बहादुरवाडी
प्रकार : भुईकोट
जिल्हा : सांगली
उंची : 0
श्रेणी : सोपी
सांगली जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे चार किल्ले वाळवा तालुक्यात आहेत. यात विलासगड, मच्छीन्द्रगड या गिरीदुर्गांचा तर बागणी, बहादुरवाडीगड यासारख्या भूईकोटाचा सामावेश होतो. बहादुरवाडी भुईकोट हा कोल्हापुरहुन ३२ कि.मी. अंतरावर तर सांगलीहून कवठेपिरण-दुधगाव-बागणीमार्गे ३० कि.मी.अंतरावर आहे. खाजगी वहानाने आपण गावाच्या टोकाला असलेल्या भुइकोटापर्यंत पोहोचतो. कोटाच्या चारही बाजुस खोल खंदक असुन समोरच असलेला कोटाचा दरवाजा व त्याशेजारील बुरुज आपले लक्ष वेधुन घेतात. दरवाजाच्या उजवीकडील बुरूजाशेजारी असलेली बाहेरील तटबंदी या खंदकात ढासळली आहे. खंदकात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन दरवाजासमोरील खंदकात भराव घालुन आत जाण्यासाठी मार्ग बनवला आहे. बाहेरील तटबंदी-बुरुज दगड व चुना वापरून बांधलेले असुन फांजीवरील बांधकाम मात्र विटांमध्ये केलेले आहे. दरवाजाच्या उजवीकडील बुरुजा शेजारील कट्ट्यावर गणपतीची मुर्ती स्थापन केली आहे.
...
हा दरवाजा व बुरुजाचे संवर्धन करताना या बांधकामावर सिमेंट थापल्याने व दरवाजासमोरच पत्र्याचा निवारा उभारल्याने या बांधकामाचे मुळ सौंदर्य लोप पावले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन आतील बाजूने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. चौकोनी आकाराच्या साधारण अडीच एकरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यास दुहेरी तटबंदी असुन बाहेर मुख्य किल्ला व आत बालेकिल्ला अशी याची रचना आहे. बाहेरील तटबंदीत एकुण बारा बुरुज असुन दरवाजाशेजारील दोन व उर्वरित चार बुरुज वगळता सहा बुरुज पुर्णपणे ढासळले आहेत. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन यातील दोन बुरुज ढासळले आहेत तर उर्वरित सहा बुरुज मात्र सुस्थितीत आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण पाउण एकर आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच बालेकिल्ल्याची तटबंदी व दोन बुरुज पहायला मिळतात. अंदाजे अठरा फुट उंचीच्या या तटबंदीचे खालील अर्धे बांधकाम दगड व चुन्यात केलेले असुन वरील अर्धे बांधकाम विटांनी केलेले आहे. या दोन बुरुजामध्ये असलेल्या तटबंदीत चार कमानीदार ओवऱ्या पहायला मिळतात. या घोड्यांच्या पागा असल्याचे स्थानिक सांगतात. याशिवाय बुरुजावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी बांधलेल्या जंग्या दोन थरात बांधलेल्या असुन त्यावरील भागात तोफेसाठी झरोका ठेवलेला आहे. बा रायगड या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने या कोटाचे संवर्धन कार्य हाती घेतले असुन त्यांनी बालेकिल्ल्या बाहेरील परीसराची अतिशय सुंदर निगा राखली आहे. या भागात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष पहायला मिळतात. येथुन ढासळलेल्या तटबंदी मधुन काटकोनी मार्गाने आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. बालेकिल्ला संवर्धन कार्य अजून बाकी असल्याने आत सगळीकडे प्रचंड झाडी माजली असुन आतील सगळे अवशेष या झाडीत लपले आहेत. बालेकिल्ल्यात एका मोठया चौसोपी वाड्याचा चौथरा असुन झाडीतुन फिरताना या वाडयात असलेला एक हौद व तुळशी वृंदावन पहायला मिळते. या कोटाला पाणीपुरवठा करण्यासाठी वाड्याच्या एका कोपऱ्यात चौकोनी आकाराची कोरडी पडलेली ५० फुट खोल विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी तळापर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. या विहिरीभोवती तटबंदी बांधलेली असुन विहिरीत जाण्याकरिता या तटबंदीत वाड्याच्या दिशेने एक दरवाजा बांधलेला आहे. याशिवाय बालेकिल्ल्याच्या तटबंदीत असलेल्या एका लहान दरवाजातुन या विहिरीकडे जाता येते. वाड्यात न जाता परस्पर बाहेरून पाणी नेण्यासाठी हि सोय केली असावी. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण भुईकोट फिरण्यास एक तास पुरेसा होतो. या शिवाय किल्ल्याबाहेर वेतोबाचे लहान मंदिर असुन त्यासमोर कोरीकाम केलेल्या चौथऱ्यावर उभारलेली सुंदर अशी दगडी दिपमाळ पहायला मिळते. स्थानिक लोककथानुसार हा किल्ला आदिलशहाच्या काळात महिपतराव घोरपडे यांनी बांधुन बहादुरबिंडा हे गाव वसवले पण पुढे या गावाचे नाव बहादुरवाडी झाले तर गॅझेटमधील नोंदीनुसार हा भुईकोट माधवराव पेशव्यांनी बांधला. माधवराव पेशवे गणेशभक्त असल्याने कोटाच्या महादरवाजावरील गणपतीची मुर्ती पहाता हा भुईकोट माधवराव पेशवे यांनी बांधला हे जास्त संयुक्तिक वाटते. मराठा साम्राज्याचे सातारा गादी व कोल्हापुर गादी असे दोन पडल्यावर वारणा नदी हि या साम्राज्याची सीमा ठरविण्यात आली. कोल्हापुरकर भोसलेंच्या आक्रमणापासुन हि सीमा संरक्षित करण्यासाठी माधवराव पेशव्यांनी सीमेवर म्हणजे वारणा नदीकाठी दुहेरी तटबंदी व खंदकांनी वेढलेला भक्कम असा बहादुरवाडी भुईकोट बांधला आणि तो मिरजेच्या पटवर्धनांच्या ताब्यात दिला. पटवर्धनांनी मुधोळकर रामचंद्रराव महिपतराव घोरपडे यांची तेथे नेमणुक केली. हा भुईकोट कोल्हापुर राज्याच्या खुपच जवळ असल्याने करवीर रियासतीच्या दफ्तरात करवीर छत्रपतींनी बहादुरगड पाडून टाकण्याची आज्ञा दिल्याची नोंद आढळते. मराठा साम्राज्य लयाला गेल्यावर इतर अनेक किल्ल्याप्रमाणे हा किल्ला देखील ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar