पावनगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : कोल्हापुर

उंची : ३०८० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र हा दुर्गांचा देश म्हणुन ओळखला जातो. महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतर कोणत्याही प्रांतात दिसुन येत नाही. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात आढळुन येणाऱ्या दुर्गजोडी. अशीच एक दुर्गजोडी आपल्याला कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पहायला मिळते, ती म्हणजे पन्हाळा-पावनगड. हे दोन्ही किल्ले एक लहानशा खिंडीने एकमेकापासुन वेगळे झाले आहेत. यातील पन्हाळगडावर कायम पर्यटकांची गर्दी असते तर पावनगडावर दुर्गप्रेमींची पाउले देखील अभावानेच वळतात. पन्हाळ्याचा जोडकिल्ला असलेला पावनगड शिवनिर्मित असुनही दुर्लक्षित राहिलेला आहे. चला तर मग पावनगडची भटकंती सुरु करूया!! पावनगडवर जाण्यासाठी पन्हाळ्याच्या पुर्वेकडील काली बुरुजाखालून रेडेघाटीतून कच्चा रस्ता गेला आहे पण आपण मात्र आपल्या पायगाडीनेच गडावर जायचे आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाघबीळ या गावापासून डाव्या बाजूला जो डोंगर दिसतो तो म्हणजे पावनगड. ... गडावर चालत जाण्यासाठी दोन पायवाटा असुन या दोन्ही वाटा गडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठेतुन गडावर जातात. गडावर वस्ती असल्याने या वाटा मळलेल्या आहेत. यातील पहिली वाट बुधवार पेठेतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमागुन २० मिनिटात गडावर जाते. तर दुसरी वाट बुधवार पेठ ओलांडल्यावर पन्हाळगडच्या तपासणी नाक्याजवळ असलेल्या पन्हाळा-पावनगड खिंडीतून वर जाऊन रेडेघाटीतुन येणाऱ्या कच्च्या रस्त्याला मिळते. यातील दुसरी वाट जास्त सोयीची असुन या वाटेने १० मिनिटात आपण गडावर पोहोचतो. कधीकाळी या वाटेवर असलेला गडाचा दरवाजा १९४४ साली इंग्रजांनी पुर्णपणे उध्वस्त केल्याने आज त्याच्या कोणत्याच खुणा दिसुन येत नाहीत. कच्च्या रस्त्याने जाताना सर्वप्रथम उजवीकडील उंचवट्यावर जाणाऱ्या काही दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढुन गेल्यावर रचीव दगडांच्या प्राकारात असलेले लहान शिवमंदिर दिसते. या मंदिराच्या आवारात काही भग्न मुर्ती (शिवलिंग-नंदी-गणपती) ठेवलेले असुन प्राकाराबाहेर उध्वस्त दीपमाळ आहे. हे मंदीर पाहुन पुढे निघाल्यावर डावीकडील सपाटीवर दुसरे मंदीर पहायला मिळते. हे गडदेवतेचे मंदिर असुन या मंदीरावर दोन शिल्प कोरलेली आहेत. या मंदीरासमोर काही अंतरावर दुसरे मंदीर असुन या मंदिराबाहेर आवर्जुन पहावे असे हनुमंताचे भग्न शिल्प आहे. हि तीनही मंदिरे एकाच कालखंडातील असुन या बाजूला असलेली गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहेत. हि मंदीरे पाहुन रस्त्याने सरळ पुढे आल्यावर आपण गडाच्या वस्तीजवळ पोहोचतो. या भागात बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचा मध्यवर्ती भाग असल्याने गडावरील महत्वाच्या वास्तु येथे दिसुन येतात. येथुन वस्तीकडे न जाता डावीकडील सपाटीवर गेल्यास सर्वप्रथम कातळात कोरलेली आयताकृती आकाराची पायऱ्यांची विहीर दिसते. या विहीरीच्या काठावर दगडी ढोणी ठेवलेली आहे. विहिरींच्या पायऱ्याची झीज झाल्याने थोडे सांभाळूनच खाली उतरावे लागते. विहिरीत झाडी वाढलेली असुन तळभागात एक दगडी कमान दिसुन येते. विहिरीतील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. विहीरीसमोर