पिसोळ

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३५१८ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील अनेक शहरांना त्याची स्वतःची अशी खास ओळख आहे. त्यात मुंबई हि मायानगरी, पुणे हे विद्येचे माहेरघर तर नाशिक हे येथील मंदीरासाठी ओळखले जाते. मंदीरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची अजुन एक ओळख आहे आणि ती म्हणजे किल्ल्यांचा प्रांत. संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे ६५ पेक्षा अधिक किल्ले नाशिक जिल्ह्यात आहे. यातील काही किल्ले परीचीत तर बहुतांशी किल्ले अपरिचित आहेत. शिवकाळाचा परीसस्पर्श न लाभल्याने अपरिचित राहिलेला असाच एक गिरीदुर्ग म्हणजे पिसोळ किल्ला. गाळणा डोंगररांगेवर गाळणा किल्ल्याच्या परीघात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासुन १२६ कि.मी.अंतरावर तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३५ कि.मी. अंतरावर आहे. वाडीपिसोळ के पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन खाजगी वाहनाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरापर्यंत जाता येते अन्यथा जायखेडा येथुन ५ कि.मी. पायपीट करावी लागते. वाडीपिसोळ गावाकडे जाताना दुरूनच किल्ल्याचा दोन डोंगरावर पसरलेला माथा व किल्ल्याचा डोंगर उजवीकडील डोंगर सोंडेपासुन वेगळा करण्यासाठी मारण्यात आलेली मोठी खाच नजरेस पडते. पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी जेथे थांबते त्य ठिकाणी वनखात्याने दोन निवारे बांधलेले असुन येथेच एका मोठ्या चौथऱ्यावर मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. ... येथुन किल्ल्याकडे पहिले असता डावीकडे दोन डोंगर एकमेकांशी जोडल्याने तयार झालेली घळ दिसते. या घळीतुन किल्ल्यावर जाणारी वाट असुन घळीच्या वरील बाजुस किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे.या घळीत जाणारी वाट मात्र उजवीकडील डोंगरावरून जाते हे लक्षात ठेऊन आपली चढाई सुरु करावी. मारुतीच्या मागील बाजुस झाडीत शिरणारी वाट हि किल्ल्यावर जाणारी वाट असुन वाट चांगलीच मळलेली आहे. किल्ला चढायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात डावीकडे झाडीत लपलेली एक कबर पहायला मिळते. हि झाडी सोडुन पुढे उघड्यावर आल्यावर एका चौथऱ्यावर असलेली एक घडीव शिळा व त्यासमोर दिवा लावण्यासाठी कोनाडा असलेली गोलाकार शिळा दिसते. या ठिकाणी असलेला दगडी चौथरा पहाता किल्ला नांदता असताना येथे किल्ल्याचे मेट असावे. वाटेने ५ मिनिटे पुढे आल्यावर कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी असुन यातील एका टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. टाक्याकडून सरळ पुढे जाणारी वाट ढोरवाट असुन टाक्याच्या अलीकडे वर चढणारी वाट हि किल्याची वाट असल्याचे लक्षात ठेवावे. वाटेवर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात झाडी असुन तिरकस चढण असल्याने फारसे न थकता अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पहिल्या भग्न दरवाजात पोहोचतो. किल्ल्याचा हा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचा तळपाया व कमानीचा एका बाजुचा चौथरा शिल्लक आहे. या दरवाजाच्या रक्षणासाठी शेजारील टेकडीच्या उतारावर चौकोनी आकाराचा सुटा बुरुज बांधलेला आहे. येथुन सुरु होणारी किल्ल्याची तटबंदी हि घळीच्या तोंडावर एकामागे एक अशी चार स्तरांवर बांधलेली असुन किल्ल्यावर जाण्यासाठी यातुन वक्राकार मार्गाने जावे लागते. घळीत उजव्या बाजूने प्रवेश केल्यावर वळसा मारून आपण घळीच्या डाव्या वाजूस येतो.