प्रचीतगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : २२४० फुट
श्रेणी : कठीण
सह्याद्रीतील काही किल्ले मुळातच दुर्गम असुन सध्या होत असलेल्या भौगोलिक बदलांमुळे ते अधिकाधिक दुर्गम होत चालले आहेत. या सर्वांचा मुकुटमणी शोभेल असा दुर्गम दुर्ग म्हणजे रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला प्रचितगड. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या या गडावर जाण्यासाठी काही वर्षापर्यंत घाटावरील पाथरपुंज, चांदोली मार्गे वाटा होत्या पण आता हा भाग कोयना व चांदोली व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येत असल्याने येथुन प्रवेशबंदी आहे. आत जाण्याची परवानगी मिळाली तरी येथे मुक्कामास बंदी असल्याने एकाच दिवसात परत यावे लागते व हे सहजपणे शक्य होत नाही. त्यामुळे या मार्गाने गडावर न गेलेले बरे. आता गडावर जाण्याचा एकमेव मार्ग गडाच्या कोकण पायथ्याशी असलेल्या शृंगारपूर गावातुन आहे. शृंगारपूर गावात जाण्यासाठी आपल्याला मुंबई गोवा महामार्गावर असलेले कसबा संगमेश्वर गाठावे लागते.
...
मुंबईहुन हे अंतर साधारण ३०० कि.मी. आहे. कसबा संगमेश्वर येथुन शृंगारपूरला जाणारा फाटा असुन या रस्त्याने कळंबस्ते-नायरीमार्गे १७ कि.मी.वरील शृंगारपूर गावात जाता येते. गावात प्रवेश करतानाच गावामागे पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत दक्षिणोत्तर पसरलेला प्रचीतगडचा डोंगर दिसतो. शृंगारपूर गावातुन प्रचीतगडावर जाण्यासाठी आपल्याला तब्बल २५०० फुट उंच चढाई करावी लागते. प्रचीतगडची चढाई उतराई करण्यासाठी लागणारा ७ तासाचा अवधी व गडदर्शनास लागणारा १ तास गृहीत धरता गड पहाण्यासाठी ८ तास लागतात. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी लवकरच गड चढण्यास सुरवात करावी. यासाठी शक्यतो आदल्या दिवशी रात्री गावात मुक्काम करावा. गावातील काही घरात जेवणाची तसेच शाळेत व मंदिरात रहायची सोय होते. गडावर पोहोचेपर्यंत वाटेत कोठेही पाणी नसल्याने गावातुन पुरेसे पाणी सोबत भरून घ्यावे. गडावरील टाक्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर उपलब्ध असते. गड चढताना असलेला उभा चढ व मुरमाड वाट लक्षात ठेवुन कमीतकमी सामान सोबत ठेवावे. किल्ल्यावर जाताना काही अडचणीच्या ठिकाणी लहानमोठया सहा शिडया लावलेल्या आहेत. गावातील सिमेंटच्या रस्त्याने आपण वस्तीबाहेर ओढयाकाठी असलेल्या स्मशान भुमीकडे येतो. येथुन ओढयाच्या डावीकडील बाजूने पायवाट लागते. या पायवाटेने अर्धा तास चालल्यानंतर आपण सुरवातीस पाहिलेला ओढा आडवा येतो. हा ओढा पार करून आपण दाट जंगल असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी येतो व इथुन खरी गडावर जाणारी पायवाट सुरु होते. या वाटेवर येईपर्यंत आपण आलेल्या पायवाटेला अनेक ढोरवाटा असल्याने इथवर वाटाड्याची गरज आहे. इथुन पुढे मात्र एकच वाट गडाच्या दिशेने जाते. जंगलातील या वाटेवर काही ठिकाणी मार्गदर्शक खुणा केलेल्या आहेत. दाट जंगलातुन जाणाऱ्या या वाटेने साधारण तासाभरात आपण डोंगराच्या पठारावर पोहोचतो व इथुन गडाची तटबंदी दिसायला सुरवात होते. आपण वर आलो ते पठार गडाच्या दक्षिण बाजुस असुन गडमाथ्यावर जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकावर आहे. येथुन साधारण तासाभराचा उभा चढ चढत आपण गडाच्या डोंगराखाली असलेल्या कातळाला बिलगतो. या चढावर आपल्याला लहानमोठया अशा सहा लोखंडी शिडया लागतात. येथुन डोंगराचा कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत आपली गडाच्या उत्तर दिशेने वाटचाल सुरु होते. वाटेत एका धबधब्याच्या कातळात गडावर जाताना झालेल्या अपघातात मरण पावलेल्या दुर्गप्रेमीची स्मृती शिळा बसवलेली आहे. गडाच्या उत्तर टोकाच्या भागातील वाट म्हणजे घसारा असलेला उभा चढ आहे. येथुन खूप सांभाळून चढावे व उतरावे लागते. गडाच्या या डोंगराला वळसा मारण्यासाठी साधारण पाउण तास लागतो. गडाचे उत्तर टोक शेजारील डोंगरापासून २००-२५० फुटाच्या दरीने वेगळे