पेरजागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : चंद्रपूर

उंची : १५७५ फुट

श्रेणी : मध्यम

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात असलेला पेरजागड हा डोंगर आसपासच्या परिसरातच नव्हे तर चिमुर तालुक्यात देखील पर्यटनस्थळ म्हणुन चांगलाच प्रसिद्ध आहे. उन्हाळा वगळता इतर सर्व ऋतुत या डोंगरावर पर्यटकांचा तसेच भाविकांचा बऱ्यापैकी राबता असतो.या परीसरात हा डोंगर सात बहिणीचा डोंगर म्हणुन ओळखला जात असुन त्यांची या डोंगरावर मुर्ती म्हणुन स्थापना केलेली आहे. किल्ला म्हणुन या डोंगराची या परीसरात कोणतीही ओळख नाही. विदर्भातील किल्ल्यांच्या नोंदी घेणारे माझे दुर्ग अभ्यासक मित्र गणेश बनसोडे यांनी या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष असल्याचे सांगितले व गडचिरोली भेटीत आमची पाउले या डोंगराकडे वळली. पेरजागड किल्ला चंद्रपूर जिल्ह्यापासून १२७ कि.मी.अंतरावर असुन चिमुर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २७ कि.मी. अंतरावर आहे. गडचिरोली ते पेरजागड हे अंतर साधारण ८४ कि.मी.आहे. चिमूर- तळोधी रस्त्यावरील सोनापूर हे पेरजागड किल्ल्याच्या पायथ्याचे ठिकाण असुन तेथुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी ३ कि.मी. कच्चा रस्ता आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास हे अंतर गाडीने अन्यथा पायगाडीने पार करावे लागते. ... या भागात प्रवासाची सार्वजनिक वाहने सहजपणे उपलब्ध नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. पेरजागड व त्याचा परीसर घोडाझरी अभयारण्या अंतर्गत येत असल्याने तेथे वनकर्मचारी तैनात असतात. त्यामुळे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या मर्यादित वेळेतच गडावर प्रवेश दिला जातो. कच्चा रस्ता जेथे संपतो तेथे एक कमान उभारलेली असुन या कमानी खालुन जाणारी पायऱ्यांची वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. सुरवातीला बांधलेल्या काही पायऱ्या वगळता हि संपुर्ण वाट दगडांची व उभी चढण असलेली आहे. या वाटेने साधारण १० मिनिटे वर चढल्यावर भग्न गणेशमुर्ती असुन येथुन तुटलेल्या तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. हा गडाच्या माचीचा भाग असुन हि तटबंदी दोन्ही बाजूस लांबवर पसरलेली आहे. तटबंदीवर व तटबंदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने तटबंदीवर जास्त दूर जाता येत नाही. हि तटबंदी रचीव दगडांनी बांधलेली असुन ५-६ फुट रुंद व ८-१० फुट उंच आहे. माचीच्या खालील भागात हि तटबंदी एका सरळ रेषेत रचलेली असुन नंतर ती गडाच्या दिशेला वर बांधत नेली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने या तटबंदीत असलेला दरवाजा नेमका कुठे आहे ते पहाता येत नाही. वर चढत जाणारी वाट आपल्याला थेट सुळक्याच्या पायथ्याशी घेऊन जाते. येथे सुळक्याच्या पोटात पाण्याचे टाके कोरलेले असुन ते सध्या पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. येथे सुळक्याला वळसा मारून मागील बाजूस जाण्यासाठी वाट आहे. या वाटेवर डोंगराला लागुन बांधलेला एक उध्वस्त बुरुज पहायला मिळतो. येथुन दरीच्या काठाने जाणारी वाट आपल्याला सुळक्याच्या मागील बाजूस घेऊन जाते. या वाटेची एकुण रचना पाहता या वाटेवर पुर्वी दरवाजा असावा असे वाटते. येथुन सुळक्यावर जाणारी वाट काही ठिकाणी धोकादायक असली तरी वनखात्याने लोखंडी कठडे बांधुन संरक्षित केली आहे. या वाटेने अर्धा सुळका चढुन वर आल्यावर एका कपारीत मुक्ताई, अबांई, निबांई, भिवराई, पवराई, उमाई, गवराई या सात देवतांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. यातील मुक्ताई ही माना जमातीची दैवत मानली जाते. येथुन पुढे शिखराला जागोजागी वळसा घालतच आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडाच्या माथ्यावर जाणारी शेवटच्या टप्प्यातील वाट हि अतिशय निमुळती असुन पुर्णपणे दगडात कोरलेली आहे. या वाटेवर पायऱ्या बांधलेल्या असुन एका वेळेस केवळ एकच माणुस या वाटेने ये-जा करू शकतो. गडाचा माथा फारसा मोठा नसुन गडमाथ्यावर आपल्याला पाण्याची दोन लहान टाकी व महादेवाचे मंदीर पहायला मिळते. पायथ्यापासुन गडावर येण्यासाठी एक तास तर गडमाथा फिरण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. पेरजागडचा माथा समुद्रसपाटीपासुन १५७५ फुट उंचावर असल्याने गडमाथ्यावरून खुप दूरवरचा परिसर नजरेस पडतो व या भागात पसरलेल्या घनदाट जंगलाची कल्पना येते. पेरजागड किल्ला म्हणुन परीचीत नसल्याने या गडाचा इतिहास देखील त्याच्या प्रमाणेच अपरिचित आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!