येथे असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असला तरी तटबंदी शिल्लक आहे. या दरवाजाने आत आल्यावर उजवीकडील बाजुस किल्ल्याचा तिसरा दरवाजा असल्याच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. येथे कड्याला चिटकून एक वाट दरीच्या दिशेने जाते. वाट बऱ्यापैकी कठीण असल्याने नवख्या भटक्यांनी या वाटेला जाऊ नये. या वाटेवर दोन गुहा असुन एका गुहेत पिण्यायोग्य पाणी तर दुसऱ्या गुहेत ५-६ जणांची रहाण्याची सोय होते. या गुहा गडाच्या माथ्यावरून दुरून पहाता येतात. गुहा पाहुन परतल्यावर आपली पुढील गडफेरी सुरु करावी. तिसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर घळीच्या डावीकडील डोंगरात एक लहान व दोन मोठ्या अशा तीन गुहा पहायला मिळतात. यातील एक लहान व एक मोठी गुहा पाण्याने भरलेली असुन तिसऱ्या गुहेत वटवाघुळाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. गुहेच्या तोंडावर झाडी वाढल्याने त्या सहजपणे दिसत नाहीत. या गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा एक वळण घेऊन आपण घळीच्या उजव्या बाजुस असलेल्या किल्ल्याच्या चौथ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजावरील कमान नष्ट झाली असुन केवळ दगडी चौकट व शेजारील तटबंदीतील बुरुज शिल्लक आहेत. या दरवाजातुन थोडे पुढे आल्यावर डावीकडील डोंगरात कातळात खोदलेल्या पाच गुहा दिसतात. यात चार गुहा एका पातळीत खोदलेल्या असुन पाचवी गुहा काहीशी वरील बाजुस व अर्धवट खोदलेली आहे. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. एका गुहेबाहेर दगडी नंदी असुन या गुहेतील टाक्यात शिवलिंग कोरलेले आहे. हे शिवलिंग पाणी स्वच्छ असताना किंवा पाणी आटल्यावर पहाता येते. टाकी पाहुन पुढे आल्यावर पाच मिनीटात आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. पायथ्यापासुन गडावर प्रवेश करण्यास एक तास पुरेसा होतो. गडाचा माथा दोन भागात विभागलेला असुन डावीकडील उंच टेकाड म्हणजे बालेकिल्ला तर उजवीकडील पठार म्हणजे माची असे म्हणता येईल. बालेकिल्ल्याचे टेकाड समुद्र सपाटीपासून ३५१८ फुट उंचावर असुन संपुर्ण गड साधारण ५० एकरवर पसरलेला आहे. तासभर गड चढुन आल्याने पायाला विश्रांती म्हणुन आधी उजवीकडील सपाटी पाहुन घ्यावी. आपण चढुन आलो त्या घळीच्या विरुद्ध बाजुस किल्ल्याची दुसरी घळ असुन या घळीत देखील तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. या घळीत किल्ल्यावर येण्यासाठी दुसरा दरवाजा असुन वापरात नसल्याने या दरवाजाने वर येणारी वाट पुर्णपणे मोडलेली आहे. पडझड झाल्याने हा भाग धोकादायक बनला असुन त्यात उतरण्याचे धाडस न करता दुरूनच हे अवशेष पाहुन घ्यावेत. उजवीकडील पठारावर आपण घळीच्या काठाने गडफेरीस सुरवात केल्यावर १० मिनीटात खालुन पाहीलेल्या टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजामध्ये टेहळणीसाठी एक दालनवजा मोठी खिडकी ठेवलेली असुन संकटकाळी या खिडकीचा चोरदरवाजा म्हणुन वापर केला जात असावा. या भागातील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. किल्ल्याची पुढील डोंगरसोंड किल्ल्यापासुन वेगळी करण्यासाठी ६०-७० फुट रुंद व ४० फुट खोल खाच मारण्यात आली असुन या खाचेत सहजपणे वावरता येऊ नये यासाठी खाचेत व डोंगर सोंडेवर तीव्र उतार कोरलेला आहे. या भागावर खास लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाची बांधणी करण्यात आली आहे. या बुरुजावरून मांगी-तुंगी, नाहवागड,चौल्हेर तसेच डेरमाळच्या भैरवकड्याचे सुंदर दर्शन होते. बुरुज पाहुन झाल्यावर तटबंदीच्या दुसऱ्या बाजुने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. दरीच्या या काठावर उतारावर कातळात कोरलेली दोन मोठी टाकी असुन पठाराकडे वळल्यावर झाडीत लपलेले तिसरे टाके नजरेस पडते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन पुन्हा वरील बाजुस म्हणजे पठारावर आल्यावर लहानशा दगडी प्राकारात एका समाधीचे अवशेष पहायला मिळतात. २०१९ पर्यंत सुस्थितीत असलेल्या या समाधीची अलीकडील काळात तोडफोड झालेली आहे. समाधीच्या अवशेषात असलेली दोन मयुरशिल्प, कमळपुष्प व शिवलिंग