पांडवगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ४१३० फुट

श्रेणी : मध्यम

कृष्णा नदी तीरावर वसलेल्या वाई शहराला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. कृष्णा नदीच्या पाण्यावर हा प्रदेश सुजलाम सुफलाम झाला असुन असुन पर्यटनदृष्टया देखील समृद्ध आहे. जवळच असलेल्या पाचगणी व महाबळेश्वरमुळे येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. पण आपल्यासारख्या दुर्गभटक्यांना खुणावतात ते या भागातील किल्ले. वाई परिसरातील डोंगररांगेवर पांडवगड,वैराटगड,कमळगड,केंजळगड, चंदन-वंदन यासारखे किल्ले वसलेले असुन दोन दिवसाची सवड काढल्यास व सोबत खाजगी वाहन असल्यास यातील चार पाच किल्ले सहजपणे पाहुन होतात. यातील वाईपासून हाकेच्या अंतरावर असलेला गड म्हणजे पांडवगड. फुलपाखराच्या आकाराच्या डोंगरावर कातळ भिंतिचा मुकुट परीधान केलेला हा किल्ला वाई मांढरदेव मार्गावर वसलेला आहे. गडावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाई शहर गाठावे लागते. पुणे वाई अंतर ८५ कि.मी.असुन तेथुन मेणवली मार्गे ५ कि.मी. तर वाई-मांढरदेव मार्गावरील धावडी गावापुढील गुंडेवाडी मार्गे ९ कि.मी. अंतरावर पांडवगड वसला आहे. ... मेणवली गाव वाई शहराजवळ असले तरी येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी २ तास लागतात तर गुंडेवाडी येथुन तासाभरात आपण किल्ल्यावर पोहोचतो. धावडी गावाच्या फाट्यापासून पुढे १.४ कि.मी.अंतरावर रस्त्याच्या उजवीकडे कुकुटपालन केंद्र (poultry farm)असुन डावीकडे कोंडके आडनावाची २-३ घरे आहेत. येथुन गुंडेवाडीत जाणारा फाटा पुढे ६५० मीटरवर आहे. या दोन घरांच्या मधुन गडावर जाणारी वाट सतत वर्दळीची असल्याने चांगलीच मळलेली आहे. गडाचा काही भाग खाजगी मालकी हक्कात असल्याने व त्यांची गडावर ये-जा असल्याने त्यांनी काही ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. जंगलातुन जाणाऱ्या या वाटेने फारसे न थकता तासाभरात आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले आहेत. गडाच्या उत्तर बाजुने माचीवर प्रवेश करताना शेवटच्या टप्प्यात असलेल्या बांधीव व कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहता या ठिकाणी दरवाजा असण्याची शक्यता आहे पण उर्वरीत अवशेष नष्ट झाल्याने ठोसपणे सांगता येत नाही. गडावर प्रवेश करून उजवीकडील वाटेने पुढे आल्यावर आपण गडाच्या उत्तर भागात असलेल्या बंगल्यासमोर येतो. पुर्वी वाडीया या पारशी इसमाची मालकी असलेला गडाचा बहुतांशी भाग सध्या म्याप्रो आस्थापनाच्या ताब्यात असुन त्यांनी गडावर तीन माणसे सुरक्षेसाठी नेमली आहेत. गडावरील भटकंतीसाठी त्यांची कोणतीही हरकत नसुन तेथील नोंदवहीत नोंद करून आपण बिनधास्तपणे गडावर भटकंती करू शकतो. बंगल्याच्या मागील बाजुस सोंडेवजा पठार आहे पण त्यावर तुरळक तटबंदी वगळता कोणतेही अवशेष नाहीत. बंगल्याकडून बालेकिल्ला डावीकडे ठेवत सरळ वाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे कातळात खोदलेले हिरव्यागार पाण्याने भरलेले एक मोठे टाके पहायला मिळते. टाके पाहुन पुढे निघाल्यावर उजव्या बाजुस कडयाच्या काठावर कातळात कोरलेली दोन टाकी असुन एक टाके पाण्याने भरलेले तर दुसरे कोरडे आहे. हि टाकी वाटेवरून दिसत नाहीत. हि दोन्ही टाकी पाहुन परत वाटेवर येऊन पुढे निघावे. वाटेच्या पुढील भागात डावीकडे थोडे उंचावर कातळात खोदलेले एक गुहा टाके असुन या टाक्यात जंगली प्राणी पडु नये यासाठी सभोवती लोखंडी जाळीचे कुंपण केलेले आहे. गडावर पिण्यासाठी याच टाक्यातील पाणी वापरले जाते. येथुन बालेकिल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुस ठेवत कड्याखालुन आपण गडाच्या दक्षिण भागात येतो. या वाटेवर आपल्याला बालेकिल्ल्याच्या कड्यात खोदलेली गुहा व कातळात कोरलेले पाण्याचे लांबलचक टाके पहायला मिळते. गडाच्या दक्षिण टोकावरून हि वाट खाली उतरते. गडाखाली उतरत जाणारी हि वाट काही ठिकाणी कातळात खोदलेली असुन दरवाजाच्या