पारगाव
प्रकार : भुईकोट
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पारगाव हे वैतरणेच्या तिरावर वसलेले एक छोटेसे गाव. या गावात असणारा छोटेखानी पारगाव कोट गावातील लोकांना देखील माहित नाही त्यामुळे इतरांची तर गोष्टच सोडा. काळाच्या ओघात व लोकांना माहीत नसल्यामुळे हा कोट जवळपास नष्ट झाला आहे. पारगाव कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. पारगाव कोट सफाळे रेल्वे स्थानका पासून ९ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून १० कि.मी.वर आहे. सफाळे स्थानकापासून तांदूळवाडी गावास जाण्यासाठी खासगी रिक्षा व बसची सोय आहे. मुंबई महामार्गाने वरई फाटय़ाने येताना तांदूळवाडी गावाआधी पारगाव लागते. या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे ठरवावे. स्थानिक लोक पारगाव कोटास गढी, माडी, कोट, माडीकोट अशा विविध नावाने ओळखतात.
...
सफाळेहुन मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाताना वाटेत पारगाव फाटा लागतो. या फाट्याने डाव्या बाजुला आत गावात शिरल्यावर नरनारायण मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजुस एक पुरातन विहीर आहे. या मंदिराच्या समोरुन जाणारा रस्ता जेथे संपतो तेथे सदाशिव पाटील यांचे घर आहे. पाटील यांच्या घराच्या मागील बाजुस पारगाव कोटाचे काही अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत. पारगाव कोट खासगी मालमत्तेत असल्याने तिथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. वास्तू फारच छोटी असुन जवळपास नामशेष झाल्याने आतील बांधकामाचे नियोजन व वास्तुचे प्रयोजन याचे नीट आकलन होत नाही. उत्तर कोकणातील चौकीसमान वास्तूंत पारगाव कोटाचा समावेश होतो. आज उपलब्ध अवशेषांवरून या वास्तूचा वापर प्रशासकीय व लष्करी अशा दोन्ही प्रकारांत करण्यात आलेला दिसतो. ब्रिटिश काळात मुख्य दळणवळणापासून आतील भागात असणाऱ्या या वास्तूतील कोठारातुन सैन्याला रसद पुरवठा केला जात असे. या कोठाराचा आकार व उंची मोठी होती असे स्थानिक लोक सांगतात. सध्या यातील वास्तू उद्ध्वस्त झाल्याने आत पाण्याची टाकी व शौचालय बांधण्यात आलेले असुन कोटाचे दगड या बांधकामात वापरण्यात आले आहेत. कोटाच्या आत पाण्याची, राहण्याची वा साठवणीची कोणतीही सोय आढळत नाही तसेच वास्तूत कार्यालय समान विभाग रचना दिसते. या कोटाच्या भिंतीत माती, चिखल, दगड, चुना यांचा वापर करून बांधकाम करण्यात आलेले आहे. याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढवय्या कोट वाटत नाही. या कोटाचा उपयोग केवळ साठवण अथवा प्रशासकीय कामासाठी केला जात असावा. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. या कोटाजवळच उत्तर दिशेला एक तलाव आहे. या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावानेच पारगाव कोट अथवा पारगाव माडी म्हणुन ओळखले जाते. सन १७३७ च्या सुमारास तांदूळवाडी गडावर मराठय़ांचा अंमल सुरू झाल्यावर पारगाव प्रांतही स्वराज्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजाची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या ठिकाणास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar