पाच्छापुर
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : बेळगाव
उंची : २२५० फुट
श्रेणी : सोपी
बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला ३६ पेक्षा जास्त गढीकोट पहायला मिळतात. स्वतःचे खाजगी वाहन असल्यास दिवसाला येथील ५-६ कोट सहजपणे पहाता येतात. यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन एखादा दुसरा अपवाद वगळता गिरिदुर्गांची संख्य फारच कमी आहे. जे काही गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले लहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत. पाच्छापूर हा असाच एक सुंदर गिरीदुर्ग तटबुरुजांचे अवशेष लपेटुन गावाच्या मध्यभागी असलेल्या लहानशा टेकडीवर पुर्वपश्चिम विस्तारला आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पाच्छापूर हे पायथ्याचे गाव आहे. मुंबई –बंगळूर महामार्गावर संकेश्वरहून १४ कि.मी. अंतरावर हिडकल धरणाकडे जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून २४ कि.मी.वर पाच्छापूर गाव आहे. हुक्केरी व गोकाक येथुन पाच्छापूर गाव समान अंतरावर म्हणजे २२ कि.मी.वर आहे.
...
गावात प्रवेश करतानाच टेकडीवरील किल्ल्याचे बुरुज तटबंदी दिसायला सुरवात होते. पाच्छापूर किल्ला केवळ टेकडीवर मर्यादीत नसुन पुर्वी पाच्छापूर गाव देखील तटाबुरुजांनी वेढलेल्या किल्ल्यातच वसले होते. किल्ल्याचा हा भाग पहाण्यासाठी गोकाककडून गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर यावे. या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा व त्या शेजारील तटबंदी पहायला मिळते. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन कमानी असुन या कमानींच्या मध्यभागी दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. येथील तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. हा भाग पाहुन झाल्यावर पाच्छापूर गावातील आतील रस्त्याने (बाजारपेठेतील) मल्लिकार्जुन मंदिराकडे जाताना एका लहान बोळात गडाकडे जाणारा पायरीमार्ग आहे. येथे किल्ल्यासोर असलेल्या दर्ग्याची लोखंडी कमान उभारली आहे. या पायऱ्यानी वर चढून ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. भव्य आकाराच्या या दरवाजाच्या कमानीवर दोन बाजुस शरभ कोरलेले असुन मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. मुख्य दरवाजा बंद असताना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या दरवाजा शेजारी लहान दिंडी दरवाजा बांधलेला आहे. या दरवाजाचे बांधकाम चौकोनी बुरुजाप्रमाणे केले असुन भिंतीत व दरवाजावरील भागात तोफा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व झरोके ठेवलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याची देवडी असुन दोन्ही बाजुस कमानीदार ओवऱ्या बांधल्या आहेत. यातील एका ओवरीत टेहळणीसाठी खिडकी बांधलेली आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो व माथ्याकडे जातो पण येथे मोठ्या प्रमाणात बाभळीचे रान वाढले असुन त्यातून आत शिरताच येत नाही. मुख्य दरवाजातुन बाहेर पडल्यावर समोर दर्गा दिसतो. या दर्ग्याच्या डावीकडे गडाची तटबंदी व बुरुज दिसतो. या ठिकाणी झाडी आहे पण ती काटेरी नसल्याने थोडीशी हिंमत करून येथुन माथ्यावर जाता येते. किल्ल्याच्या आतील भागात देखील काटेरी झाडे आहेत पण या झुडुपातून वाट काढत दुर्गफेरी करता येते. किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन २२५० फुट उंचावर असुन गावापासुन फारतर १५० फुट उंचावर असावा. किल्ल्याचा परिसर २.५ एकर असुन किल्ल्याच्या तटबंदीत माथ्यावर ६ तर दरवाजाकडील १ असे ७ बुरुज आहेत. गडाच्या पश्चिमेकडील बुरुजावर जाताना वाटे डावीकडे एक लहान व एक मोठे अशी पाण्याची दोन बांधीव टाकी पहायला मिळतात.गडफेरी करताना माथ्यावर मध्यभागी उंचावर एका वाडयाचे अवशेष आहेत. येथुन सरळ गेल्यावर आपण पश्चिमेकडील सर्वात उंच व मोठ्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून संपुर्ण पाच्छापूर गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. याशिवाय उत्तरेकडील दुसऱ्या बुरुजाच्या तटाखालील भागात किल्ल्यातुन बाहेर पडणारा एक चोरदरवाजा पहायला मिळतो. वाढलेल्या झाडीमुळे मात्र याची आतील बाजु कळून येत नाही. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. पाच्छापूर किल्ला सावनुरच्या नवाबाच्या काळात बांधला गेला. शिवकाळात हा परिसर मराठयांच्या ताब्यात होता. कालांतराने येथुन उठवलेली मराठयांची ठाणी पुन्हा काबीज करण्यासाठी ५ डिसेंबर १७४६ ला महादजीपंत पुरंदरेसोबत सदाशिवरावभाऊ कर्नाटक मोहिमेवर रवाना झाले. तुंगभद्रेपर्यंत जाऊन त्यांनी सावनुरकर नवाब, देसाई व बंडखोरांना जरब बसविली. सावनूरच्या नवाबाकडून पाच्छापूर, बदामी, नवलगुंद, उंबल, गिरी, तोरगळ, कित्तूर, परसगड, गोकाक, यादवाड, बागलकोट, हल्ल्याळ, हरिहर, बसवपट्टण वगैरे 22 परगणे ताब्यात घेतले. नंतरच्या काळात हा प्रांत करवीरकर छत्रपती व पटवर्धनांच्या ताब्यात काही काळ असल्याचे दिसुन येते.
© Suresh Nimbalkar