पाथर्डी
प्रकार : नगरकोट
जिल्हा : अहमदनगर
उंची : 0
पाथर्डी हा अहमदनगर शहरातील एक तालुका म्हणुन सर्वानांच परीचीत आहे. आज तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर निजामशाही काळापासूनच नव्हे तर पुर्वीपासून एक महत्वाचे नगर होते. याची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही आपल्याला पाथर्डी शहरात पहायला मिळतात. अहमदनगर- बीड हा रस्ता पाथर्डी गावातून जात असल्याने या रस्त्याने जाताना अगदी सहजपणे या गावास भेट देता येते. पाथर्डी गाव अहमदनगर शहरापासुन ५० कि.मी.अंतरावर असुन पुणे शहरापासून शिरूरमार्गे १७० कि.मी.अंतरावर आहे. आजच्या कसबा पेठ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात नदीच्या काठावर हे जुने गाव वसले होते. आज या नदीचे बहुतांशी नाल्यात रुपांतर झाले आहे. पाथर्डी हे गाव बाजारपेठेचे ठिकाण असल्याने या संपुर्ण गावाभोवती तटबंदी होती. या तटबंदीमध्ये नेमके किती दरवाजे होते हे आज जरी सांगता येत नसले तरी त्यातील तीन दरवाजे भग्न स्वरूपात आपल्याला आजही पहायला मिळतात. हे तीनही दरवाजे अहमदनगर- बीड रस्त्यावर नदीच्या काठानेच वसलेले आहेत. आपण आपली भटकंतीची सुरवात कसबा पेठ मारुती मंदिराकडून करूया.
...
कसबा पेठेच्या सुरवातीस नदीकाठी असलेले हे मारुती मंदीर घडीव दगडात एका उंच जोत्यावर बांधलेले आहे. मंदीराच्या मागील बाजूस नदीकाठी काही समाधी चौथरे असुन मंदीराच्या समोरच नगरकोटाचा पहिला दरवाजा आहे. मंदिराच्या आवारात चामुंडा, भैरव व भगवान महावीर यांच्या भग्न मूर्ती पहायला मिळतात. मंदिरासमोर असलेला कोटाच्या दगडी दरवाजाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन त्याची वरची कमान पूर्णपणे नष्ट झाली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरी बसण्यासाठी देवड्या असुन दरवाजाच्या वरील बाजूस नव्याने छप्पर घालण्यात आले आहे. दरवाजाला लागुन शिवपार्वती याचे शिल्प ठेवलेले असुन त्याशेजारी एक विरगळ व एक धेनुगळ मांडलेली आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या दरवाजाला आता लाल रंग देऊन त्याचे विद्रुपीकरण केलेले आहे. दरवाजा शेजारी तटबंदीचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. दरवाजासमोर मारुती मंदिराच्या दुसऱ्या बाजूस खोलेश्वराचे म्हणजे महादेवाचे शिवमंदिर आहे. हे मंदीर या परीसरात दगडी मठ म्हणुन ओळखले जाते. संपुर्ण मंदिराचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन आतील सभामंडपाचे छप्पर चार कोरीव स्तंभावर तोललेले आहे. मंदिरासमोरच दगडी नंदिमंडप बांधलेला आहे. मंदिराच्या आवारात झीज झालेल्या काही प्राचीन मुर्ती व विरगळ असुन नव्याने बांधलेले लहान गणेशमंदिर आहे. नगरकोटाचा हा दरवाजा पाहुन झाल्यावर नदीच्या काठाने सरळ पुढे निघाल्यावर आपण शनिमंदिर,शिवमंदीर व हनुमान मंदीर या तीन लहान मंदीर समुहाजवळ पोहोचतो. या मंदिरांच्या समोरच कोटाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा व त्याच्या आसपासचा तट घडीव दगडात बांधलेला असुन या दरवाजावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. दरवाजाच्या आत एका बाजुस पहारेकऱ्याची देवडी असुन त्याला लागुनच नव्याने मंदीर बांधण्यात आले आहे. दरवाजाच्या वरील बाजूस असलेली कमान पुर्णपणे पडली असली तरी दरवाजाची चौकट व आसपासचा तट काही प्रमाणात शिल्लक आहे. हा दरवाजा पाहुन सरळ रस्त्याने पुढे निघाल्यावर आपण कोटाच्या तिसऱ्या दरवाजा समोर पोहोचतो. या दरवाजाची देखील पडझड झाली असली तरी इतर दोन दरवाजाच्या मानाने हा दरवाजा आपले अस्तित्व राखून आहे. हा दरवाजा देखील मोठमोठ्या घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत, दरवाजाचा वरील भाग ढासळलेला असला तरी कमानीचा काही भाग दोनही बाजूस शिल्लक आहे. रस्त्यासाठी भराव टाकल्याने दरवाजाचा तळ गाडला गेला असुन दरवाजाच्या दर्शनी भागात दोन्ही बाजूस असलेली चौथरे जमीनीच्या पातळीत आलेले आहेत. यावरून आपल्याला दरवाजाच्या उंचीची कल्पना करता येते. या दरवाजाने आत शिरून पेठेत फिरले असता पडझड झालेले बरेच जुने वाडे पहायला मिळतात. पाथर्डीच्या कोटाचे हे तीन दरवाजे व इतर वास्तु पाहण्यासाठी साधारण एक तास लागतो.
© Suresh Nimbalkar