बारवई
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : १४४५ फुट
श्रेणी : मध्यम
कोकणातील बरेच किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असुन आज नावापुरते इतिहासाच्या पानात उरले आहेत. असाच एक शिवपुर्वकाळात नष्ट झालेला व केवळ दसपटीचा इतिहास या पुस्तकातुन डोकावणारा किल्ला म्हणजे किल्ले बारवई. पेढांबे येथील शिंदे घराण्याकडे असलेल्या दसपटीचा इतिहास या पुस्तकात बारवाई किल्ल्याचा उल्लेख येतो. सह्याद्री डोंगर रांगेपासुन सुटावलेल्या डोंगरावरील या किल्ल्याचे स्थान पाहता देश व कोकण यांना जोडणाऱ्या तिवरे घाटाच्या रक्षणासाठी व टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. आज या डोंगरावर किल्ला म्हणुन कोणतेही अवशेष शिल्लक नसुन काही वास्तुचे तुरळक अवशेष दिसुन येतात. कदाचित हा किल्ला बांधतानाच अर्धवट राहीला असावा.किल्ल्याच्या पठारावर जाण्यासाठी आसपासच्या पेढांबे, उगवतवाडी,सुतारवाडी,खड्पोली अशा अनेक गावातुन वाटा असल्या तरी गाने गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे पण त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे.
...
चिपळूण ते गाणे हे अंतर २० कि.मी.असुन चिपळूण-बहादुरनाका-खड्पोली-गाने असा गाडीमार्ग आहे पण यातील शेवटचे २ कि.मी. कच्चा रस्ता आहे. हा रस्ता गावात जेथे संपतो तेथुन समोरच किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे. किल्ल्यावर अनेक ढोरवाटा असल्याने तसेच तुरळक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत असल्याने गावातुन वाटाड्या घेणे उत्तम अन्यथा अवशेष शोधण्यात बराच वेळ वाया जातो. गावातील पायवाटेने दहा मिनिटात आपण किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो व समोर बारवाई किल्ल्याच्या पुर्व-पश्चिम पसरलेल्या टेकडीचे दर्शन होते. या टेकडीवरील झाडीत दोन-तीन चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. जे काही अवशेष आहेत ते टेकडीच्या पायथ्याशी व माचीवर आहेत. या टेकडीला वळसा मारतच आपली गडफेरी पुर्ण करावी लागते. टेकडीच्या उत्तरेकडील धारेवरून वर चढल्यावर टेकडीच्या पुर्व पायथ्याशी ८ x ३ फुट लांबीरुंदीचे एका रांगेत खोदलेले तीन चर पहायला मिळतात. हे चर म्हणजे उतारावर खडकात टाके खोदण्याच्या कामाची सुरवात असुन असे चर खोदुन त्यातुन दगड काढून तो तटबंदीच्या कामासाठी वापरला जात असे. या चराच्या खालील बाजुस एक लहान नैसर्गिक गुहा असुन ती पहाण्यासाठी किल्ल्याच्या टेकडीवरून खाली उतरुन माचीच्या पुर्व भागात जावे लागते. टेकडीला वळसा मारत दक्षिणेकडील धारेवर आल्यावर उघडयावर ठेवलेला कोरीव मानवाकृती कोरलेला दगड पहायला मिळतो. स्थानीक लोक याला वेताळ म्हणुन पुजतात तर काही दुर्गमित्र या शिळेला विरगळ म्हणुन संबोधतात पण हि विरगळ देखील नाही. हि शिळा दोन भागात कोरलेली असुन तिच्या खालील भागात वादक व नर्तक कोरलेले आहेत पण वरील भाग झीज झाल्याने ओळखण्याच्या पलीकडे आहे. हि मुर्ती पाहुन आपण खालील बाजुस समोर पठारावर असलेल्या झाडांच्या सावलीत येतो. येथे काही अर्धवट घडवलेले दगड झाडांच्या सावलीत ठेवलेले असुन हे ठिकाण बहीरी देवाचे ठाणे म्हणुन ओळखले जाते. या भागात मोठया प्रमाणात घरांच्या जोत्याचे अवशेष दिसतात पण पिण्याच्या पाण्याची सोय मात्र कुठेही नाही. किल्ल्याच्या माचीवरून दूरवर महिमंडणगड, नागेश्वर व वासोटा किल्ला दिसतो तर उजवीकडे जंगली जयगड दिसतो. येथे आपले किल्ला दर्शन पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरून परत गाने गावात येण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. गडावर रहाण्याची सोय नाही पण गाणे गावातील घराच्या अंगणात रहाण्याची सोय होऊ शकते. १३ व्या शतकात बहामनी राजवटीत बाराराव कोळी यांच्या ताब्यात हा भाग होता. बारारावांचा किल्ला तो बारवाई अशी या किल्ल्याच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. गडावर आता ढिगाऱ्याच्या स्वरुपात दिसणारा रचीव दगडी तट यांनीच बांधला असावा. या किल्ल्यासोबत कोळकेवाडी किल्लाही बारारावांच्या ताब्यात होता. मोरे,सुर्वे यांच्या प्रमाणे हे बाराराव या भागावर आपली सत्ता राखुन होते. बहामनी सुलतानाने या बारारावाना पराभुत करण्यासाठी तीन मोहिमा केल्या. इ.स.१३८० च्या सुमारास पहिल्या मोहीमेतील शेख आकुसखान यास बारारावानी कुंभार्ली घाटात सोनपायाजवळ कोकणवावी-पोफळी येथे पराभूत केले तर दुसऱ्या मोहीमेतील भाईखान यास दळवटणे येथे पराभूत केले. तिसऱ्या वेळी मोहीमेतील सरदार बहादूरशेख यास चिपळूणजवळ ठार केले. या सरदाराच्या नावानेच आज चिपळूण येथील बहादुरशेख नाका ओळखला जातो व त्याचा पीर पुजला जातो. अखेरीस बहामनी सरदारांनी भेदनीतीचा अवलंब केल्याने माधवराव रविराव शिंदे शत्रुला फितुर झाले. शेवटी बारारावांचे राज्य बुडाले व सुलतानाने शिंद्यांना चोवीस गावाची खोती दिली. या बारा रावांच्या बायका कलमणी येथे सती गेल्या.
© Suresh Nimbalkar