूरचा पहिला नवाब इस्माईल खान याने १७५७ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!