पिंडवळ

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : गुजरात

उंची : १७१० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला लहानमोठे असे एकुण १६ किल्ले पहायला मिळतात. सीमा प्रांतात असलेल्या या सर्व किल्ल्यांवर मराठयांच्या पाउलखुणा उमटलेल्या आहेत. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. वलसाड जिल्ह्यातील धरमपुर तालुक्यातील पिंडवल गावाजवळ असलेला पिंडवल हा मराठ्यांची निर्मीती असलेला एक किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी बलसाड हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असुन येथुन पिंडवल किल्ला ५0 कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी थेट बस नसल्याने आपण येथुन ३० कि.मी. अंतरावर असलेले धरमपुर हे तालुक्याचे ठिकाण गाठावे. धरमपुर येथुन पिंडवळ गावात जाण्यासाठी दिवसातून दोन बस असून त्या फारशा सोयीच्या नाहीत. धरमपुर बस स्थानकात चौकशी करून मिळेल त्या बसने १० कि.मी. अंतरावर असलेल्या पिंडवल- पिप्रोल गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर उतरावे. येथुन पुढे पिंडवळ –पिप्रोल या गावात जाण्यासाठी वाहनांची वर्दळ अतिशय कमी असल्याने मिळेल त्या वाहनाला हात दाखवुन आपली प्रवासाची सोय करावी अन्यथा चालत निघावे. ... पण हा पुर्णपणे चढावाचा घाटमार्ग असल्याने प्रवास तितकासा सोयीचा नाही. शिवाय पिंडवळ –पिप्रोल या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग असला तरी तो सोयीचा नसुन बरीच पायपीट करावी लागते. पिंडवल किल्ला परिसरात कोणालाच ठाऊक नसल्याने स्थानिक विल्सन टेकडीला किल्ला समजतात व आपल्याला तसाच मार्ग सांगतात. पण विल्सन टेकडी व पिंडवल किल्ला हे पुर्णपणे वेगळे असुन त्याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. याशिवाय पिंडवल किल्ल्यासमोरील एका टेकडीवर काही वास्तुचे अवशेष आहेत. स्थानिक लोक त्या ठिकाणास माडी म्हणुन ओळखतात. खोलवर चौकशी केल्यास काही लोक किल्ला म्हणुन त्या ठिकाणी निर्देश करतात. पण हे ठिकाण म्हणजे घाटावरून किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावरील मेट असुन चौकीचे अवशेष वगळता तेथे कोणतेही अवशेष नाहीत. आता पिंडवल किल्ल्याचे स्थान गुगलवर निश्चित केले असुन त्यामार्गाने ठामपणे किल्ल्यावर जाता येईल. स्थानिक लोक या ठिकाणास कोठा म्हणुन ओळखतात पण खुप कमी लोकांना याची माहीती आहे. आपण किल्ल्याची विचारणा करताना कोठा अशी चौकशी करावी. मुख्य रस्त्याने जाताना पिप्रोल-पिंडवल या गावादरम्यान GETCOचे (Gujarat Energy Transmission Corporation) विजेचे मनोरे व कार्यालय आहे. येथून एक कच्चा रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने पिंडवल किल्ला साधारण २ कि.मी.अंतरावर आहे. हे अंतर आपल्याला पायगाडीने पार करावे लागते. या वाटेने साधारण २० मिनिटे चालल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात पण त्याआधी ५०-६० फुट अलीकडे एक पायवाट डावीकडे उतरत जाताना दिसते. या पायवाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण तुटलेल्या तटबंदीतुन थेट गडमाथ्यावर पोहोचतो. हा गडावरील शेतीसाठी जाणारा Tractor चा मार्ग असुन कोठेही चुकण्याची शक्यता नाही. आयताकृती आकाराचा गडमाथा समुद्रसपाटीपासुन १७१० फुट उंचावर असुन साधारण अकरा एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माथ्यावर शेती केली जात असल्याने बहुतांशी अवशेष नष्ट झाले आहेत. गडावर प्रवेश केल्यावर सरळ वाटेने पुढे जाताना उजव्या बाजूस एका वास्तुचा चौथरा असुन हि वास्तू बांधण्यासाठी घडीव दगडाचा वापर केलेला दिसुन येतो. येथुन पुढे गेल्यावर उजवीकडे कातळात कोरलेला मोठा तलाव असुन अतिरिक्त पाणीसाठा करण्यासाठी या तलावाभोवती जमिनीच्या पातळीपेक्षा उंच गोलाकार दगडी भिंत बांधलेली आहे. सध्या या तलावाचा वापर गावकरी कपडे धुण्यासाठी करतात. तलावाच्या डाव्या बाजूस कातळात कोरलेले आयताकृती आकाराचे पाण्याचे टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे पण हे पाणी केवळ मार्च- एप्रिल महिन्यापर्यंत असते. टाक्यासमोर काही अंतरावर दोन वास्तुंचे चौथरे असुन यातील एका वास्तुची भिंत आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. संपुर्ण गडाची तटबंदी सात फुट उंच रचीव दगडांची असुन या तटबंदीत काही ठिकाणी बुरुज बांधलेले आहेत. आपण गडावर प्रवेश करतो त्या ठिकाणापासून डावीकडील तटबंदीत काही अंतरावर दोन बुरुजामध्ये बांधलेला गडाचा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. या ठिकाणी असलेले गडाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन दरवाजाची वरील कमान नष्ट झालेली आहे. या दरवाजासमोरील टेकडीवर माडी म्हणुन ओळखले जाणारे ठिकाण असुन ते गडाच्या वाटेवरील मेट असावे. तटबंदीवरून फेरी मारताना परिसरात असलेले घनदाट जंगल दिसुन येते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इ.स. १७८४ मध्ये रामनगरचा कोळी राजा सोमदेव याच्या मृत्यूनंतर त्याची राणी व पेशव्यांचे अधिकारी धोंडो महादेव यांच्यात तहाचे राजकारण करण्यात येसु दळवी याने पुढाकार घेतला व गड मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी पिंडवल गडावर येसु दळवी व आबाजी नाईक पालवे यांची नेमणूक करण्यात आली. पिंडवल गावात आजही दळवी यांचे वंशज असुन पिप्रोल गावात नाईक आडनावाची घरे आहेत. या किल्ल्याच्या परिसरात मराठी-गुजराती मिश्र बोलीभाषा वापरली जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!