बारडगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : १७१० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील अपरीचीत गडकोटांना उपेक्षित रहाण्याचा जणु अभिशापच मिळालेला आहे. यातील काही गडकोट अनेक वर्षापुर्वी प्रकाशात येऊन दुर्गप्रेमीपर्यंत न पोहोचल्याने आजही उपेक्षित आहेत. मुंबईजवळ पोर्तुगीजांच्या फिरंगणात उपेक्षित असलेला असाच एक गड म्हणजे किल्ले बारडगड !!! जेष्ठ गिर्यारोहक हमीदाखान मॅडम यांनी वीस वर्षापुर्वीच स्थानिक लोकात परिचित असलेला बारडयाचा डोंगर म्हणजे बारडगड असल्याची नोंद घेतली पण त्या काळात सोशल मिडीयाचा वापर आजसारखा प्रभावी नसल्याने बारडगड दुर्गप्रेमीपर्यंत पोहोचलाच नाही. ठळकपणे दुर्ग अवशेष अंगाखांद्यावर बाळगुन देखील कागदोपत्री संदर्भ काय ? असा प्रश्न काही संशोधकांनी उपलब्ध केल्याने बारडगड देखील काही काही काळ हिरमुसला असेल. पण अलीकडील काळात श्री. देवेंद्र कदम आणि चिंचणी हायकर्स या संस्थेने बारडगडच्या अस्तित्वाचा प्रश्न उचलुन धरला व त्यांना साथ मिळाली ती "सह्यस्पंदन"चे जगदीश गजानन धानमेहेर यांची. सह्यस्पंदनची साथ मिळाली व हिरमुसलेला हा गड नव्याने बोलका झाला. वसईवरील मोहिमेच्या काळात चिमाजी अप्पांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले व बारडगडचा अज्ञातवास संपुष्टात आला. ... खंदक,गुहा, कातळकोरीव पाण्याच्या टाक्या, उध्वस्त दरवाजे,तटबंदी,बुरुज,ध्वजस्तंभ यासारखे अवशेष बाळगुन असलेला हा किल्ला संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. बारडगडावर जाण्यासाठी गडाच्या घेऱ्यात असलेल्या अस्वली, गांगणगाव व करजगाव या तीन गावातुन वाटा असुन अस्वली व गांगणगाव येथुन गडावर जाणाऱ्या वाटा प्रामुख्याने वापरात आहेत. मुंबई-गांगणगाव हे अंतर १३८ कि.मी.असुन मुंबई-अहमदाबाद मार्गावरील धुंदलवाडी फाटा येथुन आंबेसरी-गांगणगाव असा मार्ग आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास गडावर जाण्यासाठी हा सर्वात सोयीचा व कमी वेळेत गडावर जाणारा मार्ग आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. सार्वजनीक वाहनाचा वापर केल्यास मात्र अस्वली गावातुन गडावर जाणे सोयीचे आहे. यासाठी पश्चिम रेल्वेवरील घोलवड अथवा बोर्डी रोड रेल्वेस्थानक गाठावे. हे दोन्ही रेल्वेस्थानक ते अस्वली हे अंतर ९ कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी खाजगी रिक्षा आहेत. अस्वली येथुन धरणाच्या बांधावरून गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात. गडावर पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच गड चढण्यास सुरवात करावी. गडावर स्थानिकांच्या वनदेवता असल्याने गडावर जाणारी मुख्य वाट चांगलीच मळलेली आहे. पण गडाखाली असलेल्या पठारापर्यंत जाताना मुख्य वाटेला अनेक ढोरवाटा असल्याने शक्यतो स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा. गांगणगावातुन गडावर जाताना दाट जंगलातून जाणारा तासाभराचा चढ चढुन आपण गडाच्या दक्षिणेला असलेल्या बोरीचा माळ या पठारावर पोहोचतो. या पठारापर्यंत गावकऱ्यांची ये-जा असते. येथुन खऱ्या अर्थाने गडाच्या वाटेला सुरवात होते. उजवीकडील बाजूने कारवीच्या रानातुन गडावर जाताना वाटेत स्थानिकांनी स्थापन केलेल्या दोन-चार वनदेवतांचे दर्शन घडते. वाट चढावाची असली तरी जंगलातुन जात असल्याने फारसा थकवा जाणवत नाही. गडाच्या दक्षिण सोंडेवर असलेल्या या मळलेल्या वाटेने साधारण पाऊण तासात आपण गडाच्या उध्वस्त तटबंदीसमोर असलेल्या खंदकात पोहोचतो. खंदकाचे काम पुर्ण न झाल्याने हा भाग काही प्रमाणात मुख्य गडाशी काही प्रमाणात जोडला गेला आहे. या खंदकात एक घुमटीवजा मंदिर असुन त्यातील शिल्प झीज झाल्याने ओळखता येत नाही. खंदकाच्या