प्रतापगड-गोंदिया

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : गोंदीया

उंची : १७७० फुट

श्रेणी : मध्यम

प्रतापगड म्हटले कि आपल्याला आठवतो तो महाबळेश्वर येथील प्रतापगड. पण या प्रतापगड शिवाय अजून एक प्रतापगड विदर्भाच्या दाट जंगलात लपलाय व लोकांना तो आजही अपरिचित आहे. गोंदीया जिल्ह्यात असलेला सुंदर व प्रचंड विस्ताराचा गिरीदुर्ग असेच या किल्ल्याचे वर्णन करता येईल. किल्यावर व किल्ल्याच्या परीसरात असलेले घनदाट जंगल पहाता या किल्ल्याला केवळ गिरीदुर्गच नाही तर वनदुर्ग देखील म्हणता येईल. गोंदीया जिल्ह्यात भटकंतीसाठी गेले असता आवर्जुन पहावा असाच हा किल्ला आहे. गोंदीया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल हा दुर्ग गोंदीया शहरापासुन ६८ कि.मी. तर भंडारा येथुन नवेगाव मार्गे ९० कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव प्रतापगड या किल्ल्याच्या नावानेच ओळखले जाते. अर्जुनी मोरगाव ते प्रतापगड गाव हे अंतर साधारण १२ कि.मी.आहे. किल्ल्यासभोवतीच्या या जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वले असल्याने योग्य ती काळजी घेऊन या किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे. विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. किल्ल्यासभोवतीच्या या जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वले असल्याने योग्य ती काळजी घेऊन या किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे. ... नवेगावच्या अभयारण्यामधून दक्षिणेकडे गेलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला वसलेला आहे. त्रिकोणी आकाराचा गडमाथा साधारण ४५ एकरवर पसरलेला असुन संपुर्ण किल्ल्याचा परिसर हा ५५ एकरपेक्षा जास्त आहे. प्रतापगड गावाच्या वरील बाजुस जंगलात एक दर्गा असुन या दर्ग्याजवळच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. प्रतापगड गावातुन दर्ग्याकडे जाण्यसाठी रस्ता जेथे वळतो त्या वळणावर १५ फुट उंचीचा गरुडस्तंभ पहायला मिळतो. या स्तंभाच्या एका बाजुस सात याप्रमाणे चारही बाजुस २८ देवतांची शिल्प कोरलेली आहेत. स्तंभाच्या तळाशी चारही बाजुस कमळे कोरलेली असुन वरील बाजुस गजमुख कोरलेले आहे. स्तंभाच्या रक्षणासाठी त्यावर आता कोन्क्रीटचा निवारा उभारलेला आहे. या रस्त्याने खाजगी वाहनाने थेट या दर्ग्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने येथुन पुरेसे पिण्याचे पाणी सोबत घेऊनच किल्ला चढण्यास सुरवात करावी. किल्यावर जाणारी वाट मळलेली असली तरी जंगलात अस्ताव्यस्त पसरलेल्या या किल्ल्यातील अवशेष व्यवस्थित पहाण्यासाठी सोबत स्थानिक वाटाड्या असणे गरजेचे आहे. घेरा ,माची व बालेकिल्ला असे किल्ल्याचे तीन भाग पडले असुन पश्चिम,दक्षिण व उत्तर अशा तीन दिशांनी किल्ल्यावर येण्यासाठी मार्ग आहेत. यातील केवळ उत्तरेकडून किल्ल्यावर जाणारा मार्ग सध्या वापरात असुन उरलेले दोन मार्ग काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. दर्ग्याकडून किल्ला चढायला सुरवात केल्यावर डाव्या बाजुस वरील डोंगरापासून खाली पठारावरील दर्ग्यापर्यंत आलेली रचीव दगडाची तटबंदी दिसते. मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या या तटबंदीची उंची १०-१२ फुट असुन रुंदी ५-६ फुट आहे. अशा प्रकारची डोंगराखाली उतरत येणारी गडाची तटबंदी डोंगराच्या तीनही बाजुस पहायला मिळते. यातील बहुतांशी तटबंदीची आता काही भागात पडझड झालेली आहे. दर्ग्यापासुन चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. हा चढ चढताना डाव्या बाजुस काही ठिकाणी किल्ल्याची तटबंदी आपली सोबत करत असते. या तटबंदीला लागून एका ठिकाणी वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. वाट डोंगराला भिडल्यावर किल्ल्याच्या वरील भागात जाण्यासाठी उजवीकडे वळते. झाडीने भरलेल्या या वाटेवर झाडाच्या फांद्या बाजुला करतच वाट काढावी लागते. वाट जेथे उजवीकडे वळते तेथे कड्याला बिलगुन एक वाट वर चढताना दिसते. हि वाट किल्ल्यावर जाणारी नसली तरी या वाटेने थोडे वर चढुन गेले असता डोंगर पोखरत आत लांबवर गेलेली गुहा पहायला मिळते. या गुहेत अस्वलासारख्या वन्यप्राण्यांचा वावर असल्याने आत जाणे टाळावे. गुहा पाहुन झाल्यावर आल्या वाटेने पुन्हा खाली उतरावे व उजवीकडील वाटेने आपली पुढील वाटचाल सुरु करावी. डोंगरकडा डावीकडे ठेवत साधारण १५ मिनिटांत आपण गडाच्या तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश