पिंपळास

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : १०० फुट

श्रेणी : सोपी

राजमाचीला उगम पावणारी उल्हास नदी कर्जत-कल्याण-ठाणे असा प्रवास करत पुढे वसई खाडीला मिळते. समुद्राच्या भरतीचे पाणी थेट कल्याणपर्यंत येत असल्याने कर्जत ते कल्याणपर्यंत उल्हास नदी म्हणुन ओळखली जाणारी हि नदी कल्याण ते वसई खाडी म्हणुन ओळखली जाते. प्राचीनकाळी उल्हास खाडीमार्गे मोठया प्रमाणात जहाजांची ये-जा चालत असल्याने कल्याण हे एक महत्वाचे बंदर होते. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, गायमुख,ओवलेकोट, नागलाबंदर, दुर्गाडी यासारखे किल्ले बांधले गेले तर उत्तरेला नागले, खारबाव, पिंपळास हे छोटे कोट बांधले गेले. कल्याणच्या खाडीकिनारी मराठा आरमाराच्या वाढत्या हालचाली पाहून पोर्तुगीजांनी उल्हास खाडीच्या वळणावर असलेल्या पिंपळास गावातील एका छोट्या टेकडीवर टेहळणीसाठी पिंपळास या चौकीवजा किल्ल्याची निर्मिती केली. मराठयांनी सुरु केलेल्या लढाऊ आरमारावर वचक बसवण्यासाठी पिंपळास,कांबे,खारबाव, फिरंगकोट असे कोट बांधून पोर्तुगीजांनी उल्हास खाडीची नाकेबंदी करण्याची रणनीती आखली असावी. ... भिवंडी तालुक्यात असलेल्या पिंपळास गावातील हा कोट ठाण्याहून कल्याणकडे जाताना १४ कि.मी.अंतरावर असुन मुंबई- नाशिक महामार्गावर ठाण्याहुन १२ कि.मी. अंतरावर पिंपळास गावात जाणारा फ़ाटा आहे. १०० फुट उंचीच्या झाडीभरल्या एका छोटयाशा टेकडीवर असलेल्या या कोटाविषयी गावातील लोकांना फारशी माहिती नसली तरी या टेकडीवर तांदळा स्वरुपात असलेला कापरी देव मात्र स्थानिकांना माहीत आहे त्यामुळे किल्ला म्हणुन न विचारता कापरीदेव म्हणुनच चौकशी करावी. पिंपळास गावातील वस्तीतुन किल्ल्यावर जाण्यासाठी एक वाट असुन दुसरी वाट गावाबाहेर या टेकडीखाली असलेल्या स्मशानाकडून आहे. या पाउलवाटेने टेकडी चढण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. टेकडीवर चढताच पोर्तुगीजांनी बांधलेल्या या कोटाचे अवशेष नजरेस पडतात. हि वास्तु म्हणजे कोटाच्या आत असलेले गिरीजाघर असुन कमानीदार छत असलेल्या या वास्तुची उंची साधारण २० फ़ूट आहे. या वास्तुचे छप्पर पुर्णपणे कोसळलेले असुन या वास्तुच्या भिंतीत वासे बसवण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात. या वास्तुच्या दर्शनी भागातील भिंत व आतील बाजुस असलेली कमान आजही शिल्लक असुन आत शिरल्यावर समोरच असलेल्या अर्धवर्तुळाकार कोनाड्यात शेंदुर फासलेले काही दगड आहेत. स्थानिक लोक त्यांना कापरी देव म्हणतात. कोटाची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने यात संरक्षणाची सोय होती कि नाही हे कळण्यास वाव नाही पण शिल्लक असलेल्या अवशेषात या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना यांचा वापर केलेला दिसतो. कोटामध्ये कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय केलेली दिसुन येत नाही. उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ तसेच या कोटाचे आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन टेहळणीचे ठाणे म्हणुन केला असावा. दाट झाडीने झाकलेल्या या टेकडीवरून उल्हास खाडीचे पात्र नजरेस पडते. कोट छोटेखानी असून पंधरा मिनिटात पाहून होतो. आज जरी किल्ला पुर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि उल्हास खाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेच्या पुर्वार्धात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून कायमचे उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!