पारगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : कोल्हापुर

उंची : २४६० फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. स्वराज्याच्या पार टोकावर असलेला हा किल्ला म्हणुन याचे नाव पारगड असे या किल्ल्याच्या नावाच्या उत्पत्तीबाबत सांगितले जाते. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक ह्या तीन राज्यांच्या सीमेवर हा किल्ला येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून ३१ कि.मी.वर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी कोल्हापूर अथवा बेळगावमार्गे चंदगड गाठायचे. चंदगड वरून इसापूर अशी एसटी आहे. इसापूरहून थेट पारगडावर जाता येते. चंदगडवरून पारगड एसटी आपल्याला थेट पारगडच्या पायथ्याशी आणून सोडते. गडाचा परीसर साधारण ३७ एकरवर पसरलेला असुन उत्तर, पूर्व व पश्चिम दिशेला असलेल्या कातळकड्यांमुळे गडाला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. दक्षिणेकडेही खोल दरी असुन गडाचा हा भाग निमुळत्या सोंडेने मुख्य भागाशी जोडला गेला आहे. ... या वाटेने गडाचा उत्तरेकडील कडा डावीकडे ठेवून पुढे गेल्यावर डाव्या बाजुला गडावर जाणारा पायऱ्याचा मुळ मार्ग असुन सरळ जाणारा डांबरी रस्ता राजमार्गाने सर्जा दरवाजामार्गे गडावर येतो. थेट गडावर जाणारा हा डांबरी रस्ता २००२ साली बांधण्यात आला आहे. पायरी मार्गाने गडावर जाताना काही पायऱ्या चढून गेल्यावर उध्वस्त दरवाजाचे काही अवशेष पहायला मिळतात. सरळ जाणारा पक्का रस्ता तुटलेल्या तटबंदीतुन गडावर प्रवेश करतो. पायऱ्यांच्या वाटेने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरातील मुर्तीच्या कानात असलेली भिकबाळी पहाता हि मुर्ती उत्तरकालीन असावी. मंदिराच्या आवारात एक चौथऱ्यावर तुटलेल्या चार तोफा व एका बंदुकीचे अवशेष ठेवलेले असुन या चौथऱ्यावर ध्वजस्तंभ उभारलेला आहे. याशिवाय मंदिरासमोर डाव्या बाजुस घडीव दगडात बांधलेली एक समाधी पहायला मिळते. घडीव दगडात बांधलेली हि समाधी एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची असावी. मंदिराकडील मळलेल्या वाटेने पुढे आल्यावर आपण गडावरील वस्तीत प्रवेश करतो. या वाटेने गावातील शाळेकडे आल्यावर शाळेच्या आवारात गडाच्या सदरेचा चौथरा पहायला मिळतो. सध्या या चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. पुढे गेल्यावर उजव्या बाजुस गडकऱ्यानी जिर्णोध्दार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर आहे. जीर्णोद्धार करताना शिवकालीन असलेले दगडी मंदिर त्याच्या मुळ स्थितीत कायम ठेऊन समोर नव्याने सभामंडप उभारला आहे. मंदिरात भवानी मातेची मुर्ती असुन ती आपल्याला प्रतापगडच्या भवानी मातेची आठवण करुन देते. मंदिराच्या सभामंडपात शिवकाळातील प्रसंग रंगवलेली चित्रे लावली आहेत. मंदिराच्या परीसरात गणपती व महादेव या देवतांची दोन लहान मंदिरे आहेत. गडावर फिरताना आपल्यला गंधर्व, महादेव, व गणेश हे तीन मोठे तलाव पहायला मिळतात. या तलावांमुळे गडावर एप्रिल-मे महिन्यात देखील बऱ्यापैकी पाणी असते. गडावर असलेल्या अनेक विहिरींपैकी आज केवळ ४ विहिरी वापरात असुन उरलेल्या बुजलेल्या अवस्थेत आहेत. स्थानिकांच्या मदतीने तटावर फेरी मारताना भालेकर, फडणीस,महादेव, माळवे, भांडे, झेंडे अशी बुरुजांची नावे कानावर पडतात. गडाच्या उत्तर बाजुस दरीकाठावर महादेव मंदिर असुन जवळच तुळसाबाई माळवे यांची १६९० मधील समाधी आहे. पती विठोजी माळवे यांना १६८९ मध्ये वीरमरण आल्यावर त्या या ठिकाणी सती गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय गडाखाली मिरवेल गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांचे स्मारक आहे. गडाचा विस्तार मोठा असुन छोटया मोठ्या बऱ्याच वास्तू आहेत् त्यामुळे गड निवांतपणे फिरायला साधारण २ ते ३ तास लागतात. कोकण घाटमाथ्याचा हा परिसर दाट जंगलाने वेढलेला असुन आपल्याला जावळी खोऱ्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आधी संपर्क साधला तर गडावर राहण्याची व खाण्याची घरगुती व्यवस्था होते. रात्री गडावरून दूरवर वेंगुर्ल्यातील विजेचे लुकलुकणारे दिवे दिसतात. १६७६ मधील पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परतताना शिवरायांनी पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. या किल्ल्यावर त्यांनी तानाजीचा मुलगा,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले. गडाची वास्तुशांत व गडप्रवेश यासाठी महाराज या गडावर स्वतः हजर होते. याच्या निर्मितीनंतर जवळपास दोनशे वर्ष हा गड मराठ्यांच्याच ताब्यात होता. सन १६८९ मध्ये औरंगजेबचा मुलगा मुअज्जम व खवासखान ह्याने वाडीकर सावंताच्या मदतीने ह्या किल्ल्यावर हल्ला केला. गडावरील मराठ्यांनी हा हल्ला परतवून लावला पण यावेळी झालेल्या लढाईत तोफखान्याचे अधिकारी विठोजी माळवे यांना वीरमरण आले. त्यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या आधिपत्याखाली आला. पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज कान्होबा माळवे हे आजही वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे यांच्याकडे सरदार तानाजीं मालुसरे यांची तलवार व शिवरायांच्या गळयातील सामुद्री कवडयांची माळ जतन केलेली आहे. माघी महिन्यातील उत्सवात अथवा दसऱ्याला गडावर आले असता हि शस्त्रास्त्रे पहायला मिळतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!