काही अंतरावर घडीव दगडात बांधलेले सुंदर शिवमंदिर व त्यासमोर नंदीमंडप दिसुन येतो. पुर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची गर्भगृह व सभामंडप अशी रचना असुन नंदीमंडप स्वतंत्र बांधलेला आहे. हे मंदिर शिवकालीन अथवा पेशवेकालीन असुन यातील शिवलिंग व नंदी मात्र अलीकडील काळातील आहेत. नंदीची स्थापना नंदी मंडपात न करता मंदीराच्या सभागृहात केलेली आहे. मंदीरासमोर गाडयावर मध्यम आकाराच्या दोन तोफा मांडुन ठेवलेल्या आहेत. मंदीरामागे काही अंतरावर कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे उथळ टाके असुन त्याशेजारी दगडी छप्पर असलेले दुसरे टाके आहे. हे दुसरे टाके गडावरील तुपाची विहीर म्हणुन ओळखले जाते पण हे तितके संयुक्तिक वाटत नाही. पुर्वी जखमांवर मलम म्हणुन गायीच्या तुपाचा वापर केला जात असे. हे तुप जितके जास्त जुने तितके ते जास्त गुणकारी समजले जाई. या टाक्यावर छप्पर असल्याने या टाक्याचा तुप साठवण्यासाठी वापर केला जात असल्याचे समजले जाते. पण अशी छप्पर असलेली टाकी अनेक किल्ल्यावर दिसुन येतात. मंदिराच्या पुढील बाजुस राजवाड्याचे अवशेष दिसुन येतात. आज हा राजवाडा पुर्णपणे उध्वस्त झाला असला तरी त्याचा एका बाजुस शिल्लक असलेले भाग त्याचे सौंदर्य अधोरेखित करतो. मंदीराच्या डावीकडील भागात एक पायवाट झाडीतुन गडाच्या पुर्व दिशेला जाताना दिसते. या वाटेने झाडीतुन पाच मिनीटे वाटचाल करून आपण भगवा ध्वज फडकणाऱ्या चंद्र-सुर्य बुरुजाजवळ पोहोचतो. चौकोनी आकाराचा हा बुरुज तटबंदी पासुन वेगळा बांधलेला असुन या बुरुजात कमान असलेली लहान खोली आहे. बुरुजाच्या बांधकामातील एका दगडावर चंद्र-सुर्य कोरलेले असल्याने हा बुरुज चंद्रसुर्य बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरून पन्हाळगड परीसर तसेच दूरवर असलेल्या ज्योतिबाच्या डोंगराचे दर्शन होते. या बुरुजाच्या पुढील भागात दुसरा लहान बुरुज आहे पण तेथे वाढलेल्या काटेरी बुरुजामुळे त्यावर जाता येत नाही. येथे तटाशेजारून फेरी मारण्यासाठी वाट नसल्याने मागे वळुन पुन्हा मंदिराकडे यावे व वस्तीतील वाटेने गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मशिदीजवळ जावे. येथे दर्ग्यात जाण्यासाठी नव्याने बांधलेल्या पायऱ्या उतरुन आपण कबर असलेल्या एका गुहेत पोहोचतो. आज लगुडबंध फकिराचा दर्गा म्हणुन ओळखली जाणारी ही वास्तु म्हणजे एकेकाळची मार्कंडेय ऋषीची गुहा होती. गुहा पाहुन वर आल्यावर मशिदीच्या पुढील भागात गेल्यास पावनगडच्या उध्वस्त दरवाजाचे अवशेष दिसतात. गडाचा हा भाग सहजपणे कोणी सांगत नसल्याने आपण माहीती सोबत ठेऊनच हा भाग पाहुन घ्यावा. गडाचा हा भाग पाहुन झाल्यावर तटबंदी उजव्या बाजुस ठेऊन आपली पुढील गडफेरी सुरु करावी. गडफेरी करताना आपल्याला गरजेच्या ठिकाणी बांधलेली पावनगडाची भक्कम तटबंदी दिसुन येते. या भागातील तटबंदी आजही सुस्थितीत असुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या वाटेने पाच मिनिटात आपण गडाच्या तटबंदीत असलेल्या यशवंत बुरुजाजवळ पोहोचतो. चौकोनी आकाराचा हा बुरुज किल्ल्याच्या टोकावर पण तटबंदीच्या आत बांधलेला असुन कधीकाळी या बुरूजाभोवती दुहेरी तटबंदीचे चिलखत असावे पण आज त्याची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. बुरुजावर ध्वजस्तंभ असुन वर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यशवंत बुरुजावरील ध्वजाला वंदन करून