करतो. य ठिकाणी गडाची तटबंदी २०-२२ फुट उंच असली तरी यात मारगीरीच्या जागा दिसुन येत नाही. वळणदार तटबंदीतुन जाणारा हा मार्ग आपल्याला डोंगराच्या टोकावर घेऊन येतो. हि तटबंदी म्हणजे माचीचा भाग असून तो रचिव तटबंदीने बंदीस्त करण्यात आला आहे. माचीच्या या टोकावरील नैसर्गिक खडकावर दगडी बांधकाम केलेला एक बुरुज असुन या बुरुजावर नव्याने बांधलेली कबर आहे. या कबरीवर काही झेंडे लावलेले आहेत. या बुरुजावर चढले असता दोन बाजुंनी खाली उतरत गेलेली गडाची तटबंदी पहायला मिळते. गडाचा हा भाग पुर्णपणे तटबंदीने बंदीस्त केलेला असुन येथून एक वाट किल्ल्याच्या मागील बाजुस असलेल्या मोठ्या माचीवर जाते. या माचीवर घनदाट जंगल असुन त्यात धोकादायक अस्वलांचा वावर असल्याने वाटाडे तेथे नेण्यास तयार होत नाहीत. आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून पुर्वेकडील माचीप्रमाणे उतारावर तटबंदी बांधून ती तटबंदीने बंदीस्त करण्यात आली आहे. या जंगलात पाण्याचा एक तलाव व काही घरांचे अवशेष असल्याचे वाटाडे सांगतात. बुरुजाच्या डाव्या बाजूने गडावर जाणारी पायवाट असुन त्यावर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या वाटेने थोडे पुढे आल्यावर दोन बुरुजात बांधलेल्या उध्वस्त दरवाजाने आपण गडाच्या वरील भागात म्हणजे माचीवर प्रवेश करतो. माचीवर प्रवेश केल्यावर उजवीकडील बुरुजावरून मोठमोठ्या दगडाचा वापर करून बांधलेली गडाची तटबंदी व त्यावरील चर्या नजरेस पडतात. गडाचा हा भाग पाहुन सरळ पुढे आल्यावर आपण एका उंचवट्यावर पोहोचतो. या उंचवट्यावर पोहोचल्यावर गडाचा पुढील भाग असलेली उंच टेकडी व त्यावरील बालेकिल्ला तसेच काही वास्तु अवशेष नजरेस पडतात. आपण आलो तो उंचवटा व पुढील भागातील टेकडी या मधील दरीत चारही बाजुस विटांचा वापर करून भिंत उभारली असुन प्रचंड मोठ्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. हा तलाव तीन भागात विभागलेला असुन सध्या कोरडा पडलेला आहे. तलाव पाहुन झाल्यावर आलेल्या उंचवट्यावरून आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. डोंगराच्या काठावरून म्हणजेच तटबंदीवरून जाणारी हि वाट पूर्ण तटबंदीला वळसा घालत आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या टेकडीवर घेऊन जाते. या वाटेने जाताना आपल्याला सर्वप्रथम ध्वजस्तंभाची जागा व त्यापुढे एक कपारीवजा नेढे पहायला मिळते. स्थानिक लोक या नेढ्यास पापपुण्याचे नेढे म्हणुन ओळखतात. त्यातून जो आरपार होतो त्यानं पाप केले नाही अशी स्थानिकांची धारणा आहे. नेढे पाहुन पुढे बालेकिल्ल्याकडे जाताना उजव्या बाजुस उतारावर छप्पर नसलेल्या दगडी बांधकामातील दोन वास्तु पहायला मिळतात. या वास्तु पाहुन आपण पुढील उंचवट्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याची चुनाविरहीत तटबंदी आजही सुस्थितीत असुन त्यावरून संपुर्ण तटाला फेरी मारता येते. बालेकिल्ल्याच्या उत्तर बाजुस कमान नसलेला मुख्य दरवाजा असुन दक्षिण बाजुस लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या आत काही वास्तुंचे चौथरे असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. येथुन गडाच्या पश्चिम भागात उतारावर असलेली तटबंदी व आसपासचे घनदाट जंगल यांचे सुंदर दर्शन घडते. पश्चिम भागात उतारावर गडाची तटबंदी व वास्तुअवशेष दिसत असले तरी वाटाडे अस्वलांच्या भितीने तेथे नेत नाहीत. बालेकिल्ला हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असुन या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासुन उंची १७७० फुट आहे. दुर्गदर्शन करत दर्ग्यापासून येथवर येण्यास साधारण अडीच तास लागतात. येथुन आल्या वाटेने मागे फिरून दर्ग्याकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरून परत येण्यासाठी साधारण चार तास लागतात. आजवर टिकून असलेले किल्ल्याचे चुना विरहीत बांधकाम हे या किल्ल्याचे वैशिष्टच म्हणावे लागेल. गोंदीया-गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या इतर अनेक वनदुर्गांप्रमाणे या किल्ल्याचे देखील संदर्भ वा माहिती उपलब्ध नाही. विदर्भातील हा किल्ला फारसा परीचीत नसल्याने किल्ल्याचा इतिहास अबोल आहे पण किल्ल्याचे एकुण बांधकाम व गोंड राजसत्तेचा या भागावर असलेला प्रभाव पहाता हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा असे वाटते. गौंड राजांच्या अखत्यारीतील हा किल्ला आज आपली ओळख व इतिहास हरवुन बसला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!