पिंपळे जगताप

प्रकार : गढी

जिल्हा : पुणे

उंची : 0

पुणे शहराचा विकास झपाट्याने होताना त्याच्या आसपास असलेली गावे देखील या विकासात सामील होत आहेत. पुणे प्रांताच्या परीघात असलेल्या अनेक ऐतिहासिक गावांचे आता शहरीकरण होत असल्याने त्याचे मूळ रूप बदलत आहे. हे घडत असताना या गावात असलेल्या खाजगी मालकीच्या गढी व वाडे त्यासोबत नष्ट होत आहेत. या सर्व ऐतिहासिक वास्तु नष्ट होण्यापुर्वी त्यांना भेट देऊन माहीती घेणे व या माहितीचे संकलन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातील आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी मी या गढ्याना भेट देऊन त्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले पिंपळे जगताप हे असेच एक ऐतिहासिक गाव. या गावात बहुसंख्य जगतात आडनावाची माणसे असल्याने हे गाव पिंपळे जगताप म्हणुन ओळखले जाते. गावाच्या मध्यवर्ती भागात एक पेशवेकालीन गढी असुन हि गढी सरदार जगताप गढी म्हणुन ओळखली जाते. जगताप पिंपळे गाव चाकण –शिक्रापूर मार्गावर वसलेले असुन पुणे ते जगताप पिंपळे हे अंतर ३३ कि.मी. आहे. ... गावाच्या मध्यवर्ती भागात सयाजीराव गायकवाडांचे सरदार जगताप यांची गढी आपले बुरुज व तटबंदी घेऊन ताठ मानेने उभी आहे. आयताकृती आकाराची हि गढी साधारण पाव एकरवर उभी असुन गढीच्या चारही टोकावर गोलाकार आकाराचे चार बुरुज आहेत. संपुर्ण गढीचे फांजीपर्यंत वीस फुटाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील पाच फुटाचे बांधकाम विटांनी केलेले आहे. या तटाची उंची साधारण २० फुट आहे.कोणत्याही गढीत सहसा न दिसणारी एक गोष्ट आपल्याला या गढीत पहायला मिळते, ती म्हणजे या गढीला असणारे दोन मुख्य दरवाजे. हि गढी बांधताना दोन भागात बांधली असल्याने गढीच्या दक्षिणेस एक व उत्तरेस एक असे दोन मुख्य दरवाजे पहायला मिळतात. गढीच्या दक्षिण भागात असलेला वाडा आज पूर्णपणे नष्ट झाला असुन उत्तर भागात असलेला दुमजली वाडा आजही शिल्लक आहे. गढीच्या उत्तर दरवाजाच्या दर्शनी भागात तीन कमलपुष्प कोरलेली असुन त्यावरील भागात सज्जा बांधलेला आहे. या दरवाजाने आत शिरले असता वर सज्जात जाण्यासाठी भिंतीमध्ये जिना बांधलेला आहे. या सज्जाचे आतील बाजुने आता नुतनीकरण करण्यात आले आहे. गढीच्या संपुर्ण तटबंदीमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. गढीच्या तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असुन त्यावरून तटावर जाता येते पण तटबंदी जागोजागी ठिसूळ झाल्याने त्यावरून फेरी मारणे धोकादायक आहे. गढीशेजारी धर्मनाथांचे मंदिर असुन या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या शिलालेखात राघोजी रत्नोजी पाटील मुकादम जगताप व सयाजीराव गोविंदराव गायकवाड शके १७०६ असा उल्लेख येतो. संपुर्ण गढी व हे मंदिर पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय पिंपळे जगताप गावाबाहेर आपल्याला पायऱ्या असलेली गोलाकार बारव पहायला मिळते. जगताप पाटलांना पिंपळे गाव पाटीलकीचे वतन म्हणुन बडोदा गायकवाडांकडून आंदण मिळाले होते. या भागातुन सयाजीराव गायकवाड यांना महसुल म्हणुन येणारे धान्य साठविले जात असे म्हणजे हे एक प्रकारे हे सयाजीराव गायकवाड यांचे धान्यकोठार होते. गावची पाटीलकी आजही जगताप घराण्यात आहे. पूर्वी गावची वसुली न्यायनिवाडे इ. सर्व बाबी जगताप वाडयात होत असत. धामारी हे गावसुद्धा जगताप यांना इनाम म्हणुन होते. बडोदेकर गायकवाडांशी तसेच कोल्हापूरकर छत्रपतींशी या घराण्याचे सोबर संबंध आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!