आपली गडफेरी पुर्ण होते. भोजराजाने बांधलेल्या १५ किल्ल्यांमध्ये पावनगडचे नाव येत असल्याने पावनगडची निर्मिती भोजराजाने केल्याचे मानले जाते. पण ताराराणीच्या कागदपत्रातील हा गड शिवरायांनी वसविल्याचे उल्लेख पहाता शिवपुर्वकाळात येथे एखादे चौकीवजा ठाणे असावे. सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला असता पन्हाळ्याच्या पुर्व बाजुस असलेल्या मार्कंडेय टेकडीवरून पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्यात आला. शिवरायांनी भोगोलिक परिस्थिती ओळखली आणी १६७३ मध्ये पन्हाळा दुसऱ्यादा जिंकुन घेतल्यावर पन्हाळ्याच्या संरक्षणातील हा दोष काढुन टाकण्यासाठी मार्कंडेय टेकडीला तटा-बुरूजांनी बंदिस्त करून पावनगडची निर्मिती केली. पावनगडाच्या बांधकामाची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल महाराजांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांना प्रत्येकी पाच हजार होनांचे बक्षीस दिले. राणी ताराबाईंच्या कारकिर्दीत औरंगजेबाने घातलेला वेढा पन्हाळा-पावनगड या दुर्गजोडीने निष्प्रभ केला. इ.स.१७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा व पावनगड जिंकुन घेण्याची योजना आखली. औरंगजेबाने शहजादा बेदरबख्त याला ब्रह्मपुरीहून बोलावून मराठ्यांचे पन्हाळगड व पावनगड हे किल्ले जिंकण्यासाठी पाठवले (२ मार्च १७०१). त्याच्याबरोबर झुल्फिकारखान, नुसरतजंग व तरबियतखान हे सरदार होते. मोगलांनी दोन्ही किल्ल्यांना वेढा दिला. यावेळी सर्जेराव घाटगे या मराठा सरदाराने मोठा पराक्रम गाजविला. पन्हाळा तर नाहीच पण पावनगड देखील मुघलांना जिंकता आला नाही. अखेर तरबियतखान मार्फत किल्लेदारास ५५,००० द्रव्य देऊन पन्हाळगड व पावनगड मोगलांनी ताब्यात घेतला (२८मे१७०१). पन्हाळगडाचे नाव बानीशाहदुर्ग तर पावनगडाचे नाव रसुलगड ठेवण्यात आले. पण काही काळातच हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी हस्तगत केला. किल्ले घेण्यासाठी मोगल अधिकारी किती यातायात करीत आणि अखेरीस ते अपयशी कसे ठरत याची कल्पना इ.स.१७०१मधील पन्हाळगडाच्या वेढ्याच्या हकिकतीवरून येण्यासारखी आहे. औरंगजेबाचा एक अधिकारी साकीमुस्तैदखान हा या मोहीमेत उपस्थित होता. त्याने आपल्या 'मासिरे आलमगीरी' या ग्रंथात पन्हाळगडच्या वेढ्याचे ( ९मार्च ते २८मे ) वर्णन तपशीलाने दिले आहे. खाफीखानाने आपल्या 'मुन्तखबुललुबाब' या ग्रंथात पन्हाळ्याच्या वेढ्याची हकीकत दिली आहे. साकीमुस्तेदखानाने तरबियतखान, फत्तेहुल्लाखान या मोगल सरदारांच्या कर्तृवाची तारीफ केलेली आढळते. खाफीखानाने पन्हाळ्याच्या वेढ्याचा तपशील देताना तरबियतखान हा मोगल अधिकारी फत्तेहुल्लाखान, महमंद मुरादखान या कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा द्वेष करीत असल्याचे म्हटले आहे. बादशाहाची दक्षिणेकडील मोहीम लांबण्याचे मुख्य कारण म्हणजे सरदारांतील मतभेद आणि त्यांच्यातील एकीचा अभाव असल्याचे मत खाफीखानाने व्यक्त केले आहे. परंतु मोगल अधिकाऱ्याच्या अपयशावर खरा प्रकाश सर विल्यम नॉरीस या ब्रिटिश राजदूताने टाकलेला दिसून येतो. पन्हाळगडचा वेढा चालू असताना विल्यम नॉरीस औरंगजेबाच्या भेटीसाठी लष्करी तळावर आला होता. त्याने स्वत: वेढ्याचे निरीक्षण केले. साकीमुस्तेद खानाप्रमाणे नॉरीसने ही पन्हाळ्याच्या वेढ्याची हकीकत लिहून ठेवली. साकीमुस्तेदखानाने वेढ्याचे वर्णन करताना तरबियतखानाने तयार केलेल्या 'साबात'ची किंवा भुयारी मार्गाची माहीती दिली आहे. हा मार्ग खडकाळ जमीन खणून तयार करण्यात आला असुन एकावेळी तीन सशस्त्र माणसे जाऊ शकतील एवढा तो रूंद होता. त्याशिवाय भुयारी मार्गात एका ठिकाणी वीस सैनिक बसू शकतील असे ठिकाण करण्यात आले होते. या ठिकाणाहून सैनिकाना किल्ल्याच्या सफेलीवर किंव्हा पडकोटावर असलेल्या लोकांवर मारा करण्याची सोय करण्यात आली होती. बुरजाचा खालचा भाग खणून इतका पोकळ करण्यात आला होता की खालील पोकळीत मोगलांचे एक पथक पहारा देत असे. दुसऱ्या बाजूने फतेहुल्लाखानाने किल्ल्याच्या तटापर्यंत अशाच प्रकारचा भुयारी मार्ग तयार केला .'खाफीखानाने या दोन्ही मार्गाची माहीती दिलेली आहे. औरंगजेबाने एप्रिल १७०१ मध्ये फतेहुल्लाखानाने तयार केलेल्या भुयारी मार्गाचे निरीक्षण केले असे नॉरीस लिहीतो. परंतु अशा प्रकारचे भुयारी मार्ग तयार करूनही मोगलांना किल्ला सर करण्याची हिंमत होईना. खाफीखान लिहतो. हे सर्व करूनही किल्ल्यावरील लोक हवालदील झाल्याचे चिन्ह दिसेना.' खाफीखानाने त्याचे कारण दिले नाहीं. नॉरीसने केलेल्या निरीक्षणात मोगल अधिकाऱ्याच्या कचखाऊ प्रवृत्तीचे दर्शन होते.'The fort, it seemed, had no more guns than the besiegers and not more than three hundred men and though there were two or three breaches in the wall; yet the mughal army dared not attempt to enter or make an assault ' या कचखाऊ प्रवृत्तीची कारणमिमांसा करताना नॉरीसने अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारी वर्तनाला दोष दिला आहे. औरंगजेबाने एक लाखापेक्षा अधिक सैनिक पगारावर ठेवले असताना प्रत्यक्षात वीस हजार सैनिकच खऱ्या अर्थाने लढत होते. खोटी हजेरी पुस्तक तयार करणे आणि पैसा खाणे ही गोष्ट अधिकाऱ्याना चांगलीच मानवलेली होती. नॉरीस लिहतो, "Ye cheifest Gaine of all ye officers for a General yt has ye pay of 8,000 horse wch is about 25,000 sterling a month (as Ased Choun has) if he keepes 1,500 it is reckond a greate deale and ye Rest put in his pockett and sae all ye Rest." औरंगजेबाच्या तोफखान्यावर काम करणाऱ्या एका इंग्लिश माणसानेही पुढीलप्रमाणे उदगार काढले होते; `ye top to ye bottom there is nothinge but cheatinge and treachery and basenesse in ye Highest degree.' बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मोगल लष्करातील पगार थकले होते असे नॉरीसला दिसून आले. किल्ल्याच्या तटावर मारा करण्यासाठी सात तोफा मोगलांनी रोखल्या होत्या. त्या तोफांमधून दगडी गोळ्यांचा वर्षाव करण्यात येत असे. वास्तविक पाहता लोखंडी गोळ्यांचा उपयोग अधिक परिणामकारक झाला असता. नॉरीसने त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलेले आढळते. मोगलांचा तोफखाना अवजड आणि किल्ले (विशेषत: डोंगरी) जिंकून घेण्याच्या दृष्टीने कमी फलदायी होता. नॉरीसने म्हटल्याप्रमाणे, 'The Mughal's heavy artillery was so inadequte because it was cumbrous, unmanageable and ill-mounted by the Indian gunners, who were at the period unskilled in the management of ordnance.' यावरून धमधमे उभारणे आणि भुयारी मार्ग खोदणे या दोन्ही गोष्टी डोंगरी किल्ले घेण्याच्या दृष्टीने सोयीच्या नव्हत्या हे दिसून येईल. डोंगरी किल्ले जिंकण्यासाठी दोराच्या सहाय्याने किंवा शिड्यांच्या मदतीने कडेकपारी आणि तट चढून जाणे