बहाळ

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : जळगाव

उंची : १०१० फुट

श्रेणी : सोपी

किल्ले म्हणजे शिवाजी महाराज हे समीकरण महाराष्ट्रातील जनमानसात इतके रुजले आहे कि शिवाजी महाराजांशिवाय इतर राज्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कालखंडात किल्ले बांधले याची आपण कल्पनाच करत नाही. याच कारणांमुळे शिवकालापुर्वी इतर राज्यकर्त्यांनी बांधलेल्या व महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या गढीकोटांचा आपल्याला विसर पडलेला आहे. गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास लाभुन देखील विस्मृतीत गेलेला असाच एक किल्ला आपल्याला जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात बहाळ येथे पहायला मिळतो. बहाळ गाव नाशिक आग्रा महामार्गावरील धुळे येथुन ५० कि.मी अंतरावर तर चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणाहुन १९ कि.मी.अंतरावर आहे. बहाळ गाव गिरणा नदीच्या काठावर वसलेले असुन या नदीमुळे गाव कसबा व पेठ असे दोन भागात विभागलेले आहे. नदीकाठी टेकडीवर असलेल्या बहुळादेवीच्या प्राचीन मंदिरावरून गावाला बहाळीये व कालांतराने बहाळ हे नाव पडले असावे. याच टेकडीवर बहाळ किल्ला आजही अवशेष रुपात शिल्लक आहे. कधीकाळी बहाळ गाव हे नगरकोटाच्या आत वसले होते याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. ... या नगरकोटात प्रवेश करण्यासाठी असलेले दोन दरवाजे आज ढासळलेले असले तरी या दोन दरवाजांची चौकट व रस्त्याच्या बाजुला काही प्रमाणात शिल्लक असलेली कोटाची तटबंदी आजही पहायला मिळते. या शिवाय कोटात असलेली गढी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन तिचे गोलाकार आकाराचे दोन बुरुज व तटबंदी पहायला मिळते. गढीच्या आतील वास्तु मात्र पुर्णपणे नष्ट झाली असुन त्या ठिकाणी नवीन घरे बांधलेली आहेत. गावातील हा फेरफटका पुर्ण झाल्यावर टेकडीवर असलेल्या बहुलादेवी मंदिराकडे निघावे. या टेकडी भोवती मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडी वाढलेली असुन या झाडीत किल्ल्याची तटबंदी लपलेली आहे. झाडीत शिरले असता हि तटबंदी पहायला मिळते. तटबंदीचे लांबलचक दगड व त्याची रचना तसेच झालेली झीज हे तटबंदी प्राचीन असल्याचे दर्शविते. टेकडीच्या खालील टप्प्यात सहा नक्षीदार खांबावर तोललेले व घडीव दगडात बांधलेले प्राचीन मंदीर आहे. या मंदिराच्या सभामंडपात एक प्रशस्त शिलालेख असुन या शिलालेखाच्या पहिल्या भागात देवीस्तोत्र तर दुसऱ्या भागात नगरदेवळा येथील पवार घराण्याची माहिती कोरलेली आहे. यावरून या किल्ल्यावर नगरदेवळा येथील पवार घराण्याची सत्ता असावी व हा शिलालेख मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्यांनी बसवला असावा. या मंदिराशेजारी काही अंतरावर उध्वस्त झालेले दुसरे मंदिर आहे. या मंदिराकडून टेकडीच्या दिशेने निघाल्यावर टेकडीच्या काठावर नव्याने बांधलेले एक मंदीर व एका वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. नदीच्या काठाच्या दिशेने हि टेकडी चांगलीच उंच असुन या भागात पडझड झालेला एकमेव बुरुज शिल्लक आहे. येथुन नदीकडे उतरणारी पायवाट असुन कधीकाळी या वाटेवर दगडी पायऱ्या असल्याच्या खुणा दिसुन येतात. या भागात चुनेगच्ची बांधकाम केलेला हौद असुन त्या शेजारी कोरडी पडलेली मोठी विहीर आहे. या हौदाशेजारी दिसत असलेले खापरी नळ पहाता विहिरीतील पाणी हौदात भरून तेथुन ते खापरी नळाने संपुर्ण किल्ल्यावर फिरवले जात असावे. येथुन थोडे खाली उतरले असता एका भग्न मंदीराचे अवशेष असुन सध्या शेंदूर फासून त्याचीच पूजा केली जाते. टेकडीच्या सर्वात उंच भागात गेले असता तेथुन दूरवरचा प्रदेश व गिरणा नदीचे पात्र नजरेस पडते. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी एका बाजुस गिरणा नदीचे पात्र तर उर्वरीत बाजुस खंदक खोदुन गिरणा नदीचे पाणी त्यात सोडल्याचे दिसुन येते. वाढलेल्या वस्तीमुळे आता हा खंदक बुजत चाललेला आहे. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. आत्ता किल्ल्याच्या इतिहासाकडे वळुया. आपण किल्ला म्हणुन संबोधतो ती टेकडी बहाळची गढी म्हणुन ओळखली जाते. या टेकडीवरील मंदिराजवळ केंद्रीय पुरातत्व विभागाने १९५२ व १९५७ असे दोन वेळा उत्खनन केले. या उत्खननात ताम्रपाषाण युगापासून मध्ययुगीन काळापर्यंतचे अनेक अवशेष आढळुन आले. यावरून ताम्रपाषाण युगापासुन म्हणजे इ.