खालील बाजुस कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. वाटेच्या तळाशी असलेल्या पठारावर भैरवनाथाचे मंदीर आहे. मेणवली वरून येणारी वाट येथूनच गडावर चढते. या वाटेने खाली उतरून गडाचा हा भाग पाहुन घ्यायचा व पुन्हा मागे फिरायचे. गडाच्या पुर्वाभिमुख दरवाजाची कमान पुर्णपणे उध्वस्त झाली असुन केवळ दरवाजाची चौकट व पहारेकऱ्याची देवडी शिल्लक आहे. दरवाजातुन आत आल्यावर बालेकिल्ला डाव्या हाताला ठेवत उजवीकडील वाटेने पुन्हा आपल्या गडफेरीला सुरवात करायची. या वाटेने साधारण ५ मिनिटे चालत पुढे आल्यावर हि वाट वरील बाजुस चढते. या ठिकाणी कातळात खोदलेले एक टाके असुन या टाक्याच्या आत दुसरे भुमिगत टाके आहे. या टाक्यातील पाणी देखील पिण्यायोग्य आहे. यापुढे अजुन एक बुजलेले टाके आहे. पुढील वाटेंने वर चढुन आल्यावर आपण कातळात कोरलेल्या आयताकृती गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत तांदळा स्वरूपातील देवतांची स्थापना करण्यात आली आहे. या भागात कड्यावर मधमाशांची पोळी असल्याने सावधगिरीने पुढील भटकंती करावी. कडयाच्या काठाने पुढे जाताना एकामागोमाग एक अशा कातळात खोदलेल्या चार गुहा असुन एक गुहेवजा पाण्याचे टाके अथवा कोठार आहे. यात काही प्रमाणात पाणी साठलेले आहे. या टाक्याच्या उजवीकडे खाली दोन पाण्याची सुकलेली टाकी असुन त्यात उतरण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. येथुन पुढे आल्यावर तुटलेला कड्याचा भाग जोडण्यासाठी कडयाच्या तळापासुन वरपर्यंत साधारण २५ फुट उंच बांधलेली तटबंदी पहायला मिळते. मुळात हि तटबंदी कडा जोडण्यासाठी बांधलेली नसुन या कडयाच्या वर असलेल्या बालेकिल्ल्यातील आतील बाजुस उतारावर बांधलेल्या धरणाची भिंत आहे. हि गोष्ट आपल्याला बालेकिल्ल्यावर या ठिकाणी आल्यावर कळते. या तटबंदीत असलेले एकमेव छिद्र म्हणजे तेथुन पाणी वाहून जाण्याची केलेली सोय आहे. तटबंदी पाहुन सरळ पुढे आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेश मार्गाजवळ येतो. या दरवाजाला एका बुरुजाचे संरक्षण दिले असुन दरवाजा कडय़ाला समांतर बांधलेला आहे. हा मार्ग दोन्ही बाजुने तटबंदीत बंदीस्त केला असुन येथुन दोन दरवाजे पार केल्यानंतरच आपला गडावर प्रवेश होतो. यातील पहिला दरवाजा चांगल्या अवस्थेत असुन उर्वरीत दोन दरवाजे मात्र ढासळलेले आहेत. साधारण २० फुट उंच तटबंदीच्या या मार्गावर ५० फुटावर दुसरा बुरुज बांधुन हा मार्ग निमुळता केलेला आहे. या माऱ्यातून वळणे घेत आपण बालेकिल्ल्यावर येतो. येथील तटावर चढल्यावर संपुर्ण माची नजरेस पडते. समुद्रसपाटीपासून ४१३० फुट उंचावर असलेला हा किल्ला २५ एकरवर पसरलेला असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ८ एकर आहे. तटावरून चालत थोडे पुढे आल्यावर तटावर विटांचे बांधकाम असलेल्या एका वास्तुत ठेवलेली चपेटदान आवेशातील मारुतीची मुर्ती पहायला मिळते. या वास्तुवर सध्या पत्र्याचे छप्पर घातलेले आहे. या मुर्तीच्या पायाखाली पनवती दाखवलेली आहे. मंदिरापुढे काही अंतरावर चुन्याचा घाणा असुन यावर तुटलेले व अखंड अशी दोन चाके आहे. घाण्यापासून पुढे जाणारी वाट आपल्याला पांडजाई मंदिराकडे नेते. एका उंच चौथऱ्यावर बांधलेल्या या मंदिराशेजारी अजुन एका वास्तुचे जोते आहे पण ते कशाचे असावे याचा बोध होत नाही. या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा अथवा गडाची सदर असावी. मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असुन देवीच्या मुर्तीची सुबकता शेंदुर फासून नष्ट झाली आहे. दगडी चौथऱ्यावर विटांनी बांधलेल्या या मंदिराच्या आवारात दगडी स्तंभ, समाधी दगड, दगडी ढोणी, पादुका कोरलेला दगड व काही घडीव दगड पहायला मिळतात. पांडजाई मंदिरामागे उध्वस्त शिवमंदिर असुन या मंदिरातील शिवलिंग व नंदी सध्या पांडजाई मंदिराच्या आश्रयाला आले आहेत. मंदिराशेजारी घडीव दगडात बांधलेला गोलाकार चौथरा असुन अनेक अवशेष येथील झाडीत लपलेले आहेत. मंदिराकडील