फिरंगकोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : ६० फुट

श्रेणी : सोपी

प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवलेकोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हास खाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगकोट, कांबेकोट हे छोटे कोट बांधले गेले. कामवारी नदीच्या काठावरील एका छोट्या टेकडीवर फिरंगकोट बांधला गेला. वसई खाडी व कामवारी नदीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. फिरंगकोटास जाण्यासाठी वसई-चिंचोटी-अंजूरफाटा-भिवंडी मार्गावरुन खारबाव गावात यावे. खारबाव किल्ला पाहुन फिरंग कोटास जाता येते. फिरंग कोटास जाण्यास खारबाव गावातूनच फाटा फुटतो. फिरंगकोट खारबाव पासून २.५ कि.मी.वर आहे. या मार्गाने फिरंगपाडा गावात जाताना एक कमान व वीटभट्टी लागते. ... या कमानीतून गावात न जाता समोर त्याच मुख्य रस्त्याच्या बाजुस दोन बंगले आहेत व एक छोटीशी टेकडी आहे. ६० फुट उंचीच्या या लहानशा झाडीभरल्या टेकडीवर फिरंगकोट वसलेला असुन या कोटाविषयी स्थानिकांना किल्ला म्हणुन काहीही माहित नाही. तिथे जाण्यापूर्वी या कोटाची पुर्ण माहिती घेऊनच जावे. टेकडी चढण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. या भागात वीटभट्टीच्या धंद्याने जोर धरल्याने टेकडीवर मातीसाठी खूप मोठया प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. टेकडीवर चढताच कोटाचे अवशेष नजरेस पडतात. कोटाच्या सर्व भिंतीवर झाडांनी आपले साम्राज्य पसरवले आहे. या विभागातील इतर पोर्तुगीज वास्तुंशी तुलनात्मकदृष्टया विचार करता फिरंगकोटाचे बरेचसे अवशेष शिल्लक आहेत. फिरंग कोटाचा आकार साधारणपणे चौकोनी असुन आज केवळ इमारतीची तीन बाजुची भिंत व काही चौथरे शिल्लक आहेत. भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड,चिकटमाती, चुना यांचा वापर केला गेलेला दिसतो. कोटाच्या तटबंदीत संरक्षणाच्या रचना आढळून येतात. उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ तसेच या कोटाचे आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीज कालीन प्रशासकीय कार्यालय तसेच जकातीचे व टेहळणीचे ठाणे म्हणुन केला गेला असावा. कोट छोटेखानी असून पंधरा मिनिटात पाहून होतो. आज जरी किल्ला पुर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि कामवारी नदीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. ३ एप्रिल१७३९ मध्ये मराठयांनी काम्ब्याच्या पश्चिमेचे फिरंगपाड्याचे ठाणे जिंकले अशी नोंद आढळते. यावेळी फिरंगकोटाचा किल्लेदार सैन्यासकट मराठयांचा कैदी झाला. डयनवेर्सेच्या नोंदीप्रमाणे फिरंगीपाड्याचे ठाणे जोरात लढले पण कप्तान पळुन गेल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली. इ.स. १७३९च्या या वसई मोहिमेत खारबाव, कांबे, फिरंगीपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!