हाच खरा मार्ग होय. मोगलांना हा मार्ग अपरिचित आणि दुष्कर होता. पुष्कळ ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांना भरपूर पैसे देऊन त्यांचा उपयोग करून घेतला. परंतु शिड्यांचा किंवा दोराच्या सहाय्याने किल्ला जिंकून घेणे मोगलाना जमलेच नाही. एप्रिल १७०१मध्ये औरंगजेबाने पन्हाळा व पावनगड या दोन्ही किल्ल्यांवर निकराचा हल्ला करण्याची आज्ञा मोगल अधिकाऱ्याना केली. पावनगड म्हणजे पन्हाळ्याचा उपदुर्ग, त्यामुळे पन्हाळ्याबरोबर पावनगड जिंकून घेण्याची योजना औरंगजेबाने आखलेली होती. पन्हाळा व पावनगड यांच्या दरम्यान असलेली एक टेकडी महमद मुरादखान याने सर केली आणि टेकडीवर मोर्चे बांधण्यास केली असे खाफीखान सांगतो. परंतु मुरादखानचे वर्चस्व सहन न होणाऱ्या रुहुल्लाखान, हमीदुद्दीनखान या अधिकाऱ्यानी मुरादखानला कोंडीत पकडून त्याचा कार्यभाग उधळून लावला. दोन किल्ल्यांच्या दरम्यान असलेल्या भागावर मोगलानी ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अपयशी ठरला असे नॉरीस लिहतो. जिंकण्याची आशा मावळू लागल्यामुळे मोगल अधिकाऱ्यानी नॉरीस आणि त्याच्या सहकाऱ्याना मदत करण्याची विनंती केली. याप्रसंगी बादशहाला मदत केली तर मागाल त्या सवलती मिळतील असे आमिषही नॉरीसला दाखवण्यात आले. या ब्रिटिश राजदूताने आपल्याबरोबर बारा पंचधातूच्या तोफा आणल्या होत्या. या तोफांमधून लोखंडी गोळे उडविले पाहीजेत अशी अट घालून नॉरीसने औरंगजेबाला तोफा देण्याचे मान्य केले. नॉरीसबरोबर आलेल्या सर्व सैनिकांनी किल्ला जिंकण्यासाठी मोगलांना मदत करावी अशी औरंगजेबाची इच्छा होती. परंतु त्यात धोका वाटल्यामुळे नॉरीसने फक्त सहा गोलंदाजांना मदतीस देण्याचे कबुल केले. बादशहा आणि नॉरीस यांच्यात एकमत होऊ शकले नाही. या काळात शहजादा महमद कामबक्ष आणि तरबियतखान यांनी किल्लेदाराबरोबर बोलणी सुरु केली. अखेरीस भलीमोठी रक्कम घेऊन मराठा किल्लेदारांने २८मे १७०१ रोजी पन्हाळा व पावनगड हे दोन्ही किल्ले मोगलांच्या हवाली केले. साकीमुस्तेदखान मात्र लिहतो की किल्ल्यातील लोक शहाजाद्याला शरण आले. तेंव्हा बादशहाने मोठ्या उदार मनाने त्यांचे अपराध माफ करुन त्यांना किल्ले सोडुन जाण्याची परवानगी दिली .पन्हाळ्याच्या वेढ्यासंबधी खाफीखान, साकीमुस्तैदखान आणि विल्यम नॉरीस या लेखकांनी दिलेला तपशील पाहील्यास खालील गोष्टी स्पष्ट होतात. १. पन्हाळा व पावनगड जिंकून घेण्यात मोगलांना यश आले नाही. मराठ्यांनी स्विकारलेल्या तंत्राप्रमाणे किल्लेदाराने पावसाळा तोंडावर आल्यानंतर भलीमोठी रक्कम मोगलांकडून घेऊन दोन्ही किल्ले त्यांच्या हवाली केले. २८ मे रोजी किल्ले स्वाधीन करण्यात आले ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. २. मोगल अधिकारी एकमेकांचा द्वेष करीत होते. साधी टेकडी हस्तगत करण्याचे यशही महंमद मुरादखानला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी लाभू दिले नाही. बादशहा संशयी स्वभावाचा होतां. नॉरीस लिहतो, "The old king is very cunninge and has spys upon everybody" १८४२-१८४४ साली झालेल्या गडकऱ्यांच्या बंडात जनरल डेला मोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य बंडखोरां विरुद्ध पाठवण्यात आले. १ डिसेंबर १८४४ रोजी त्यांनी पन्हाळा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर पावनगडाचे दोन दरवाजेही पाडण्यात आले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!