वरील बाजुस असलेली गडाची तटबंदी म्हणजे मातीत गाडलेल्या तटबंदीचा केवळ पाया आहे. या तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन येथुन समोरच सपाटीवर असलेला गडाचा परीसर नजरेस पडतो. गडाची समुद्रसपाटीपासुन उंची १७१० फुट असुन आयताकृती आकाराचा हा गडमाथा १० एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडाच्या पुर्व भागात खोल दरी असल्याने त्या दिशेला नैसर्गिक संरक्षण लाभल्याने कोणतेही बांधकाम दिसून येत नाही. उर्वरित तीन बाजुच्या खालील भागात पठार असल्याने दोन ते पाच फुटापर्यंत उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. गडात प्रवेश केल्यावर सुरवातीला सपाटीवर कातळ फोडल्याने तयार झालेली साचपाण्याची दोन तळी आहेत पण त्यात सध्या मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली आहे. आपण प्रवेश केलेल्या ठिकाणाच्या उजव्या बाजूस दरीच्या काठावर कातळात कोरलेली पाण्याची ५-६ टाकी असुन दगडी खांबावर तोललेल्या दोन गुहा आहेत. यातील दोन टाकी अर्धवट कोरलेली असुन त्यातुन बांधकामासाठी काढलेले दगडी चिरे स्पष्टपणे दिसुन येतात. हि सर्व टाकी कोरडी पडलेली असुन एका टाक्याच्या तळाशी चुन्याचा गिलावा केलेला आहे व एका टाक्यात पाणी असले तरी शेवाळामुळे ते पिण्यायोग्य नाही. प्रसंगी उकळुन व गाळुन हे पाणी पिण्यासाठी वापरता येईल. येथे असलेल्या दोन गुहापैकी पाच खांबावर तोललेल्या मोठ्या गुहेला स्थानिक लोक देवीचे भुईघर म्हणुन ओळखतात. या गुहेचे दोन खांब सद्यस्थितीत कोसळलेले आहेत. या गुहेत काही प्रमाणात प्राचीनकाळात केलेले विटांचे बांधकाम दिसुन येते. गुहेच्या आत जाण्यासाठी पायऱ्या उतरताना उजवीकडे असलेली लहान गुहा म्हणजे पाण्याचे टाके आहे पण त्यातील पाणी देखील पिण्यायोग्य नाही. दुसरी गुहा टाक्याच्या अंतर्गत भागात असुन एका खांबावर तोललेली आहे. गड म्हणून हा डोंगर परीचीत नसल्याने भटकंती करणारी काही मोजकी मंडळी या गुहा पहाण्यासाठी येथे येतात. सरकारी कागदपत्रात या गुहांची बराड लेणी म्हणुन नोंद असुन त्यांनी येथे संरक्षणासाठी लोखंडी कठडे उभारून उर्वरित काम निसर्गाच्या हवाली केलेले आहे. गडाचा हा भाग पाहून झाल्यावर उत्तरेच्या दिशेने आपली पुढील गडफेरी सुरु करायची. या वाटेच्या डावीकडे मातीने भरलेला व कोरडा पडलेला एक तलाव पहायला मिळतो. येथुन पुढे जाताना वाटेला दोन फाटे असुन एक वाट डावीकडे खाली उतरते तर दुसरी वाट सरळ जाते. आपण खाली न वळता सरळ वाटेने गडाचा पुढील भाग पाहुन घ्यावा. गडाचे उत्तर टोक म्हणजे दोन सोंडा असुन यातील उत्तर-पुर्व सोंड अतिशय निमुळती आहे. या सोंडेच्या टोकावर चौकोनी आकाराचा बुरुज बांधण्यात आला असुन त्यावर ध्वजस्तंभाचा चौथरा पहायला मिळतो. गडावर करजगाव येथुन येणारी तिसरी वाट अलीकडील काळात तयार झाली असुन ती या बुरुजावरूनच गडात प्रवेश करते. गडाचा हा भाग पाहून झाल्यावर मागे वळुन खाली जाणाऱ्या वाटेवर यावे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर दोन सोंडेमधील घळीच्या वरील बाजुस असलेला गडाचा उत्तराभिमुख उद्ध्वस्त दरवाजा नजरेस पडतो. करजगाव येथुन गडावर येण्याचा हा मुख्य मार्ग असुन वापरात नसल्याने हा मार्ग आज पुर्णपणे नष्ट झाला आहे व नवीन मार्ग बुरुजावरून गडात प्रवेश करतो. या वाटेने काट्याकुट्यातुन खाली उतरल्यास तीन चार बांधीव पायऱ्या दिसतात. दुसऱ्या सोंडेवरून खाली उतरत जाणारी हि वाट म्हणजे अस्वली गावातुन गडावर येणारा दुसरा मुख्य मार्ग आहे. मुख्य दरवाजाकडून येणारी तटबंदी व खालील बाजूने वर येणारी तटबंदी जेथे एकत्र येते त्या ठिकाणी असलेला दगडी तळ पहाता या तटबंदी एखादा लहान दरवाजा असण्याची शक्यता आहे. येथुन थोडे पुढे आल्यावर तटबंदी बाहेर असलेल्या