बहुला

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २९८० फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर वसलेले गडकिल्ले अनेक कारणामुळे दुर्गम बनले आहेत. काही किल्ले त्याच्या कठीण वाटांमुळे दुर्गमतेसाठी प्रसिध्द आहेत तर काही किल्ले इंग्रजांनी त्याचा मार्ग तोडल्याने दुर्गम बनले आहेत पण काही किल्ले मात्र लष्कराच्या ताब्यात असल्याने दुर्गभटक्यांसाठी दुर्गम बनले आहेत. आंबेबहुला हा लष्कराच्या ताब्यात असलेला असाच एक किल्ला. हा किल्ला लष्कराच्या तोफखान्याच्या सराव क्षेत्राचा भाग असल्याने किल्ल्यावर जायला बंदी आहे. रविवारी हा सराव बंद असल्याने काही दुर्गप्रेमी या किल्ल्यावर जातात मात्र तोफांचे जिंवत गोळे या परीसरात पसरले असल्याने तेथे जाणे काही प्रमाणात धोक्याचे आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रविवार हा एकमेव दिवस असला तरी काही वेळा रविवारी देखील तोफखान्याच्या सराव सुरु असतो त्यामुळे पुर्ण माहीती घेऊनच किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घ्यावा. बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी आंबेबहुला हे किल्ल्याजवळील गाव असुन गावातील काहीजण रविवारी भंगार वेचण्यासाठी किल्ल्यावर जातात त्यामुळे किल्ला पहाण्यासाठी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांची मदत घ्यावी. ... बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी फाटा पार केल्यावर २४ कि.मी. अंतरावर उजवीकडे तर नाशिकहुन १४ कि.मी.अंतरावर डावीकडे विहोळी गावात जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरून दोन कि.मी. आत आंबेबहुला गाव वसले आहे. मुळ बहुला गाव हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसले होते पण १९४४ दरम्यान लष्करांने देवळाली कॅम्प वसविल्यावर फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या यात आंबेबहुला गावाचा सामावेश होता. त्यामुळे वालदेवी नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबेबहुला गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. गावातुन एक कच्चा रस्ता गावाबाहेर १ कि.मी.वर असलेल्या बंधाऱ्याच्या दिशेने जातो. हा बंधारा पार करून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली जात असल्याने किल्ल्यावर जाता येत नाही. येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी ४ कि.मी.ची पायपीट करावी लागते. या वाटेवरून किल्ल्याकडे पहिले असता उजवीकडे दिसतो तो रायगड डोंगर तर डावीकडे दिसणारा टोपीच्या आकाराचा डोंगर म्हणजे बहुला किल्ला. बहुला किल्ला असलेल्या डोंगराची सोंड व त्याच्या डावीकडचा डोंगर यामधील खिंडीतून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. हि खिंड नजरेसमोर ठेवुनच आपण चालायला सुरवात करायची. बंधाऱ्यापासुन सुरवातीला खुरट्या काटेरी झुडुपातून,बाभळीच्या जंगलातुन व पुढे गवताळ माळरानावरून तासभर चालल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या ठिकाणी खडकात कोरलेले एक मोठे टाके आहे. या टाक्यात पाणगवत वाढले असुन पिण्यायोग्य पाणी वर्षभर उपलब्ध असते. यानंतर गडावर कोठेही पिण्यायोग्य पाणी नसल्याने येथुनच पुरेसे पाणी सोबत घ्यावे. येथुन अर्ध्या पाउण तासाचा चढ चढुन आपण उजवीकडे किल्ला व डावीकडील डोंगराच्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीतुन उजवीकडील वाटेने वर चढत पाच मिनिटे चालल्यावर आपण एका लहानशा उंचवट्याखाली येतो. बुरुजासारखा दिसणारा हा उंचवटा सोपे प्रस्तरारोहण करून चढल्यावर याच्या माथ्यावर कातळात कोरलेली चौकोनी आकाराची अनेक छिद्रे दिसुन येतात. हि छिद्रे हा कातळ फोडण्यासाठी अथवा या ठिकाणी बुरुजाचा पाया बांधण्यासाठी कोरली असावीत. येथुन डोंगरसोंडेवरून किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते. या वाटेने जाताना ठिकठिकाणी तोफगोळ्यांच्या माऱ्याने जमिनीला पडलेले खड्डे व तोफगोळ्याचे निकामी अवशेष पहायला मिळतात. येथे पडलेल्या वस्तुंना हात लावणे व त्यांचे छायाचित्र काढणे टाळावे. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. या कातळकड्यात वरील बाजुस एक लहानशी गुहा दिसुन येते. या गुहेत स्थानिकांनी भैरवाची स्थापना केली आहे पण गुहेकडे जाणारा मार्ग काहीसा अवघड आहे. येथुन कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत काही पावले गेल्यावर आपण एका लेणीवजा गुहेपाशी पोहोचतो. हि गुहा दगडी खांबावर तोललेली असुन उजव्या बाजुस उंचवट्यावर अजून दोन दालने कोरलेली आहेत. प्रसंगी या गुहेत रहाता येईल पण पाण्याची मात्र सोय नाही. या गुहेकडून कड्याला लागुन असलेल्या वाटेने काही अंतर पार केल्यावर आपण गडावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायरी मार्गाजवळ पोहोचतो. माथ्यावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटेवर अतिशय सुंदर असा हा पायरीमार्ग ६५ अंशाच्या कोनात कोरलेला असुन याला एक ते दीड फुट उंचीच्या ९० पायऱ्या आहेत. शिडीसारखा असणारा हा पायरीमार्ग चढताना सुरवातीस डाव्या बाजुला आधारासाठी कातळात खोबणी कोरलेल्या आहेत. पुर्णपणे कातळात कोरून काढलेल्या या मार्गाने वर आल्यावर टोकावर किल्ल्याचा ढासळलेला पश्चिमाभिमुख दरवाजा व त्याशेजारी ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. या दरवाजातुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. त्रिकोणी आकाराचा किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ३.५ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २९८० फुट उंचावर आहे. माथ्यावर आल्यावर तटाच्या काठावरून दक्षिण दिशेने गडफेरीस सुरवात केल्यावर दक्षिण टोकावर काही प्रमाणात सपाटी दिसुन येते. या सपाटीवर उतरण्यासाठी कातळात काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या शेजारील कपारीत पाण्याचे टाके कोरलेले असुन यातील पाणी वापरात नसल्याने त्यात शेवाळ जमा झाले आहे. सपाटीवर कातळात कोरलेला एक खोल खळगा असुन हि बहुदा झेंड्याची जागा असावी. बुरुजासारखा दिसणारा हा भाग खालील बाजुने दगड तासुन वर चढण्यासाठी कठीण करण्यात आला आहे. टाक्याकडून दरीकाठाने पुढे आल्यावर पाण्याचे दुसरे टाके पहायला मिळते. या टाक्यात मोठया प्रमाणात गाळ जमा झाला आहे. हे टाके पाहुन वर आल्यावर माथ्यावर अजून एक माती भरून बुजलेले टाके पहायला मिळते. याशिवाय गडमाथा फिरताना अनेक वास्तुचे चौथरे तसेच घडीव दगड वापरून बांधलेला मोठा वाड्याचा चौथरा पहायला मिळतो. किल्ल्याच्या दरी काठावरून फिरताना तोफगोळ्यांच्या माराने ठिकठिकाणी मोठया प्रमाणात ढासळलेली तटबंदी दिसुन येते. दरी काठावरून फिरत दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरीस अर्धा तास पुरेसा होतो. गडाचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी होत असावा. गडमाथ्यावरून औंढा, पट्टा, बितनगड, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, वायव्येला गडगडा उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी इतके किल्ले एका ठिकाणाहुन पहायला मिळतात. किल्ला पाहुन गुहेकडून खाली उतरताना कडा उजव्या बाजुस ठेवुन दरीकाठाने काही अंतर पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी पहायला मिळतात.यातील एक टाके बुजलेले असून दुसऱ्या टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. गुहेकडून आंबेबहुला गावात जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावरील लेणी व कातळात कोरलेला पायरीमार्ग पहाता या किल्ल्याची निर्मीती प्राचीन काळात झाल्याचे कळते. शिवकाळात मराठयांची या भागावर असलेली सत्ता पहाता हा किल्ला देखील स्वराज्यात असावा असा अंदाज करता येतो. इ.स.१८१८ साली पेशवाईच्या अस्तानंतर कॅप्टन जॉन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केल्याची नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!