स.पु. १४-१५ व्या शतकात बहाळ येथे वस्ती असल्याचे सिद्ध होते. यावरून बहाळ येथील किल्ला अतिशय जुना असावा. खानदेशात प्राचीन काळापासून राज्यसत्ता व धर्म सत्तांचा प्रभाव राहिला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, अभीर, मैत्रक, चालुक्य, कलचूरी, राष्ट्रकूट, यादव यांची स्थापत्ये खानदेशात सापडतात. उत्तरेत आढळणारी काळी खापरे सम्राट अशोकाच्या काळाशी निगडित असल्याचे मानले जाते. तशी खापरे बहाळ च्या वरच्या थरात सापडली आहेत. तसेच मौर्य काळातील (इसवी सन पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक) ' आहत ' ही नाणी बहाळ, शेंदुर्णी येथे मिळाली आहेत. त्यावरून हा भाग मौर्यांच्या अधिपत्याखाली होता हे सिद्ध होते. मौर्यांच्या नंतर सातवाहन घराण्याचे या परिसरावर राज्य होते. सातवाहन राजा पहिला सिमुक याच्या नंतर त्याचा भाऊ कृष्ण किंवा कण्ण हा गादीवर आला. कण्ण वरून कण्णदेश, कानदेश अशी देखील व्युत्पत्ती काही विद्वान करतात. सातवाहन यांची राजधानी पैठण, पितळखोरा यांच्या सरळ रेषेत बहाळ आहे. हा परिसर सातवाहनांच्या काळात चांगलाच भरभराटीस आला असावा. त्यांच्यानंतर वाकाटक, आभिर, मैत्रक, चालुक्य यांनी या परिसरावर राज्य केले. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या इसवीसन 630 च्या ताम्रपटात गिरणा नदीचा उल्लेख ' गिरीपर्णा ' असा आला आहे. बहुळादेवीच्या मंदीराचे बांधकाम व रचना पहाता हे मंदीर यादव पुर्व काळातच बांधले गेले असावे. येथील सारजादेवी या प्राचीन मंदिरात शके ११४४ म्हणजे इ.स. १२२२ सालचा शिलालेख मिळाला असुन हा शिल्लेख यादव राजा सिंघणदेव याच्या काळातील आहे. या शिलालेखात सिंघणदेव याचा राजज्योतिषी अनंतदेव याने सारजादेवीच्या मंदीराचा पाया घातल्याचे नमूद केले आहे. यावरून तेराव्या शतकात या भागावर यादव किंवा त्यांच्या मांडलिक राजाची सत्ता असावी. अनंतदेव हा भास्कराचार्यांच्या अगदी जवळचा म्हणजे त्यांच्याच शांडिल्य गोत्रातील होता. अनंतदेवाला हे गाव जहागीर म्हणुन देण्यात आले असावे. या शिलालेखानुसार शके ११४४ चैत्र आद्य प्रतिपदा चित्रभानु संवत्सर म्हणजे इ.स. १२२२-२३ असा या मंदिराचा निर्माण काल आहे. हा शिलालेख यादव नृपती सिंघनदेव याच्या कारकीर्दीतील आहे. या लेखाचा उद्देश यादव राजा सिंघणदेव याचा ज्योतिषी अनंतदेव याने द्वारजा (सारजा देवी) भवानी देवीच्या देवालयाचा पाया बांधला हे नमूद करण्यासाठी होता. या लेखाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अनंतदेव व त्याचे पूर्वज यांची माहिती दिली आहे. १.अनंतदेव - हा देऊळ बांधणारा ज्योतिषी. २. महेश्वर- हा अनंत देवाचा भाऊ,प्रशस्ती रचणाराव देऊळ बांधण्यासाठी आर्थिक मदत देणारा. ३. शांडिल्य-हा अनंतदेवाच्या घराण्याचा मूळ पुरुष. ४. मनोरथ - हा शांडिल्य याच्या वंशातील अनंतदेवाचा पूर्वज. ५. महेश्वर - हा ज्योतिष्य जाणारा मनोरथाचा पुत्र. ६. श्रीपती- हा महेश्वराचा पुत्र, अनंतदेवाचा पितामह. ७. गणपती- हा श्रीपतीचा पुत्र, अनंतदेवाचा पिता. लेखाच्या दुसर्या भागात सिंघणदेव त्याचा पिता, पितामह यांची स्तुती केलेली आहे. १. सिंह - सिंघण यादव नृपती. २. जैत्रपाल - यादव नृपती सिंगणचा पिता. ३.भिल्लम - यादव नृपती, सिंघणचा पितामह. ४ गणपती- जैत्रपाल याने संरक्षण दिलेला आंध्रप्रदेशचा राजा. ५.अर्जुन - सिंघण राजाचा प्रतिपक्षी राजा. या लेखामध्ये पुढे जैत्रपालाने (सिंघणचा पिता) गणपतीला आंध्रप्रदेशचा प्रमुख केल्याचा उल्लेख आहे. लेखाच्या शेवटी गंगाधर, लेख लिहिणारा नागर ब्राह्मण याचा उल्लेख आहे, तर या मंदिराच्या संपूर्ण बांधकामाचा सूत्रधार थालू याचाही उल्लेख केला आहे. महानुभवांच्या साती ग्रंथ मालिकेतील शेवटचा आणि महत्वाचा काव्यग्रंथ ऋद्धीपुरवर्णन (रचना शके १४१८) याचा रचनाकर्ता पंडीत नारायण व्यास बहाळीये हा बहाळचा राहणारा व येथील राजांचा दरबारी होता. नारायण पंडीताचा पिता या राजाचा मुख्य ज्योतिषी होता. पंधराव्या शतकाच्या अखेरीस महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे बहाळ येथे बराच काळ वास्तव्य होते.या नंतरच्या काळात बहाळ गावाचे फारसे उल्लेख येत नाहीत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!