पेठवडगाव
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : हिंगोली
उंची : १६२० फुट
श्रेणी : सोपी
मराठवाडयातील हिंगोली जिल्ह्यात एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच गढीकोट असुन यातील एकमेव अवशेष संपन्न किल्ला म्हणजे पेठवडगाव. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने सुस्थितीत राहीले. हिंगोली जिल्ह्यात आपल्याला मध्यम आकाराचे दोन किल्ले व दोन गढी पहायला मिळतात. पेठवडगाव येथे लहानशा टेकडावर असलेला पेठवडगाव त्यापैकी एक. पेठवडगाव गावाबाहेर असलेला हा किल्ला हिंगोली व औंढा नागनाथ या दोन्ही ठिकाणाहुन साधारण ४० कि.मी. अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. पेठवडगाव गावात प्रवेश करताना दुरूनच हि टेकडी व त्यावरील किल्ल्याचे बुरुज नजरेस पडतात. गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या टेकडीची पायथ्यापासून उंची साधारण २०० फुट आहे. टेकडीच्या अर्ध्या पायऱ्या चढुन गेल्यावर किल्ल्याचे बुरुज दिसण्यास सुरवात होते. येथुन काही पायऱ्या चढुन गेल्यावर ताताबाहेर असलेली एक वास्तु नजरेस पडते.
...
हि वास्तु म्हणजे परिसरातील लोकांच्या दिवाणी कामासाठी असलेली सदर असावी. या वास्तुच्या चौथऱ्याखाली एक तळघर आहे.येथुन पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. तटबंदीतुन वळणे घेत किल्ल्यात शिरणाऱ्या या मार्गावरील दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. आयताकृती आकार असलेला हा किल्ला पुर्व-पश्चिम साधारण दिड एकरवर पसरलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच गोलाकार आकाराची मोठी विहीर व त्याला लागुन देवीचे मंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी राचीव दगडाची असल्याने तटाची बरीच पडझड झालेली आहे तरीही तटावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. या फेरीत तटबंदीत एकुण सहा बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या अंतर्गत वास्तुंची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन त्यात दोन तळघरे पहायला मिळतात. याशिवाय तटाला लागुन अजुन दोन कोठारे पहायला मिळतात.या किल्ल्यावर असलेली अजुन एक महत्वाची वास्तु म्हणजे हमामखाना. नंतरच्या काळात या हमामखान्याचे बंदीस्त पाण्याच्या टाक्यात रुपांतर केल्याचे दिसुन येते. किल्ल्यातील विहीर व मंदिर खोलगट भागात बांधलेली असुन या विहिरीत उतरण्यासाठी पायरीमार्ग आहे. पण आता त्याची पडझड झाली असुन विहीर देखील कचऱ्याने भरलेली आहे. या विहिरीचे पाणी उंच भिंत घालुन त्यावर रहाटाने खेचले असुन तेथुन खापरी नळाने किल्ल्यात तसेच हमामखान्याकडे फिरवले आहे. किल्ल्यातील मंदीर देवीचे असले तरी मंदिराच्या आवारातील भग्न नंदी पहाता किल्ल्यावर शिवमंदिर देखील असावे. संपुर्ण किल्ला फिरण्यास पाउण तास पुरेसा होतो. इ.स.१८५७च्या उठावात निजाम व इंग्रजांना जेरीस आणणारे नवसाजी नाईक काही दिवस या किल्याल् वर वास्तयव्य करून होते. याशिवाय किल्ल्याचा कोणताही इतिहास उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar