पारनेर

प्रकार : गढी

जिल्हा : बीड

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पारनेर येथे अशीच एक गढी पहायला मिळते. बीड–पारनेर हे अंतर ५२ कि.मी. असुन पाटोदा या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी १२ कि.मी.अंतरावर आहे. या भागात ५० कि.मी.च्या घेऱ्यात सहा-सात गढ्या असुन त्या एका दिवसात पहाता येतात पण त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे. गावात हि गढी आंधुरे पाटलांची गढी म्हणुन ओळखली जाते. या गढीचे सध्याचे वंशज भीमराव भुजंगराव आंधुरे यांचे घर या गढीजवळच आहे. मुख्य रस्त्यावरून गावात प्रवेश केल्यावर दुरूनच गढीची तटबंदी दिसुन येते. ... गढीजवळ आल्यावर कधीकाळी या गढीला परकोट असल्याचे दिसुन येते. आज हा परकोट पुर्णपणे नष्ट झाला असुन या परकोटातील केवळ दोन बुरुज व काही प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. उर्वरीत अवशेषांचा वापर स्थानिकांनी आपली घरे बांधण्यासाठी केलेला आहे. गढीला पाणीपुरवठा करण्यासाठी परकोटात एक विहीर दिसुन येते. मुख्य गढीच्या तटाची उंची साधारण ३५ फुट असुन गढीचे खालील १० फुटाचे बांधकाम घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी व तटावरील फांजी पांढऱ्या चिकणमातीने बांधलेली आहे. फांजीचा भाग मोठ्या प्रमाणात ढासळलेला असल्याने त्यातील बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या दिसत नाहीत. मुख्य गढी हि चार बुरुजांची असुन त्यातील एक बुरुज पुर्णपणे नष्ट झाला आहे. उत्तर दिशेच्या तटबंदीत गढीचा उत्तराभिमुख मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाची लाकडी चौकट आजही शिल्लक असुन त्यातील लाकडी दारे मात्र नष्ट झाली आहेत. दरवाजाने गढीत प्रवेश केल्यावर माथ्यावर जाण्यासाठी वक्राकार पायरीमार्ग आहे. या मार्गाच्या शेवटी माथ्यावर प्रवेश करण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. पुर्वी हा मार्ग पुर्णपणे बंदिस्त असुन त्यावर दुमजली वास्तु असल्याचे दिसुन येते. या ठिकाणी पुर्वी गढीची कचेरी होती. गढीच्या माथ्यावर नव्याने बांधलेल्या घरांचे अवशेष असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढलेली आहेत. गढीची पडझड होऊ लागल्याने गढीचे वंशज अलीकडील काळात गढीबाहेर वास्तव्यास गेले आहेत. गढीचा परीसर साधारण १२ गुंठे आहे. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढी व परकोट पहाण्यासाठी पंधरा मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!