पेडका

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : औरंगाबाद

उंची : ३००० फुट

श्रेणी : मध्यम

औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे प्रसिद्ध किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या दक्षिण दिशेला असलेला पेडका हा असाच एक अपरीचीत किल्ला. पेडका किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला पेडकावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई-पुण्याहुन येथे जाताना मनमाड-नांदगावमार्गे जाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मनमाड जेहुर हे अंतर ६८ कि.मी. असुन मनमाड-नांदगाव-जातेगाव–बोलठाण–जेहुर या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर ७० कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-चापनेर मार्गे जेहुर येथे येण्यास ३ तास लागतात. ... जेहुर ते पेडकावाडी हे अंतर ५ कि.मी.असुन पेडकावाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी जेहूर गावापासुन ३ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगाआश्रमापासून तेथे जाणे सोयीचे आहे. या वाटेने कमी वेळात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो. वाहनांची सोय केवळ जेहुरपर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास जेहुर ते गंगाआश्रम / पेडकावाडी हे अंतर पायी कापावे लागते. गंगाश्रमाकडे पोहोचल्यावर समोर दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगराच्या टोकावरील पेडका किल्ला आपले लक्ष वेधुन घेत. आश्रमासमोर असलेला उभा चढ चढुन आपण थेट पठारावर दाखल होतो. या पठाराची उंची तीन भागात विभागलेली असुन येथुन मळलेल्या पायवाटेने एक तासात आपण किल्ल्याच्या दोन सोंडेमध्ये असलेल्या घळीखाली पोहोचतो. किल्ल्याच्या या वाटेवर मोठया प्रमाणात स्फटिकाचे दगड दिसुन येतात. येथे येणाऱ्या गुराख्यांनी हे दगड जमा करून त्यांची या ठिकाणी मानवाकृर्ती बनवलेली आहे. पेडका वाडीतून येणारी वाट देखील याच ठिकाणी येते व येथुन खऱ्या अर्थाने गडचढाईला सुरवात होते. घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट हि डाव्या सोंडेलगत असुन या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या मोठया प्रमाणात उध्वस्त झालेल्या आहेत. या वाटेने शेवटच्या टप्प्यात असलेल्या काही पायऱ्या चढुन किल्ल्याच्या डाव्या सोंडेवरील उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. किल्ल्यावर येण्यासाठी हा एकमेव दरवाजा असुन पायथ्यापासुन किल्ल्यावर येण्यास दिड तास लागतो. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३०१० फुट असुन दक्षिणोत्तर असलेला हा किल्ला १२ एकर परिसरावर दोन भागात पसरलेला आहे. माचीवर फेरी मारताना १-२ चौथरे अवशेष रूपाने दिसुन येतात. माचीवरून किल्ल्याची टेकडी उजवीकडे व दरी डावीकडे ठेऊन गेले असता या वाटेवर आपल्याला पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. यातील पहिले टाके खांबटाके असुन या टाक्याच्या पुढील भागात खुप मोठया प्रमाणात माती साठलेली आहे. किल्ल्यावर केवळ याच खांबटाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. ते पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याच्या कातळभिंतीत कोरलेले २ खांब असलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या पुढील भागात कातळात खोदलेली एक गुहा असुन या गुहेत बांधलेल्या एका चौथऱ्यावर त्रिशुळ, नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. इथुन मागे फिरल्यावर वर चढताना अजुन एक कोरडे टाके असुन या टाक्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. या टाक्याच्या वरील भागात एक देवळी असुन त्यात शेंदूर फसलेले दगड ठेवलेले आहेत. देवळीच्या बाजूने किल्ल्याच्या माथ्यावर चढताना खालील बाजूस किल्ल्याच्या दोन टेकडी मधील भागात एक मोठा तलाव व गुहा दिसते पण तेथे न जाता किल्ल्याचा माथा सर्वप्रथम फिरून घ्यावा. आपण ज्या वाटेने वर चढतो त्याशेजारी डाव्या बाजुला एक उंचवटा दिसुन येतो. हा उंचवटा म्हणजे गाडलेला बुरुज असुन या बुरूजावरून किल्ल्यावर येणाऱ्या वाटेवर तसेच माथ्याखाली असलेल्या संपुर्ण माचीवर नजर ठेवता येते. माथ्याच्या मध्यावर केवळ एका घराचा चौथरा शिल्लक असुन त्यावर एक कबर उभारलेली आहे. या कबरीच्या पुढील भागात एक साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. याशिवाय माथ्यावर इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गडाच्या माथ्यावरून खाली पेडका धरण, पूर्वेला चिवळी महादेवाचा डोंगर तर दक्षिणेला पितळखोरा डोंगररांग व कण्हेरगड दिसतो. गडमाथा फिरून झाल्यावर आधी पाहिलेल्या तलावाच्या दिशेने खाली उतरावे. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर दिसणारी पाणी स्थिरीकरण रचना या किल्ल्यावर देखील पहायला मिळते. किल्ल्याच्या माथ्यावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात न सोडता या तलावाच्या वरील बाजुस २ लहान तलाव बांधुन त्यात सोडले आहे. हे तलाव भरल्यावर यातील पाणी बाहेर पडण्यासाठी या तलावांच्या काठावर खडकात पन्हाळी कोरल्या आहेत. माथ्यावरील पाण्याबरोबर वाहुन येणारा गाळ या लहान तलावात जमा करून वर निवळलेले पाणी हे तलाव भरले कि काठावरील पन्हाळीतून खालील तलावात जाते. यामुळे मुख्य तलावात कमी प्रमाणात गाळ जमा होतो. सध्या या तलावातील गाळ काढला जात नसल्याने हे सर्व तलाव मातीने भरले आहेत. वरील लहान तलावाच्या बाजूस एक प्रशस्त गुहा असुन दोन खांबावर तोललेल्या या गुहेच्या आतील भागात एक दालन आहे. या गुहेत २०-२५ माणसे सहज राहु शकतात. या गुहेशेजारी दोन अर्धवट कोरलेल्या गुहा आहेत. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीला १ तास पुरेसा होतो. किल्ल्यावरील अवशेष व आकार पहाता या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. किल्ल्यावरील पाण्याची टाकी आणि गुहा पहाता किल्ल्याची निर्मिती ६-७ व्या शतकात झाली असावी. देवगिरी या यादवांच्या राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. यादवांचा पराभव झाल्यावर देवगिरीचे महत्व कमी झाल्याने टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले. बादशाहनामा ह्या ग्रंथात मोगल बादशहा शहाजहान याच्या आज्ञेवरून मोगल सरदार सिपहंदरखान याने इ.स.१६३०-३१ मध्ये या भागावर स्वारी करून हा प्रांत ताब्यात घेतल्याचा उल्लेख येतो. खाजगी वाहनाने चाळीसगाव अथवा मनमाडहून राजदेहेर व पेडका हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहुन पाटणादेवी येथे मुक्कामाला जाता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!