झाले आहे. अभयारण्यातुन आल्यास या डोंगरावरून खाली दरीत उतरावे लागते. गडाच्या उत्तर टोकावर असलेल्या दरवाजाखालील पायऱ्या नष्ट झाल्याने या ठिकाणी साधारण २५-३० फुट उंचीची शिडी लावलेली आहे. हि शिडी लावून बराच काळ लोटल्याने शिडीची अवस्था फारशी चांगली नाही. शिडीचा कठडा व काही पायऱ्या गंजल्याने तुटलेल्या असुन एकाच ठिकाणावर जास्त जोर न देता सावधगिरीने शिडी चढावी. शिडी चढुन गेल्यावर कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढुन आपण गडाच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. गडाचा दरवाजा उभ्या कडयावर असुन दरवाजाची दगडी चौकट व शेजारील बुरुज आजही सुस्थितीत आहे पण वरील कमान मात्र ढासळलेली आहे. गडावर प्रवेश केल्यावर समोरच हिरव्यागार पाण्याने भरलेले पाण्याचे टाके आहे. टाक्याचा तळभाग कातळात कोरलेला असुन वरील भाग घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस गडाच्या उत्तर टोकावरील नाकाडावर बांधलेला मोठा बुरुज आहे. या बुरुजावरून समोरच्या पठारावरून येणारी वाट तसेच खिंडीतील वाटेवर लक्ष ठेवता येते. बुरुजाचा बराच भाग दगडमातीने झाकला असुन त्यावर कारवी वाढलेली आहे. बुरुजाच्या बांधकामात दोन कमानी असुन बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. हा बुरूज पाहून परत टाक्याजवळ आल्यावर एक वाट वर चढत जाते तर एक अस्पष्ट वाट तटाला लागुन डाव्या बाजुला असलेल्या कारवीच्या झाडीत शिरते. डावीकडील वाटेने कारवीच्या रानातुन वाट काढत थोडे पुढे गेल्यावर तटाला लागुन असलेले एक खांबटाके पहायला मिळते. टाक्यात पाणी असुन टाक्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात माती जमा झाल्याने टाक्याचे तोंड बुजत चालले आहे. टाक्याशेजारी दरीच्या काठावर असलेली गडाची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. टाके पाहुन मागे फिरावे व मुळ वाटेवरून आपल्या गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने थोडासा चढ चढुन आपण गडावरील सर्वात उंच भागात असलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी येतो. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची २५७५ फुट असुन गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला दिसुन येतो. पत्र्याच्या निवाऱ्याखाली असलेल्या या देवळात भवानी देवीची एक व भैरवाच्या दोन मुर्ती असुन या सर्व मुर्तींची झीज झालेली आहे. मंदिरापुढे लहान दीपमाळ असुन या दिपमाळेला लागुन एक घडीव मुर्ती ठेवलेली आहे. मंदीर परीसरात लहानमोठया ५ तोफा पहायला मिळतात. मंदीराच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात कारवी वाढली असुन त्यात अनेक वास्तुंचे चौथरे लपलेले आहेत. या कारवीच्या रानातुन पुढे गेल्यावर डावीकडे उतरणारी वाट लागते. पायऱ्यांच्या या वाटेने खाली उतरल्यावर उजव्या बाजुस तीन तर डाव्या बाजुस दोन अशी कातळात खोदलेली ५ भुमीगत टाकी आहेत. यातील उजवीकडील एका खांबटाक्याचे तोंड घडीव दगडात बांधलेले असुन आत उतरण्यासाठी कातळात पायऱ्या कोरल्या आहेत. उजवीकडील तीन टाकी अंतर्गत भागात एकमेकांना जोडलेली असुन या सर्व टाक्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे. डावीकडील एक टाके खोल असुन दुसरे टाके खोदण्याची केवळ सुरवात केलेली आहे. उतारावरून वाहुन येणारी माती या टाक्यात जाऊ नये यासाठी टाक्याच्या वरील बाजुस दगडी भिंत बांधलेली आहे. येथुन पुढे जाताना दरीच्या काठावर असलेली गडाची वळणदार तटबंदी व त्यातील बुरुज पहायला मिळतात. संपुर्ण गडाचा परिसर साधारण ४-५ एकर असुन गडाच्या या भागातील थोडीफार सपाटी वगळता इतर कोठेही सपाटी दिसुन येत नाही. या भागात उंबराचे मोठे झाड असुन सावलीसाठी गडावरील हि एकमेव सोय आहे. आपला जेवणाचा कार्यक्रम असल्यास येथेच उरकून घ्यावा. येथुन गडाच्या दक्षिण भागात जाताना लहानसा उंचवटा असुन या उंचवट्यावर एक उध्वस्त चौथरा पहायला मिळतो. चौथऱ्याच्या उजवीकडे तटबंदी शेजारी कातळात कोरलेले पाण्याचे मोठे