पारोळा

प्रकार : भुईकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

पारोळे गाव जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले आहे. धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. पारोळा किल्ला जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास दिल्ली दरवाजा तर अन्य दरवाजांना धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी नावे होती. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गावाजवळ येताच मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे दर्शन घडते. पारोळा बसस्थानकाहुन काही अंतरावर असल्याने किल्ल्यापर्यंत पायी जाता येते. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार असुन किल्ल्याला चारही बाजूला तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव आहे. ... शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्याजवळ जाणे शक्य नसे. सध्या या खंदक व तलावाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही पण आतील बाजूने पाहिल्यास मात्र या खंदकाच्या पाण्यात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला तरी पुरातत्व खात्याने सिमेंट थापुन केलेल्या डागडूजीमुळे आतील अवशेष शिल्लक आहेत पण विद्रुप झाले आहेत. किल्ल्याची देखरेख नसल्याने किल्ल्यात काही स्थानिक आजही किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात त्यामुळे किल्ल्यात सर्वत्र अस्वछता आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणाऱ्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. गडाच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर नव्याने बसवलेल्या लाकडी दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. किल्ल्याच्या खंदकावरून जाणाऱ्या या प्रवेशद्वारासमोर पूर्वी उचलता येणारा लाकडी पूल होता असे सांगितले जाते. दरवाजाच्या तटबंदीत आत दोन्ही बाजूस घोडयांच्या पागा बांधलेल्या असुन दरवाजासमोर २० फूट उंच तटबंदी दिसते. या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या असुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे रणमंडळ असुन गडाच्या मुख्य दरवाजावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी ही रचना आहे. सपाट भुभागावर बांधलेल्या चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्याची लांबीरुंदी ४८० x ४५० फूट असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत अकरा बुरुज आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच गडाच्या मध्यभागी बालेकिल्ला दिसून येतो. बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार बुरुज असुन या बुरुजांमध्ये एक २५ फुट उंच चौकानी बुरुज व त्यात असलेले झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी व तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या कमानींजवळ वरील बाजुस षटकोनी तर आतील बाजुस चौकोनी आकार असणारी विहीर आहे. कमानी पाहुन पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी एकमेव जिना आहे. या जिन्याने वर चढुन संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते पण उतरण्यासाठी पुन्हा येथेच यावे लागते. तटबंदीवर चढण्यासाठी इतरत्र असलेले जिने आता कोसळलेले आहे. गडाच्या तटबंदीवर फिरण्यासाठी फांजी असुन तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाच्या खाली आतील बाजुला दारुकोठार आहे. तटबंदीवरुन संपुर्ण किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाची कामे निधीअभावी अर्धवट आहेत. पूर्वेकडील या तटबंदीच्या बाहेरील बाजूस तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी तटबंदीत दोन ठिकाणी दरवाजे आहेत. असेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस दिसून येतात. या तटबंदी समोर जमिनीच्या खालील पातळीत महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक भुयार असून ते ८ कि.मी.वरील नागेश्वर मंदीरात उघडते अशी समजूत आहे. गडावर अजुन दोन ठिकाणी अशी भुयारे पहायला मिळतात. एक म्हणजे दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुस व बालेकिल्ल्याच्या चौकोनी बुरुजाच्या पुढे. या ठिकाणी बारकाईने पाहिल्यास या भुयाराचा आतील भाग खुप मोठा दिसतो यावरुन हे भुयार नसुन तळघर असावे असे वाटते. किल्ल्याच्या दक्षिणेला कोपऱ्यात हमामखान्याचे अवशेष असुन या तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेऱ्या असाव्यात. या कचेऱ्याच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते त्याचे अवशेष पहायला मिळतात. महादेव मंदिराच्या पुढे जहागीरदार यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. येथेच पूर्वेला बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असुन पश्चिमेला लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या एका मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून गेला असून बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक आहे. किल्ल्यात एकुण दहा विहिरी असुन मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर चार उजव्या बाजुला तर एक डाव्या बाजुला असुन चौकोनी बुरुजाच्या समोर एक, तर दोन दक्षिणेकडे तटबंदीजवळ व दोन विहीर बालेकिल्ल्यात आहे. बालेकिल्ल्यात असलेल्या विहीरीतील पाणी हौदात ओतून ते हमामखान्यापर्यंत खेळवण्यात आले होते तो चर आजही पहायला मिळतो. याशिवाय बालेकिल्ल्यात पाण्याचा अजुन एक हौद दिसून येतो. पाण्याबाबत हा किल्ला संपन्न असल्याचे दिसून येते. पारोळ्याचे वैभव असलेला हा भुईकोट किल्ला हा इ.स.१७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे. या गावाची उभारणी किल्ला बांधणीच्या वेळी सुमारे २९० वर्षांपूर्वी झाली असावी. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत उर्जीतावस्थेला आणले. किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला व हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपुर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा वेळी इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. राणीचे नातलग म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले व १८६० मध्ये जहागीरी खालसा केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिली. शिवाय किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही आढळतात. राणी लक्ष्मिबाईच्या माहेरचे वंशज म्हणजे तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!