बांधीव पायऱ्या दिसतात. या तटबंदीत देखील दरवाजा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथुन तटबंदीवर फेरी मारण्यास सुरवात केल्यास दाट झाडीतुन व काटेरी झुडपातून वाट काढत आपण प्रवेश केलेल्या तटबंदीपर्यंत जाऊन पोहोचतो. हि तटबंदी म्हणजे ५-६ घडीव दगडांचा एकमेकांवर रचलेला थर असुन तटबंदीच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात घडीव चिरे तसेच विखुरलेले दगड पहायला मिळतात. तटबंदीवर फेरी न मारता पायऱ्या उतरून सरळ खाली गेल्यावर काही अंतरावर दुसरी तटबंदी आडवी येते. अस्वली गावाकडील सोंडेवरून गडावर येणारा मार्ग सोंडेवर दुहेरी तटबंदी व त्यात दोन दरवाजे बांधुन पुर्णपणे संरक्षित केल्याचे दिसुन येते. दुर्गप्रेमींचा गडावर वावर नसला तरी स्थानीक मद्यप्रेमींचा चांगलाच वावर असुन त्यांनी गडाचा उकीरडा केलेला आहे. गडावर तसेच गडाखाली असलेल्या पठारावर चांगलेच जंगल असुन चहुबाजुनी गड जंगलाने वेढलेला आहे. संपुर्ण गड फिरण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. गडाचे एकुण बांधकाम पहाता हा गड पुर्णपणे बांधला गेला नसावा. गुजरातच्या सुलतानाने महिकावतीच्या म्हणजेच माहीमच्या बिंब राजाचा पराभव केल्यावर बिंब राजसत्ता मुंबईवर स्थिरावली. पण नंतरच्या काळात व्यापारासाठी आलेल्या आलेल्या परकीय युरोपियन सत्तांनी या भागाचा ताबा घेतला. गुजरातच्या सुलतानाचा पराभव करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकण ताब्यात घेतले व वसई त्याचे मुख्य केंद्र बनले. पोर्तुगीजांचा हा अंमल अखेर चिमाजीअप्पांच्या १७३९ मधील वसई मोहीमेमुळे संपुष्टात आला. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमे दरम्यान झालेल्या पत्रव्यवहारातुन अनेक गोष्टींचा उलगडा होतो. बादल पारडी ठाणे घेण्यासाठी चिमाजी अप्पांनी पिलाजी जाधव यांचा मुलगा सटवाजी जाधव यास रवाना केले व दमण येथील किल्ल्यांची भक्कम शिबंदी पाहता, या मुलखात रायजी शंकर नावाच्या एका माहितगाराला पाठविले. ५ जानेवारी १७३९ रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजीअप्पा चौकशी करताना सटवाजी जाधवास लिहितात. श्री. शके १६६० पौष शु॥ ५. राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि :--अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. रामनगरकर राज्यांस आम्ही भेटीस बोलाविलें आहे. ऐशास तुम्ही बादला पारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल, तरी रामनगरकर राज्यांसदेखील तुह्मी आपणाजवळ ठेऊन घेणें; आणि काम सिद्धीस नेणें. तैसेंच रा। रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जरी तुम्ही तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल, तर मग विनाकार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे ते तो बांधतील. सारांश, तुह्मी बादलापारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायाबा तेथें असावेसें असेल, तें वर्तमान लिहिणें? लेखनसीमा. यावरून सटवाजी जाधवांनी ५ जानेवारी १७३९ ला बादल पारडी किल्ला जिंकल्याचे कळते. तसेच डहाणू जवळ असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्याचे चिमाजीअप्पांनी ठरवले होते व या कामाकरता रायजी शंकर यांची नेमणूक होती. डहाणू किल्ल्याच्या परिसरात असलेला बारड डोंगर भौगोलिक दृष्ट्या मोक्याचा असल्याने अथांग समुद्र व पूर्वेकडील प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी बारड डोंगर येथे किल्ल्याच्या बांधकामाचा योजना आखली गेली. पण हा किल्ला पुर्णपणे बांधला गेला नसावा. टीप- बारडगडाच्या दुर्गभ्रमंतीसाठी सह्यस्पंदनचे जगदीश गजानन धानमेहेर यांचे विशेष सहकार्य लाभले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!