टाके आहे पण यातील पाणी शेवाळलेले आहे. येथे समोरच आजही भिंती शिल्लक असलेली गडावरील मोठी वास्तु आहे. हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. वाडयाच्या मागील बाजुस एक उध्वस्त चौथरा असुन त्या शेजारी मातीने बुजलेले एक टाके आहे. येथुन गडाच्या दक्षिण टोकाकडे जाताना गडाची तटबंदी व फांजी पहायला मिळते. गडाच्या दक्षिण टोकावरील काही भाग बुरुजाप्रमाणे तासण्यात आला आहे. या ठिकाणी पश्चिम बाजुला कातळात कोरलेली दोन लहान टाकी पहायला मिळतात. हि टाकी बहुदा बांधकामाच्या दगडांसाठी कोरली असावीत कारण यातील एका टाक्यात अर्धवट काढलेले दोन चिरे पहायला मिळतात. गडावरून चांदोली अभयारण्य तसेच कोकणातील दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. येथुन आल्या वाटेने परत दरवाजापाशी पोहोचल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासात उचितगड, प्रचितगड अशा नावाने ओळखला जाणारा हा गड कोकणातून घाटावर जाणाऱ्या तिवरे घाट व रेडे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला. गड नेमका कोणी बांधला याबाबत इतिहासात नोंद नसली तरी गडावरील कोरीव खांबटाकी पहाता याची निर्मीती शिवपुर्व काळातील असावी. प्रचीतगडचा इतिहास सुरु होतो तो गडपायथ्याशी असलेल्या शृंगारपुरच्या सुर्वे घराण्यापासुन. संपुर्ण महाराष्ट्र यवनी सत्तांनी पादांक्रात केला असला तरी कोकणातील काही लहान राज्य त्यांचे स्वतंत्र अस्तीत्व टिकवून होती. शृंगारपुरचे सुर्वे घराणे यापैकी एक होते. यासाठी त्यांना प्रचीतगडचा नक्कीच आधार असावा. बहमणी सरदार मलिक उत्तुजार या भागातील राज्य बुडविण्यासाठी आला असता सुर्व्यांनी गोडीगुलाबीचे धोरण स्वीकारत त्याला विशाळगडच्या पायथ्याशी नेले व मोरे-सुर्वे एकत्र येऊन त्याचे संपुर्ण सैन्य कापून काढले. या नंतरच्या काळात सुर्वे आदिलशहाचे सरदार बनले. कारतलबखानाच्या पराभवानंतर महाराज कोकणात उतरले. यावेळी मंडणगड किल्ला पालवणच्या जसवंतराव दळवींच्या ताब्यात होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच दळवी मंडणगड सोडून शृंगारपूरला सुर्व्यांच्या आश्रयास आले. शिवाजी महाराजांनी सुर्व्यांस समजावले तरी सुर्वे ऐकेनात तेव्हा महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला करून २९ एप्रिल १६६० ला शृंगारपुर ताब्यात घेतले. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी शृंगारपुरच्या बाजुने चाल करुन प्रचितगड ताब्यात घेतला. त्यावेळी सुर्व्यांचे कारभारी पिलाजी शिर्के स्वराज्यात सामिल झाले. या परीसरातील खराब झालेल्या घाटवाटांची दुरुस्ती व जबाबदारी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. पुढे इ.स.१६६४-६५ दरम्यान पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी शिर्के यांच्याशी झाला. दक्षिणेच्या मोहिमेवर जाताना महाराजांनी संभाजीराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. १ नोव्हेंबर १६७६ रोजी संभाजीराजे शृंगारपुरास आले. संभाजी महाराजांचे या गावात जवळपास २ वर्ष वास्तव्य होते. शृंगारपूरच्या या मुक्कामात त्यांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याच काळात त्यांचा कलशाभिषेक, कन्या भवानीबाई यांचा जन्म अशा महत्वाच्या गोष्टी येथे घडल्या. या काळात ते प्रचितगडवर नक्कीच गेले असावे. मुकर्रबखानाने संगमेश्वरला संभाजी राजाना पकडून मळे घाटाने कराड-वडूज मार्गे पेडगावला नेले या गोष्टीचा प्रचीतगड मुक साक्षीदार आहे. पुढे १७१०-१२ मधील छत्रपती शाहुमहाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो. पेशवाईच्या अखेरच्या पर्वात १० जुन १८१८ रोजी कनिंगहॅम याने किल्लेदार चतुरसिंह याच्याकडून प्रचितगडाचा ताबा घेतला. या लढाईत गडाचा दरवाजा व पायऱ्या नष्ट झाल्या.
टीप- पावसाळा व नंतरचे २ महीने या किल्ल्यावर जाऊ नये तसेच भर उन्हाळ्यात किल्ल्यास भेट देणे टाळावे. नवख्या भटक्यांनी सोबत अनुभवी व्यक्ती असल्याशिवाय गडावर जाऊ नये.
© Suresh Nimbalkar