पहाता हि समाधी हिंदु व्यक्तीची आहे. समाधीच्या पुढील भागात एक मोठा खोदीव तलाव असुन त्यापुढील भागात साचपाण्याचे टाळे आहे. या भागात थोड्याफार प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. पठारावर फेरी मारताना काही ठिकाणी गवतात लपलेले घरांचे चौथरे पहायला मिळतात. पठारावरील फेरी पुर्ण झाल्यावर घळीच्या माथ्यावर येऊन डावीकडील बालेकिल्ल्याच्या चढावाकडे निघावे. चढावाच्या सुरवातीस उजवीकडे कातळात खोदलेले पाण्याचे कोरडे टाके असुन तेथुन चार-पाच खोदीव पायऱ्या चढुन वर आल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेली व पाण्याने भरलेली दोन टाकी आहेत. पुढे वाटेच्या उजवीकडे हिरव्यागार पाण्याने भरलेली अजुन दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या वरील बाजुस थोड्या अंतरावर किल्लेदाराच्या प्रशस्त वाड्याचे अवशेष असुन या वाड्याचा कमानीदार दरवाजा आजही तग धरून उभा आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात नक्षीदार कोनाडे कोरलेले असुन कमानीवर दोन्ही बाजुस कमळांची फुले कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन आतील अवशेष या झाडीत लुप्त झालेले आहेत. वाड्याच्या डावीकडे काही अंतरावर उघडयावर एकमेकाला पाठमोऱ्या टेकवुन ठेवलेल्या दोन अनगड मुर्ती असुन यातील एक मुर्ती गणपती तर दुसरी मुर्ती हनुमान असल्याचे सांगितले जाते. या मुर्तींच्या डावीकडे खोल व शेवाळाने भरलेले अजुन एक कातळकोरीव टाके पहायला मिळते. येथुन माथ्याच्या दिशेने सरळ वर चढत गेल्यावर आपण तटबंदीजवळ असलेल्या एका कमानीदार वास्तुजवळ पोहोचतो. या वास्तुच्या दर्शनी भागात तीन कमानी असुन यातील एक कमान दगड-चुन्यांनी बंदीस्त केली आहे. या वास्तुमध्ये झीज झालेली मुर्ती ठेवलेली आहे. गडावर मुक्काम करायचा असल्यास या वास्तुत देखील मुक्काम करता येईल. येथे वरील तटबंदीच्या बाहेर खालील बाजुला दुसरी तटबंदी बांधुन बालेकिल्ल्याला दुहेरी संरक्षण देण्यात आले आहे. या वास्तुच्या उजवीकडून तटबंदीवरून किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे जाता येते. या वाटेवर प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीत पाण्याची दोन टाकी व काही घरांचे चौथरे लपलेले आहेत. किल्ल्याच्या उत्तर टोकावर दुहेरी तटबंदी बांधलेली असुन काटेरी झाडीमुळे खालील तटावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. किल्ल्याचे उत्तर टोक पाहुन झाल्यावर आल्या वाटेने मागे फिरावे व कमानीच्या वास्तुजवळ पोहचावे. येथुन तटावरून आपली गडफेरी किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे सुरु करावी. या भागात फारसे अवशेष नसुन किल्ल्याचे दक्षिण टोक भक्कम बुरुजाने बंदीस्त केलेले आहे. येथुन घळीच्या वाटेवर असलेल्या दोन गुहा पहाता येतात.दक्षिणेकडील बुरुज पाहुन उतरत जाणाऱ्या वाटेने घळीच्या तोंडाशी असलेल्या दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. १३ व्या शतकात गवळी राजा महेश याने या किल्ल्याची निर्मीती केल्याचे मानले जाते. १४व्या शतकात राठोडवंशीय बागुलराजा नानदेव होता याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर व पिसोळ किल्ले जिंकले. त्यानंतर या प्रदेशावर राठोड वंशीय बागुल राजे राज्य करू लागले व त्यांच्या नावानेच हा प्रदेश बागलाण म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१६३७ मध्ये बागलाणचा हा परिसर मुघलांच्या ताब्यात गेला. शिवकाळात हा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात असला तरी या पिसोळ-डेरमाळ किल्ल्यांचा कोठे उल्लेख येत नाही. इ.स. १८१८ मध्ये बागलाण प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला व येथे ब्रिटिश सत्ता सुरू झाली. इ.स.१८६९ मध्ये बागलाण नाशिक जिल्ह्याचा भाग बनले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!