बांद्रा

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबईमध्ये किल्ले म्हटले कि आपल्याला थोडे आश्चर्य वाटते पण कधीकाळी ब्रिटीशकाळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते. पोर्तुगीज व ब्रिटीश यांच्या वेगवेगळ्या कालखंडात यांची बांधणी झाली. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी.माहीम,बांद्रा,मढ हे किल्ले तर दक्षिणेकडील किनारपट्टीवर काळाकिल्ला रीवा किल्ला,सायन किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली.पुर्वेला शिवडी,माझगाव, डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते. यातील माझगाव व डोंगरी हे किल्ले पूर्णपणे नष्ट झालेले असुन बॉम्बे फोर्टचा केवळ एक अवशेष पहाता येतो. उरलेले आठ किल्ले मात्र आजही आपल्याला बघायला मिळतात. त्यांपैकीच बांद्रा किल्ला एक आहे. पश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकावर उतरुन पश्चिमेहुन बसने किंवा रिक्षाने बांद्रा बॅण्ड स्टँडला जावे. येथे ताज लॅण्ड एंड हॉटेल पुढे बांद्रयाचा ऐतिहासिक किल्ला उभा आहे. बांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभाग व स्थानिक बांद्रा लँड एण्ड गार्डन सोसायटी यांनी संयुक्तपणे डागडूजी केलेली आहे व किल्ल्याचे आहे ते रूप जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ... त्यामुळे किल्ला अवशेषरूपाने का होईना पण पहाता येतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी किल्ल्याबाहेर किल्ल्याची माहिती देणारा एक फलक दगडात कोरून हल्लीच तेथे बसविण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक रोमन भाषेतील पोर्तुगिजकालीन शिलालेख कोरलेला असुन त्यावर १६४० सालची किल्ला बांधल्याची नोंद आहे. तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुस समुद्रा कडील तटबंदी व बुरुज दिसतो तर डाव्या हातास दुसरे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. संपुर्ण किल्ला बांधणीत पोर्तुगीज स्थापत्याचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. किल्ल्यात बांद्रा लँड एण्ड गार्डन या सोसायटीने बाग तयार केलेली आहे. किल्ल्यात इतर काही अवशेष उरलेले नाहीत. या किल्ल्यावर खासगी नियंत्रण आहे. किल्ल्याच्या परिसरात प्रेमी युगुलं नको त्या अवस्थेत बसलेली असल्याने सर्वसाधारण पर्यटकांना फिरणे अशक्यप्राय आहे. पुरातत्त्व खात्याचा फलक शाबूत असुन त्यांचे नाममात्र अस्तित्व आहे. वांद्रे म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला. माहीम खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातली तेढ १६१२ सालच्या सुरतेच्या युद्धापासून मूळ धरून होती. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणा-या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी टेहळणी व गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर १६४० साली बांद्रयाचा किल्ला बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. पुढे याचा उपयोग ब्रिटीशांच्या ताब्यातील मुंबई बेटांना शह देण्यासाठी झाला. १७३७साली मराठ्यांच्या वसई आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्धं झाली. खंडोजी मानकर या चिमाजी आप्पांच्या सरदाराने या किल्ल्यावर १७३७ साली हल्ला चढवल्याची नोंद आढळते. यावर्षी पूर्ण साष्टी जिंकूनही वांद्रे व वेसावे हे किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत. १७३९ सालच्या स्वारीत मराठ्यांचा जोर पाहून ब्रिटिशांनी हा किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला आणि १७३९ च्या मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!