पाबरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४११५ फुट

श्रेणी : मध्यम

नगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर म्हणजे भटक्यांचे नंदनवन. सह्याद्रीच्या कातळकड्यांनी वेढलेला हा भाग रतनगड, अलंग, मदन, कुलंग या सारख्या अनेक किल्ल्यांची माळ ल्यालेला आहे. एकाहून एक सरस असलेले हे किल्ले जातीवंत भटक्याचा देखील कस काढणारे आहे. चढाईच्या बाबतीत दुर्गप्रेमींची परीक्षा घेणारा या माळेतील अजुन एक मणी म्हणजे किल्ले पाबरगड. याच्या नावात पहा-बर-गड असे असले तरी पहाण्यासाठी हा गढ तितकासा सहजसाध्य नाही. याचे कारण म्हणजे गडावर जाण्यासाठी करावी लागणारी तीन तासाची खडी चढाई. पाबरगडच्या घेऱ्यात असलेल्या मुद्खेल व गुहीरे या दोन्ही गावातुन गडावर जाण्यासाठी वाट असली तरी मुदखेल येथुन गडावर जाणारी घळीची वाट घसाऱ्याची व तीव्र चढाईची असल्याने या वाटेचा वापर शक्यतो टाळलेला बरा. या वाटेच्या तुलनेने गुहीरे गावातुन गडावर जाणारी काहीशी सोपीच म्हणावी लागेल. गुहीरे गाव घोटी - संगमनेर मार्गावर वसलेले असुन इगतपूरी किंवा घोटीहून संगमनेर, अकोले किंवा पुणे अशी कोणतीही बस पकडून या गावात जाता येते. मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी फाट्यापासून हे अंतर ३७ कि.मी.आहे. गुहिरे गावात शिरण्यापूर्वी काही अंतरावरून गडाचे ओझरते दर्शन होत असले तरी गावात आल्यावर त्याच्या अलीकडे असलेल्या दुसऱ्या डोंगरामुळे हा गड नजरेस पडत नाही. ... या डोंगराची एक धार गावाच्या मागील बाजुस उतरलेली असुन या धारेवरूनच पाबरगडवर जाण्याचा मार्ग आहे. गावात मुक्काम करायचा असल्यास गावातील हनुमान मंदीरात रहाता येते तसेच मंदिराजवळ असलेल्या घरात चहा-पाण्याची व जेवणाची घरगुती सोय होते. मंदिराच्या आवारात काही घडीव थडी मांडलेली आहेत. हनुमान मंदीराच्या उजव्या बाजूने डोंगराच्या धारेवर जाण्याची वाट आहे. या धारेवर गावकऱ्यांचे गोठे असल्याने तेथे जाणारी वाट चांगली मळलेली आहे. या धारेने वर चढुन आल्यावर पाबरगड व त्यापुढे असलेला डोंगर व त्याची या पठाराकडे उतरत आलेली सोंड याचे दर्शन होते. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे या उतरत आलेल्या सोंडेवरून वरील डोंगराच्या तळाशी जाणे व तेथुन डोंगराचा कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत पाबरगड व त्यासमोरील डोंगर यामधील खिंडीत जाणे. दुसरी वाट म्हणजे सोंडेवर न चढता उजवीकडील पायवाटेने सोंड व डोंगर यांना तळातुन वळसा मारत पाबरगड व समोरचा डोंगर यामधील घळीच्या तळात येणे व तेथुन उभा चढ चढुन वरील खिंडीत येणे. यातील दुसरी वाट पहिल्या वाटेच्या तुलनेने सोपी असली तरी शेवटच्या टप्प्यात मात्र चांगलीच थकवणारी आहे. पायथ्यापासुन या खिंडीत येण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. येथे कातळकडयाला लागुनच गडावर जाणारी वाट आहे. खिंडीतून गडावर जाणाऱ्या वाटेवर अवघड ठिकाणी वनखात्याने २०२१ साली संरक्षक कठडे व ३० फुट उंचीच्या दोन शिड्या लावल्याने पुढील वाट सोपी झालेली आहे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वनखात्याने लावलेली पहिली शिडी लागते. या शिडीखाली तसेच शिडीच्या वरील भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. येथुन पुढील वाट दाट कारवीच्या रानातुन वर चढत जाते. गडावरील भैरोबाच्या दर्शनाला गावकरी जात असल्याने वाट चांगली मळलेली आहे. या वाटेने साधारण २० मिनिटे चढाई केल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी येतो. येथून किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट असुन वनखात्याने या ठिकाणी दुसरी शिडी लावलेली आहे. शिडी चढण्याआधी एक पायवाट कडयालगत पुढे जाताना दिसते. या वाटेवर एक भली मोठी नैसर्गिक गुहा असुन या गुहेत काही प्रमाणात खोदकाम केलेले आहे. येथे कातळात कोरलेले आयताकृती आकाराचे पाण्याचे कोरडे टाके आहे. गडावर रहायचे असल्यास १०-१२ लोक या गुहेत सहज राहु शकतात. या गुहेच्या पुढील भागात दुसरी नैसर्गिक गुहा असुन या गुहेत पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध असते. या गुहेत कातळावर शिवलिंग व नंदी कोरलेला आहे. गुहा पाहुन शिडी चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. आपण गडावर प्रवेश करतो त्या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या व घडीव दगडात बांधलेल्या बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. येथुन गडमाथ्याकडे जाताना वाटेवर आयताकृती आकाराचे एक मोठे व त्यापुढे अजुन एक अशी कातळात कोरलेली दोन टाकी पहायला मिळतात. या दोन्ही टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. दुसऱ्या टाक्याकडून पुढे जाणारी वाट गडाच्या माथ्यावर जाते पण या वाटेने न जाता आपण दरीच्या काठाने तसेच पुढे जावे. साधारण ५० पाउले पुढे गेल्यावर आपल्याला खालील बाजुस उतारावर असलेला गडाचा उत्तराभिमुख दरवाजा व त्याशेजारी असलेली तटबंदी नजरेस पडते. दरवाजाची अर्धी कमान ढासळलेली असुन त्याखाली कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या आहेत. गडावर येण्याचा हा मुळ मार्ग आज वापरात नसुन आपण गडावर केलेला प्रवेश हा भग्न तटबंदीतुन झालेला आहे. दरवाजा पाहुन मुळ वाटेपाशी परतायचे आणि किल्ल्याच्या पठारावर पोहोचायचे. पठारावर कातळात कोरलेली पाण्याची चार टाकी असुन या टाक्याच्या काठावर भैरोबाचे भग्न मंदिर आहे. मंदीरात काळा व भगवा शेंदूर फासलेले भैरोबाचे दोन तांदळा असुन एक गणपतीची मूर्ती आहे. या टाक्याच्या पुढील भागात दरीकाठावर अजुन एक टाके कोरलेले आहे. भैरोबाचे दर्शन झाल्यावर तेथील टेकडी चढुन आपण गडाच्या सर्वोच्च भागात येतो.या भागात वेताळाचे भग्न मंदिर व तांदळा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाही. गडमाथा समुद्रसपाटीपासुन ४११५ फुट उंचावर असुन गडाची माची दोन डोंगरावर विभागली आहे. किल्ल्याचे बहुतांशी अवशेष हे आपण असलेल्या पुर्व-पश्चिम माचीवर पसरलेले असुन दक्षिणोत्तर असलेल्या दुसऱ्या भागात केवळ पाण्याचे एक टाके आहे. हा संपुर्ण परिसर साधारण १५ एकर आहे. येथुन अलंग-मदन-कुलंग,रतनगड,पट्टा हे किल्ले तसेच कळसुबाई,घनचक्कर,मुडापर्वत ही शिखरे नजरेस पडतात. पाबरगडाच्या खालील भागात भंडारदर्यालचा अथांग जलाशय पसरलेला आहे. आता आलो त्या मार्गाने परत न जाता विरुद्ध दिशेने टेकडीखाली उतरावे. येथे उतरताना माचीवर असलेली एकुण चार टाकी नजरेस पडतात. यातील तीन टाक्यात हिरवेगार पाणी असुन एक टाके मात्र फुटलेले आहे. माचीच्या या टोकावर एका मोठ्या वास्तुचे अवशेष आहेत. या माचीवरून संपुर्ण टेकडीला वळसा घालता येतो पण काही ठिकाणी वाट धोक्याची आहे. या टेकडीला डावीकडुन वळसा घालत म्हणजे टेकडी उजव्या बाजुस व दरी डाव्या बाजुस ठेवत थोडे पुढे आल्यावर तीन भुमिगत दरवाजे पहायला मिळतात. स्थानिक लोक या ठिकाणास कोठार म्हणुन ओळखतात. मुळात हे पाण्याचे एक टाके असुन त्याच्या दर्शनी भागात असलेल्या दोन खांबांमुळे हे तीन वेगळे दरवाजे असल्यासारखे वाटतात. हे टाके गडाची प्राचीनता दर्शविते. या टाक्याचे आतील बाजुस दोन भाग पाडलेले असुन उतारावर असल्यामुळे वरील बाजुने वाहुन आलेली माती याच्या मधील तोंडावर मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे. टाके पाहुन झाल्यावर मागे फिरावे व आता टेकडीच्या उजवीकडून आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने जाताना दरीकाठावर चौकीचे अवशेष दिसुन येतात. टेकडीला फेरी मारताना हि वाट खाली किल्ल्याच्या माचीसारख्या दिसणार्याे दुसर्याा डोंगरावर जाते. या दोन डोंगरांना जोडणाऱ्या घळीत किल्ल्याचा दुसरा दरवाजा असुन आज त्याचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत. घळीत उतरल्यास खालील बाजुस या दरवाजाचा चौथरा व काही बांधकाम पहायला मिळते. हा दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. मुतखेल गावातुन येणारी वाट घळीतुन या दरवाजाने वर येते. गडाच्या दुसऱ्या डोंगरावर एक कोरडे टाके व दोन चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. हे सर्व पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर येत आपली टेकडीची पुढील फेरी सुरु करावी. वाटेच्या पुढील भागात कातळात कोरलेले पाण्याचे एक मोठे टाके असुन या टाक्याच्या काठावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. टाके पाहुन पुढे आल्यावर आपण भैरोबा मंदीराजवळ पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास साधारण एक तास लागतो. इतिहासात या किल्ल्याची कोठेच नोंद आढळत नसली तरी मराठ्यांचा या भागातील वावर पहाता शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात असावा असे वाटते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!