वाटेने सरळ पुढे येऊन डावीकडे वळल्यास आपण बालेकिल्ल्याखालुन पाहिलेल्या अखंड तटबंदीवर येतो. दोन उताराच्या मध्यवर्ती भागात बांधलेल्या या तटबंदीच्या तळात गेल्यावर येथे दगडी खाचात फळी घालुन पाणी अडविण्याची व सोडण्याची सोय दिसुन येते. या भागात मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन त्यात काही चौथरे व भिंतीचे अवशेष लपलेले आहेत. तटबंदीच्या काठाने सरळ पुढे आल्यावर कड्यावरून खाली उतरण्याचा मार्ग दिसतो पण सध्या हा मार्ग पडझडीने नष्ट झाला आहे. येथुन सरळ पुढे आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या बुरुजावर येतो. बुरुजावरून मेणवली गाव व तेथुन गडाच्या दरवाजात येणाऱ्या संपुर्ण वाटेवर लक्ष ठेवता येते. तटबंदी काठाने तसेच पुढे आल्यावर आपण तटाच्या आधारे बांधलेल्या एका मोठ्या खोदीव तलावाजवळ पोहोचतो. सध्या हा तलाव कोरडा पडलेला आहे. तलावाच्या उजवीकडे झाडीत एक झेंडा रोवलेला असुन तेथे काही शेंदुर फासलेले दगड आहेत. तलावाकडून तटबंदीला फेरी मारत पुढे आल्यावर आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या दरवाजातुन बाहेर पडल्यावर बंगल्याकडे जाताना वाटेत उजवीकडे एक, त्याच्यापुढे काही अंतरावर दुसरे व त्याच्या पुढील भागात सहा टाक्यांचा समूह अशी एकुण आठ टाकी पहायला मिळतात. टाकी समूहातील एक टाके खांबटाके असुन या टाक्याला ४ खांब आहेत. टाकी समूहाच्या वरील भागात बालेकिल्ल्याच्या दिशेने गेल्यास थोडयाफार अंतराने अजुन दोन टाकी पहायला मिळतात. टाकी समुहाच्या खालील भागात अजुन एक टाके असुन त्याच्या पुढील भागात एक मोठा बांधीव तलाव आहे. या भागात काही प्रमाणात वास्तु अवशेष पहायला मिळतात. तलावाच्या पुढे आल्यावर आपण बंगल्याजवळ पोहोचतो. गडाच्या चारही बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे आवश्यक तिथेच तटबंदी बांधलेली आहे. आल्या वाटेने गडावरून खाली उतरताना पायऱ्या सुरु होण्यापुर्वी उजवीकडे गेले असता ३०x३० आकाराचा एक मोठा चौथरा दिसुन येतो. गडावरील मोठ्या प्रमाणात असलेला पाण्याचा साठा व अवशेष पाहता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात राबता असावा. गडावरून चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, केंजळगड हे किल्ले तसेच पाचगणी, महाबळेश्वर, मांढरदेवी पर्यंतचा प्रदेश तसेच धोम धरणाचा जलाशय नजरेस पडतो. संपूर्ण गडफेरी करायला दोन तास लागतात. गडावर रहायचे असल्यास तेथील रक्षकांच्या परवानगीने बंगल्याच्या आवारात रहाता येते पण पावसाळ्यात गडावर रहाण्याची सोय नाही. चालुक्र्यांच्या पाडावानंतर पन्हाळा-कोल्हापुर भागावर शिलाहारांचे राज्य आले. १९९१-१९९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ११७८ ते ११९३ दरम्यान पांडवगड बांधला असावा. यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला बहमणशाही- आदिलशाही अशी सत्तांतरे पहात ऑक्टोबर १६७३ मध्ये स्वराज्यात सामील झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आलेल्या मोगल वावटळीत सन १७०१ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर शाहु महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. सन १७११ मध्ये छत्रपती शाहुंचे पहिले पेशवे व सेनापती बाळाजी विश्वनाथ भट पांडवगडावर चंद्रसेन जाधवांच्या वेढ्यात सापडले. छत्रपती शाहू महाराजांना हि बातमी कळताच त्यांनी सरलष्कर हैबतराव निंबाळकर यांना अहमदनगरहुन निघुन पांडवगडावरील पेशव्यांच्या मदतीस जाऊन चंद्रसेन जाधवांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. यावेळी आदर्की येथे झालेल्या लढाईत चंद्रसेन जाधवांचा पराभव झाला व त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे १८१७ मध्ये त्रिंबकजी डेंगळे यांनी पांडवगडच्या मदतीने काही काळ ब्रिटीशांशी लढा दिला. यानंतर इ.स १८१८ मध्ये मेजर थॅचरने पांडवगड इंग्रंजांच्या ताब्यात आणला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!